मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिगद्दर्शक सुजय डहाके त्यांच्या आगामी 'श्यामची आई' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. १९५६ साली राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरत सुवर्ण कमळ पकावणाऱ्या श्यामची आई चित्रपटानंतर पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना कृष्ण धवल चित्रपट २१ व्या शतकात डहाके दाखवणार आहेत. ही या चित्रपटाची खासियत असून आणकी महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. 'श्यामची आई' चित्रपटात साने गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..' ही प्रार्थना नव्या सुरात आणि चालीत गुंफुन आपल्यासमोर गाणं स्वरूपात आणली आहे.
या गाण्यासंदर्भात बोलताना महेश काळे म्हणाले, "या गाण्यासंदर्भात मला आकाश पेंढारकर यांचा फोन आला. मला ते म्हणाले, 'तू गाणं गाशील का?', मी त्या गाण्याचे शब्द पाहिले आणि पहिल्या दोन ओळी ऐकून माझा गाणं गाण्याचा निर्णय पक्का झाला. 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे .'. कायम गायक म्हणून आपण तन्मयतेने तल्लीनतेने प्रेम वाटत असतो. पण त्याला जर सामाजिकभावनेची झालर मिळाली तर या सगळ्या कार्याला एक वेगळं स्थान प्राप्त होतं.किंबहुना मला असं वाटतं ज्या समाजाने मला प्रेम दिलंय त्या समाजाचं मी देणं लागतो. याचा विचार करताना या प्रार्थनेला चाल लावण्याचे भाग्य मिळणं ह्यातून समाजाची परतफेड करण्याची संधी मला मिळाली. हे गाणं नसूम प्रार्थना आहे, नव्हे एक संवेदना आहे".
चित्रपटाच्या निर्मात्यांनी महेश काळे ह्यांनी संगितबद्ध केलेली आणि गायलेली 'खरा तो एकाची धर्म' ही प्रार्थना जगभरातील सर्व शाळांसाठी खुल्ली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.
'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.