कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पहिल्या महिला अभियंता म्हणून रोहिणी लोकरे यांनी आपल्या कामातून समाजात एक विशेष स्थान मिळविले आहे. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
रोहिणी लोकरे या गेल्या ३४ वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत कार्यरत आहेत. मूळच्या नाशिकच्या असलेल्या रोहिणी या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या त्यांच्या वडिलांची शिस्त मिलिटरी खाक्यासारखी असल्याने अत्यंत शिस्तप्रिय घरात त्यांची जडणघडण झाली. रोहिणी यांचे व्यक्तिमत्त्व निर्भीड, शिस्तबद्ध आणि अभ्यासू बनले आहे. रोहिणी यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील. दि. ३१ मे १९६८ ला रोहिणी नक्षत्रात जन्म झाला, म्हणून त्यांच्या आजोबांनी त्यांचे नाव रोहिणी ठेवले. त्यांचे आजोबा सिन्नर तालुक्यात आहेर गुरूजी म्हणून आदरणीय होते. रोहिणी यांच्या आजोबांनी त्याकाळी त्यांच्या सर्व मुलींना उत्तम शिक्षण दिले.
त्यामुळे रोहिणी यांच्या आई सुशिक्षित आहेत. त्यांना वाचनाची आणि स्वयंपाकाची आवड. वडील शासकीय नोकरीत होते. रोहिणी यांना तीन बहिणी, एक भाऊ. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या सर्व मुलांना व्यवस्थित शिक्षण दिले. त्यांची मोठी बहीण ‘बीएसएनएल’मध्ये पर्यवेक्षक, धाकटी बहीण प्रतिभा यांना साहित्याची आवड असून, त्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापिका, तर सर्वात लहान बहीण पुण्याला ’डेकॉर’ कंपनीमध्ये व्यस्थापक आहे, त्यांचा भाऊ महाराष्ट्र शासनाच्या उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदावर आहेत.
रोहिणी यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातच कारकिर्द करायची, असे वडिलांनी सांगितले होते. जे काही करशील, ते उत्तमच झाले पाहिजे, असा त्यांच्या वडिलांचा आग्रहच होता. रोहिणी या अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने शाळेत दरवर्षी त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत. शालांत परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. रोहिणी यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने वडिलांनी शिक्षणासाठी बाहेर पाठवणे शक्य नसल्याने नाशिकच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून ’स्थापत्य अभियांत्रिकी’ची पदविका संपादन केली. त्यानंतर ‘बीटेक’ पदवी मिळवली. त्यांनी नॅचरोपॅथीमध्ये ‘एमडी’ केले आहे. १९८९ मध्ये त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बांधकाम विभागात सेवा करण्याची संधी मिळाली. कुटुंबीयांचाही त्यांना पाठिंबा होता.
शालेय जीवनापासूनच रोहिणी यांना समाजसेवेची आणि गरजूंना मदत करण्याची आवड होती. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात असताना, संध्याकाळी ५.३० वाजता महाविद्यालय संपल्यानंतर सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत शाळेत जाऊन दहावीच्या गरजू विद्यार्थिंनीना बीजगणित आणि भूमिती विषयाचे रोज दीड तास मोफत शिकवणी वर्ग त्या घेत असत व रात्री स्वतःचा अभ्यास करीत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी नोकरी करतानाच बिल्डिंग मॉडेल्स तयार करून, त्या विकत होत्या. त्याशिवाय ग्लास पेंटिंग, वूड पेंटिंगचे क्लासेसही घेत. १९८९ साली लग्न झाल्यानंतर त्या भिवंडीला आल्या. भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य रामकृष्ण ज्ञानदेव लोकरे यांचे चिरंजीव गिरीश लोकरे यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्या भिंवडीकर झाल्या. लग्नानंतर त्या कडोंमपामध्ये दि. १२ सप्टेंबर १९८९ ला रुजू झाल्या. कडोंमपाची पहिली महिला अभियंता म्हणून सुरुवातीची सात वर्षे त्यांनी बांधकाम मुख्यालयातच तांत्रिक तपासणीचे काम त्यांच्याकडे सोपवलेले होते.
१९९७ साली उपअभियंता पदावर बढती मिळाल्यावर, त्यांना फिल्डवर पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांचे अंगी असलेल्या सर्व गुणांना तिथे काम करताना वाव मिळाला. उपअभियंतापदी काम करताना त्यांनी प्रभागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा धडाका लावला होता. प्रत्येक कामात त्यांनी स्वतःचा सहभाग दिल्यामुळे कामाची गुणवत्ता आणि सुंदरता दोन्ही बाबतीत चांगलेच काम केले. त्यांच्यासाठी किरण बेदी यांचे ’आय डेअर’ तसेच इंदिरा गांधीचे आत्मचरित्र पुस्तके प्रेरणादायी ठरले आहेत. सध्या त्या महापालिकेच्या गृहप्रकल्प विभागाच्या तसेच पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्या आहेत. ’बीएसयुपी’ योजनेतील घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. शिवाय पर्यावरणाचेही कामासाठी विशेष मेहनत घेत आहेत .
रोहिणी मॅडम विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. महिलांसाठी अनेक वेळा ’आत्मसंरक्षण’ कार्यशाळा आयोजित करतात. दरवर्षी गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करतात. गेली सात वर्षे स्वतःचा घरचा गणपती स्वतः बनवतात. त्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शिक्षिकाही आहेत.
एकदा डोंबिवली गुरूमंदिर रोडला घरासमोरून जात असताना, अचानक तीन चोर आले आणि त्यांनी रोहिणी यांच्या गळ्यातले मंगळसूत्र खेचून पळून गेले. रोहिणी यांनी न घाबरता त्यांच्यामागे धावून, त्यांना पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे पोलिसांना पाच चोरांची टोळी मिळाली. रोहिणी यांना महिलांच्या प्रश्नाविषयी आस्था आहे. म्हणून गेली दहा वर्षं त्या महापालिकेच्या ’महिला अत्याचार निवारण समिती’च्या अध्यक्षा म्हणून काम करू शकल्या आहेत. रोहिणी यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अशा या शिस्तप्रिय, कुशाग्र अभियंत्या असलेल्या रोहिणी यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!