खासदार मोईत्रा यांच्या आवईप्रमाणेच केंद्र सरकारने आमचे फोन हॅक केले, अशी जुनीच बोंब नव्याने मारण्यात आली आहे. आपल्या ‘अॅपल’ कंपनीच्या फोनवर सरकार हॅकिंग करत असल्याचा संदेश आल्याचा दावा विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. मात्र, अशाप्रकारचे संदेश हा ‘फॉल्स अलार्म’ असण्याचीच शक्यता सर्वाधिक असून, असा संदेश १५० देशांमध्ये गेल्याचे स्पष्टीकरण कंपनी आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा विरोधी पक्षांचा धीर सुटू लागला आहे. सध्या जरी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल असला, तरीदेखील खरी परीक्षा २०२४ साली होणार असल्याची जाणीव या नेतेमंडळींना आहे. त्यातच दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामचंद्रांचे दर्शन सुरू झाल्यानंतर देशातील वातावरण नेमके काय होईल, हे सांगण्यास कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही. प्राणप्रतिष्ठेनंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू होईल. मात्र, देवाचे दर्शन घेण्यापासून, आचारसंहिता नागरिकांना रोखू शकत नाही. त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनता श्रीरामचंद्रांचे दर्शन घेईल. त्यामुळे विरोधी पक्ष असो किंवा त्यांच्या वेगवेगळ्या आघाड्या असो, काळजी प्रत्येकालाच. या पार्श्वभूमीवरच सध्या गोंधळलेल्या विरोधी पक्षांकडून एका मागोमाग एक चुका व्हायला प्रारंभ झाला आहे. अर्थात, या चुकांना रणनीती म्हणण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये आहेच!
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या आज लोकसभेच्या आचार समितीसमोर हजर होणार आहेत. खासदार मोईत्रा यांच्यावर त्यांनी दर्शन हिरानंदानी या व्यावसायिकाकडून पैसे घेऊन लोकसभेत अदानी समूहाविषयी प्रश्न विचारल्याचा आरोप आहेत. मात्र, दर्शन हिरानंदानी यांनी दिलेल्या कबुली जबाबात आणखी धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. त्यानुसार खासदार मोईत्रा यांनी त्यांचा लोकसभा पोर्टलचा मेल आयडी आणि पासवर्डच हिरानंदानी यांच्या हवाली केला होता. त्यानंतर हिरानंदानी यांनी दुबईमधून मेल आयडी आणि पासवर्ड वापरून स्वतःच अदानी समूहाविषयीचे प्रश्न अपलोड केले होते. या बदल्यात हिरानंदांनी यांच्याकडून खासदार मोईत्रा यांना महागडे कपडे, नट्टापट्टा करण्याचे महागडे सामान आणि अन्य काही लाभ मिळाले. त्याचप्रमाणे मोईत्रा यांनी आपला वापर करून घेतल्याचाही आरोप हिरानंदानी यांनी केला.
एखाद्या खासदाराने अतिशय संवेदनशील असलेला मेल आयडी आणि पासवर्ड तिर्हाईत व्यक्तीला देणे, ही गंभीर बाब आणि खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात आचार समिती या मुद्द्यावर सुनावणी करत आहे. मात्र, महुआ मोईत्रा आणि त्यांच्या भाटांनी या सर्व प्रकाराविषयी मी अदानी शेठजींविरोधात आवाज उठवते. म्हणून माझ्यावर अन्याय करण्यात येत आहे, अशी बोंब ठोकली. महुआ मोईत्रा प्रकरणी काही विशिष्ट प्रसारमाध्यमे आणि माध्यमकर्मी असे वळण देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, खासदार मोईत्रा यांचे प्रकरण हे अतिशय स्पष्ट असून, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ‘एनआयसी’ या पोर्टलचा एक्सेस तिर्हाईत व्यक्तीस दिला असल्याने, त्यांच्याविरोधात आचार समिती चौकशी करत आहे.
त्याचवेळी महुआ मोईत्रा या आपल्या नेहमीच्या आक्रस्ताळ्या शैलीत झाल्या प्रकाराचे समर्थन करत आहेत. त्याचवेळी कायदेशीर मार्गावर मात्र त्यांचे माघार घेणे सुरूच आहे. खासदार मोईत्रा यांच्याविरोधात पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या बातम्या दाखविणार्या प्रसारमाध्यमांविरोधातही त्यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र, आता मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी त्यांनी प्रसारमाध्यमांविरोधातील दावा मागे घेतला आहे. आता केवळ वकील जय अनंत देहाडराय आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधातच मानहानीचा दावा कायम राहणार आहेत. मात्र, त्यातही महुआ यांच्या वकिलांनी देहाडराय यांच्यासोबत ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे न्यायालयाने नैतिकतेची बूज ठेवण्याचे सांगून खटल्यातून माघार घ्यायला लावली आहे. त्यामुळे खासदार मोईत्रांचे समर्थन करणार्यांच्या बुद्ध्यांकाविषयी शंका घेण्यास जागा आहे.
खासदार मोईत्रा यांच्या आवईप्रमाणेच केंद्र सरकारने आमचे फोन हॅक केले, अशी जुनीच बोंब नव्याने मारण्यात आली आहे. आपल्या ‘अॅपल’ कंपनीच्या फोनवर सरकार हॅकिंग करत असल्याचा संदेश आल्याचा दावा विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. मात्र, अशाप्रकारचे संदेश हा ‘फॉल्स अलार्म’ असण्याचीच शक्यता सर्वाधिक असून, असा संदेश १५० देशांमध्ये गेल्याचे स्पष्टीकरण कंपनी आणि केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिले आहे. असाच प्रकार यापूर्वी ‘पेगासस’वरूनही करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे असे प्रकार करून लक्ष वेधण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही.
अर्थात, असे प्रकार अनेकदा मूळ विषयावरून लक्ष हटविण्यासाठीही केले जातात. खासदार मोईत्रा यांनी ज्याप्रमाणे व्यावसायिकासोबत संगनमत करून राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड केली, तसे आणखी प्रकार उघडकीस येण्याची भीती काही लोकांना वाट नाही ना; असाही मुद्दा यामुळे उपस्थित होतो. त्याचवेळी मोईत्रा प्रकरणाच्या मागे जॉर्स सोरोस तर नाही ना, अशी शंका भाजप नेते अमित मालवीय यांनी व्यक्त केली आहे. त्यात तथ्य नसेलच असे सांगता येणार नाही. कारण, सोरोस आणि त्यांच्या देशी इकोसिस्टीमने केंद्र सरकारविरोधात असे अनेक प्रकार यापूर्वी केले आहेत. त्यामुळे मोईत्रा प्रकरणामध्ये चोराच्या उलट्या बोंबांकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे.