‘हमास’, हुती आणि हल्ला

12 Nov 2023 21:18:47
The curious case of Houthi-Hamas comradeship

मध्य-पूर्वेतील येमेनमधील अंतर्गत संघर्ष नेहमीच, या ना त्या कारणाने उफाळून येत असतो. या वादाची सुरुवात २०१४ साली झाली होती, जो अजूनही संपण्याची शक्यता नाही. आता या वादाचे नवे रूप इस्रायल आणि ’हमास’ युद्धामुळे समोर आले आहे. गाझापट्टीवर इस्रायलकडून सुरू असणार्‍या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ’हुती’ने इस्रायलवर मिसाईल हल्ले केले. यानंतर ’हुती’-येमेन संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. ‘हुती’ संघटना काय आहे, येमेनसोबत त्यांचा संघर्ष का आहे आणि इस्रायल-‘हमास’ युद्धात ’हुती’ने उडी का घेतली, हे जाणून घेऊया.

‘हुती’ बंड प्रामुख्याने जैदी शिया मुस्लीम आंदोलन असून, ’हुती’ बंडखोरांना ‘अंसार अल्लाह’ या नावाने ओळखले जाते. शिया मुस्लिमांनी सुन्नी मुस्लिमांसोबतच येमेनच्या लाखो लोकांचे समर्थन मिळवले. येमेन सरकारच्या विरोधात धार्मिक आणि राजकीय विरोधाच्या रुपात, हे आंदोलन २०००च्या दशकात सुरू झाले. जैदी समूहाचे धार्मिक नेते आणि येमेनचे माजी खासदार हुसेन बद्रुद्दीन अल-हुती यांच्या नावावरून हे आंदोलन ओळखले जाऊ लागले. २००४ साली हुती यांच्या अटकेनंतर हुती बंडाची सुरुवात झाली. स्थानिक अडचणी, सरकारचा वाढता भ्रष्टाचार आणि वाढता राजकीय अन्याय यांविरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन उभे राहिले, ज्याला पुढे येमेनच्या जनतेचेही मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले.
 
सप्टेंबर २०१४ साली हुती बंडखोरांनी येमेनची राजधानी सनावर नियंत्रण मिळवले. जानेवारी २०१५ मध्ये बंडखोरांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. वाढता विरोध पाहता, येमेनचे पंतप्रधान मोहम्मद बसिंदवा आणि राष्ट्रपती हादी यांच्या राजीनाम्याने आणि एकता सरकार स्थापन झाल्याने ’हुती’ शक्तिशाली संघटना झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर येमेनमध्ये अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली. यामुळे थोड्याफार बंडखोरीचे नंतर व्यापक संघर्षात रुपांतर झाले. ’हुती’ने पुढे कार्यशील सरकार स्थापन करत, त्यात दुसर्‍या समूहाच्या प्रतिनिधींचाही समावेश केला. सरकारचे प्रमुख म्हणून दक्षिणी येमेनमधील अदनचे राज्यपाल अब्देल अझीज बिन हब्तुर यांची नियुक्ती केली. सरकार स्थापन केल्यानंतर ७० ते ८० टक्के येमेनवासी ’हुती’च्या नियंत्रणाखाली आले. ’संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने २०२० साली पहिल्यांदाच ’हुती’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.
 
दरम्यान, ’हुती’ बंडखोरांना इराणकडून सैन्य प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रांची मदत केली जाते. ही मदत २०१२ पासूनच पोहोचवली जात होती. मात्र, ही बाब २०१४ साली राजधानी सनावर ’हुती’ बंडखोरांनी नियंत्रण मिळवल्यानंतर प्रत्यक्षात समोर आली. विशेष बाब म्हणजे, हुती आणि इराणने राजनैतिक संबंधदेखील स्थापन केले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीत राजदूतांची नियुक्ती केली आहे. येमेन संघर्षाला इराण-‘हुती’ मैत्रीची किनार आहे. येमेनमुळे इराण-सौदी अरेबियाचे संबंध बिघडले होते. येमेन संघर्षात आतापर्यंत तब्बल ३ लाख, ७७ हजार मृत्यू झाले आहे. सर्वाधिक दारिद्य्ररेषेखाली असलेल्या देशांमध्ये येमेन अग्रक्रमावर आहे. सद्यःस्थितीत ’हुती’ समूहाने राजधानी सना आणि आसपासच्या प्रदेशावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. ’हुती’कडे पर्याप्त सैनिक, हवाई जहाज, ड्रोन, मिसाईल आहे. वेळोवेळी इराणच्या मदतीने ’हुती’ची सैन्य शक्ती वाढत गेली. ज्यामुळे येमेन शांत होण्याऐवजी आणखी पेटत गेले.

इस्रायल-’हमास’ युद्ध केवळ दोन प्रांताचे युद्ध उरलेले नाही. यामध्ये अनेक देश प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी झाले आहेत. अमेरिकेने तर इस्रायलला जाहीर समर्थन दिले, तर अनेक आखाती देश ‘हमास’च्या बाजूने आहे. ’हुती’ समूह या युद्धाच्या आडून आपले हित साधत आहे. ’हुती’देखील ’हमास’सारखीच एक दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे ‘हमास’प्रमाणेच जागतिक स्तरावर आपली ओळख स्थापित करण्याचा ’हुती’ प्रयत्न करत आहे. आपल्या समूहाचा जागतिक स्तरावर प्रचार करण्याचा हुतीचा इरादा तर आहेच; परंतु ’हुती’ला जन्म देणारा आणि खतपाणी घालणारा इराण आहे. ’हुती’च्या निर्मितीमागे आणि त्याला पोसण्यामागे इराणचा हात आहे. इराण इस्रायलच्या विरोधात असल्याने ’हुती’लाही खाल्ल्या मिठाला जागणे गरजेचे आहे. त्यामुळे ’हुती’ने आता ‘हमास’ची बाजू घेत, इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, जे ’हुती’ला कधीही परवडणारे नाही.

७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0