अलिगड मुस्लिम विद्यापीठ दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे का? वाचा सविस्तर...
13 Nov 2023 17:15:36
लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोव्हेंबर महिन्यात अलिगड इसिस मॉड्यूलच्या सात दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांचा संबंध अलिगड मुस्लिम विद्यापीठाशी (एएमयू) आढळून आला आहे. त्यामुळे एएमयू दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे अब्दुल्ला अर्शलान, माज बिन तारिक, नावेद, वजिउद्दीन, राकीब इमाम, नोमान आणि मोहम्मद नाझिम अशी आहेत. दरम्यान, या दहशतवादी नेटवर्कमधून फरार असलेल्या दोन मोठ्या दहशतवाद्यांचा शोध एटीएसकडून घेण्यात येत आहे. अब्दुल समद मलिक आणि फैजान बख्तियार अशी त्यांची नावे आहेत.
यातील अब्दुल समद मलिक हा एटीएसच्या टॉप लिस्टमध्ये आहे. अब्दुलने २०१९ ते २०२२ या कालावधीत अलिगड मुस्लिम विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. तसेच फैजान बख्तियार हादेखील अलिगड इसिस मॉड्यूलशी संबंधित असून अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसकडून आणखी एक संशयित दहशतवादी हरीश फारुकीचाही शोध घेण्यात येत आहे. एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून त्याच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, हरीश फारुकी हा सुद्धा एएमयूचा विद्यार्थी राहिला आहे. या सगळ्यांमुळे अलिगड मुस्लिम विद्यापीठ हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.