मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला एक चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली आलेल्या या चित्रपटाची जादु आजही कायम आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, आणि त्यांचे प्रत्येक संवाद हे प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. त्यापैकीच एक पात्र म्हणजे ‘गब्बर’. या पात्राचे नाव आणि त्यासाठी कलाकाराची निवड कसी झाली याचा खास किस्सा संगीतकार जावेद अख्तर आणि लेखक सलीम खान यांनी सांगितला. मनसेतर्फे आयोजित दीपोत्सव २०२३ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी सलीम-जावेदया अजरामर जोडीची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी शोलेचा हा किस्सा सांगितला.
जावेद अख्तर यांनी सांगितलेला किस्सा काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गब्बरसाठी डॅनीची निवड तुम्ही केली होती मग अमजद खान कसा काय आला? असा प्रश्न विचारला तेव्हा जावेद अख्तर यांनी अमजद खानची निवड आणि गब्बर हे नाव सुचणं याबद्दल सांगताना जावेद म्हणाले, “गब्बर हे नाव कसं आलं तुम्हाला माहीत आहे का? सलीम खान यांचे वडील मोठे पोलीस अधिकारी होते. त्यांचे किस्से मला सलीम खान सांगत असत. एकदा त्यांनी मला गब्बर नावाच्या डाकूचा किस्सा सांगितला. गब्बर नावाचा डाकू होता, तो कुत्रे पाळायचा, असा किस्सा मला सांगितला होता. आम्ही ‘शोले’ लिहायला बसलो तेव्हा व्हिलनचं नाव काय असेल यावर विचार सुरु होता आणि मला आठवलं मी त्यांना म्हणालो सलीम तुम्ही तो गब्बरचा किस्सा सांगितला होतात. आपल्या चित्रपटातल्या व्हिलनचं नाव गब्बर ठेवलं तर? क्षणाचाही विलंब न करता सलीम खान हो म्हणाले. सलीम खान यांनी हे नाव सांगितलं होतं आणि मी सुचवलं आणि शोलेतला व्हिलन गब्बर सिंग झाला.
अशी झाली अमजद खान यांची निवड
जावेद अख्तर म्हणाले, “१९६३ मध्ये मी एक युथ फेस्टिव्हल पाहिला होता. तिथे एक नाटक झालं होतं ज्याचं नाव होतं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ मी त्यात अमजद खानला पाहिलं होतं. मी आणि सलीम खान बरोबर काम करु लागलो तेव्हा मी सलीम खान यांना अनेकदा सांगितलं होतं, की अमजद खान नावाचा एक चांगला मुलगा आहे, चांगलं काम करतो. आम्ही ते विसरलोही होतो. शोले सिनेमासाठी गब्बर म्हणून कुणाला घ्यायचं? यावर आम्ही विचार करु लागलो तेव्हा मला सलीम खान यांनी सुचवलं की तुम्ही एका मुलाची तारीफ करत होतात त्याला बोलवू. आता अमजद खानचं काम मी पाहिलं होतं. पण त्याचं नाव सलीम खान यांनी सुचवलं. तुम्हाला मी जे दोन प्रसंग सांगितले त्यावरुन आमचं ट्युनिंग कसं होतं ते तुम्हाला कळलं असेल”, असे सांगत गब्बरचा किस्सा त्यांनी सांगितला.