नवी दिल्ली : अयोध्येतील शरयुघाट आज सायंकाळी साडेचोवीस लाख पणत्यांनी सजणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या यंदाच्या सातव्या दीपोत्सवासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सज्ज झाली आहे.
दीपोत्सवाच्या निमित्ताने रामनगरी अयोध्या नवा विक्रम करणार आहे. अयोध्येतील शरयु नदीवरील ५१ घाटांवर भव्य दीपोत्सव साजरा होणार आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण शहराची सजावट करण्यात आली आहे. यावेळी तुलसीदासकृत रामचरितमानसच्या सात भागांच्या सादरीकरणातून श्रीरामगाथा मांडली जाणार आहे. भारतीय आणि परदेशी कलाकार रामलीलादेखील सादर करणार आहेत. मुख्यमंत्री योगी यांच्या निर्देशानुसार दीपोत्सवाची तयारी करण्यात येत आहे. दीपोत्सवात 25 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी शुक्रवारपर्यंत सर्व घाटांवर साडेचोवीस लाख पणत्यांची मांडणी केली आहे.
विश्वविक्रमासाठी 12 निरीक्षक, 95 घाट प्रभारी आणि 1000 हून अधिक समन्वयकांची नियुक्ती राम की पौडी आणि चौधरी चरण सिंग घाटांवर करण्यात आली. त्यांच्या देखरेखीखाली दीपोत्सवाच्या दिवशी २४ लाखांहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यासाठी २५ हजार स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.यावेळी अयोध्येत तीन दिवस चार देशांतील रामलीला दाखवण्यात येणार आहेत. राम की पौडी येथे लाइट आणि साउंड शो, प्रोजेक्शन मॅपिंग केले जाईल. दीपोत्सवाचे साक्षीदार व्हावेत यासाठी 24 एलईडी व्हॅन शहरभरात 24 ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.