पाकिस्तानी वंशाच्या 14 जणांना नुकतेच स्पेनमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्यावर धर्मांतरण आणि दहशतवादी कृत्यासाठी युवकांना भरीस पाडणे, चिथावणे हे आरोप आहेत. हे 14 जण ’तहरीक-ए-लब्बैक’ म्हणजे ’टीएलपी’शी संबंधित. ’टीएलपी’ हा पाकिस्तानचा कट्टरपंथी राजकीय पक्ष. दुसरीकडे मक्का-मदिनामध्ये भीक मागणारी, चोरी करणारी गँग पकडली गेली. हे चोरटे भिकारीही पाकिस्तानीच. जगभरात गुन्हेगारी आणि लाचारीमध्ये पाकिस्तानचे नाव कूप्रसिद्ध. आता स्पेनमध्ये दहशतवादी विचार पेरणे, कृत्य करणे यांसाठीही पाकिस्तानीच अटकेत आहेत.
गेल्या 30 वर्षांत स्पेनमध्ये मुस्लिमांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली. सध्या स्पेनमध्ये नोंदणीनुसार 25 लाख मुस्लीम वास्तव्यास आहेत. मात्र, नोंद नसलेले आणखीन पाच लाखांच्यावर मुस्लीम आहेत, असा स्पेन प्रशासनाचा अंदाज. यातील बहुसंख्य मुस्लीम मूळचे मोरोक्कोचे. बांगलादेश, सेनेगल, अल्जेरिया आणि पाकिस्तानचे मुसलमानही स्पेनमध्ये राहतात. यामध्ये कैतालुनिया येथे एक लाख पाकिस्तानी मुस्लीम राहतात. स्पेनमध्ये मुस्लीम चार ते पाच शहरांमध्ये बहुसंख्येने राहतात. मात्र, ज्या शहरात ते बहुसंख्य आहेत, तिथे त्यांचे ’इस्लामिक ब्रदरहूड’च्या नावाने स्पेनशी नाते कमी आणि इतर मुस्लीम देशांशी नाळ घट्ट असेच दृश्य दिसून येते.तसे पाहायला गेले तर युरोपचा ’युरेबिया’ होतो की काय, असे पाश्चात्यांना सारखे वाटत असते. त्यातच स्पेन 800 वर्षे मुस्लीम शासकांच्या पारतंत्र्यात होता.
उत्तर आफ्रिकेतून आलेल्या मुस्लिमांनी स्पेनवर 800 वर्षं राज्य केले. यादरम्यान स्पेनच्या जनतेला अक्षरशःअमानवीय जगणे जगावे लागले. स्पेनच्या मूळ जनतेला कोणतेही स्वातंत्र्य नव्हते, स्पेनच्या ख्रिस्ती लोकांचे मुसलमांनापेक्षा उंच मोठे घर नसावे. तसेच ख्रिस्ती लोकांनी मुसलमांनाना घरात नोकर म्हणून ठेवू नये. समोरून जर मुस्लीम व्यक्ती आली, तर ख्रिस्ती व्यक्तीने मान तुकवून त्या मुस्लीम व्यक्तीला रस्ता मोकळा करून द्यावा. असे एक ना अनेक नियम मुस्लीम आक्रांतांनी स्पेनच्या ख्रिस्ती जनतेवर लादले. या शासकांनी स्पेनमधील चर्चही लुटले, तोडले आणि तिथे मशिदी उभ्या केल्या. स्पेनचे पूर्णतः इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 11व्या शतकाच्या अखेरीस मुस्लीम शासकांमध्येच फूट पडली आणि त्यांनी आपसात लढाया करायला सुरुवात केली. इसवी 1238 मध्येे स्पेनच्या ख्रिस्ती जनतेने मुस्लीम सत्तेशी दोन हात करणे सुरू केले. जवळ-जवळ 200 वर्षं स्पेनची ख्रिस्ती जनता आणि मुस्लीम शासक यांच्यात संघर्ष सुरू राहिला. शेवटी 14व्या शतकाच्या अखेरीस स्पेनवरची परकीय मुस्लीम राजवट संपुष्टात आली.
स्पेनचे हे स्वातंत्र्य अलौकिक होते. मुस्लीम शासक पराभूत झाल्यावर स्पेनच्या जनतेने देशभरातील इस्लामीकरणाच्या खुणा मिटवल्या. मुस्लीम राजवटीत चर्चेसना लुटून, तोडफोड करून 500 मोठ्या मशिदी बांधल्या होत्या. त्या मशिदींच्या जागी पुन्हा चर्च बांधण्यात आले. इतकेच काय तर 1502 साली स्पेनच्या नव्या प्रशासनाने आदेश दिला की, देशातील मुस्लिमांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा. या आदेशानुसार बहुसंख्य मुस्लीम ख्रिस्ती झाले. ज्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही, त्यांना स्पेनमधून बाहेर हकलण्यात आले. या सगळ्या काळात स्पेनमध्ये उरल्यासुरल्या कट्टरपंथीयांना सारखे वाटत होते की, आम्ही 800 वर्षे स्पेनवर राज्य केले. सगळा स्पेन आमचा गुलाम होता.
स्पेनचे इस्लामीकरण करून पुन्हा स्पेनवर सत्ता स्थापित करायची. याचबरोबर आज जगभरातले अनेक मुस्लीम देश स्पेनमध्ये मशिदी बांधण्यासाठी उत्सुक असतात. इथल्या मुस्लिमांसाठी काम करणार्या संघटनांना हे देश आर्थिक मदत पुरवतात. त्या आर्थिक मदतीने स्पेनच्या मुस्लिमांची स्थिती सुधारली का? तर नाही, उलट मागील काही वर्षांपासून स्पेनमध्ये हिंसक कट्टरतावाद पुन्हा डोके वर काढत आहे. स्पेनला पुन्हा इस्लामकडे नेण्याचा विचार इथे काही लोक करत असतात. ‘आम्ही राज्यकर्ते होतो, आता पुन्हा राज्य करणार’ या विचारांनी दहशतवादी विचार कृत्य करणार्यांविरोधात स्पेनने कंबर कसली आहे. स्पेनसारखेच आपल्या देशावरही शेकडो वर्षे जुलमी राजवट होतीच. त्या भूतकाळाचे दुःखद परिणाम आजही भारत भोगत आहे. स्पेनचे प्रश्न भारत नाही, समजणार तर दुसरे कोण?