इस्रायलपुढे शिवरायांचा आदर्श!

    01-Nov-2023
Total Views |
Chhatrapati Shivaji Maharaj War strategy

शत्रूला कात्रीत पकडल्यावर उगाच मोठेपणा दाखवून त्याला माफ करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात मारा किंवा मरा इतकाच पर्याय असतो. चारही बाजूंनी शत्रूने घेरलेल्या आपल्या स्वराज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवर दया न दाखविण्याचे जे धोरण स्वीकारले, त्यामुळेच हिंदवी स्वराज्य टिकू शकले. हिंदवी स्वराज्याप्रमाणेच इस्रायलही चारही बाजूंनी शत्रूने घेरलेला असल्याने इस्रायलने छत्रपतींचाच आदर्श ठेवला असून, ‘हमास’बरोबर युद्धबंदीची शक्यता फेटाळून लावली आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीत युद्धबंदी होणार नाही, असे जाहीर केल्यामुळे ‘हमास’चा जीव टांगणीला लागला आहे. इस्रायलने आता गाझा पट्टीत प्रत्यक्ष जमिनीवरून हल्ला सुरू केला असून, इस्रायली रणगाड्यांनी आणि लढाऊ विमानांनी गाझा पट्टीची राखरांगोळी करण्यास प्रारंभ केला आहे. या हल्ल्यात प्रामुख्याने ‘हमास’ची ठाणी आणि भुयारांचे जाळे नष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. काही दिवसांतच संपूर्ण गाझा पट्टीवर इस्रायली सैन्याची पकड बसेल आणि मग पळण्याचे मार्गही बंद होतील, याची पूर्ण कल्पना ‘हमास’ला आली आहे. म्हणूनच आता आणखी काही परदेशी ओलिसांना मुक्त करण्याची तयारी ‘हमास’ने दाखविली आहे. पण, इस्रायली नेतृत्व ‘हमास’चे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. किंबहुना, ‘हमास’ने आता सर्वच्या सर्व इस्रायली ओलिसांची जरी मुक्तता केली, तरी ‘हमास’विरोधातील सध्याची कारवाई सुरूच राहील, हे इस्रायलच्या सध्याच्या धोरणावरून स्पष्ट होत आहे.

‘हमास’ला पूर्णपणे नष्ट केल्यावरच आपण शांत बसू, हे इस्रायलने यापूर्वीच जाहीर केले होते. पण ‘बीबीसी’, ‘सीएनएन’, ‘अल-जझिरा’ वगैरे ‘हमास’प्रेमी प्रसारमाध्यमांनी इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त होणारी रुग्णालये, इमारती, सैरावैरा धावणारे नागरिक, अनाथ जखमी बालके वगैरेंची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसिद्ध करून इस्रायल म्हणजे कोणी राक्षस असल्याचे जे चित्र उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्यास इस्रायल कवडीची किंमत देत नाही.
 
इस्रायलने युद्धबंदी करावी, असा सल्ला देणारे हाच सल्ला ‘हमास’ला का देत नाहीत? ‘हमास’ने सर्व ओलिसांची सुटका करावी, असे का सांगत नाहीत? ‘हमास’ने आतापर्यंत केवळ चार ओलिसांची मुक्तता केली असून, त्यातील दोन अमेरिकी आणि अन्य दोन परदेशी आहेत. एकाही इस्रायली ओलिसाची मुक्तता ‘हमास’ने केलेली नाही. याशिवाय ‘हमास’कडून आताही इस्रायलवर रॉकेट्सचा मारा करणे सुरूच आहे. त्यांचे नेतेही रुग्णालये, शरणार्थींचे कॅम्प्स आणि नागरी वस्त्यांमध्येच आश्रय घेत आहेत. इस्रायलकडे अनाठायी मानवता नसल्याने, तो या ठिकाणांवर बिनदिक्कत हल्ले करीत आहे. इस्रायलचा आदर्श भारताने आपल्या डोळ्यांपुढे ठेवला असता, तर आजवर जे हजारो निरपराध नागरिक दहशतवादाला बळी पडले, ते वाचले असते.

भारतानेही आजवर पाकिस्तानशी चार युद्धे खेळली. प्रत्यक्ष युद्धात जरी भारताने विजय मिळविला असला तरी राजनैतिक विजयापासून तो नेहमीच दूर राहिला. १९६५च्या युद्धात जर तत्कालीन नेतृत्वाने ऐन मोक्याच्या वेळी अवसानघातकीपणा केला नसता, तर पाकव्याप्त काश्मीर आज भारतात असते. भारतीय फौजा लाहोरच्या वेशीवर धडका मारीत होत्या आणि केवळ दोन दिवसांत लाहोर भारतीय फौजांच्या हाती पडले असते. पण, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी युद्धबंदीची घोषणा केली आणि भारतीय फौजांना हात हलवीत परत यावे लागले. त्यांना लाहोरपर्यंतच्या मुलखावरील कब्जा कायम ठेवण्यास सांगण्यात आले नाही. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही तसाच भिजत पडला. पुन्हा १९७१च्या युद्धातही बांगलादेशाला स्वतंत्र केल्यानंतर झालेल्या तहात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेखही इंदिरा गांधी यांनी केला नाही. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे एक लाख सैनिक (युद्धबंदी) विनाअट सोडून दिले. ‘क्रॉनिक’ म्हणजे ’जुनाट आजार.’ हा वारंवार डोके वर काढतो आणि दर वेळी अधिक त्रासदायक ठरतो. भारतानेही पाकिस्तान नामक जुनाट रोगावर जालीम उपाय न योजल्याने दहशतवादाचा आजार बळावत गेला आहे.

पृथ्वीराज चौहानने जी चूक केली, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केली नाही. शत्रूला कधीच जीवंत सोडायचा नसतो, ही रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव अवलंबिली. त्यांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी हे धोरण न स्वीकारता बहलोल खानाला सोडून दिल्याने त्यांना महाराजांचा रोष पत्करावा लागला होता. परिणामी, तिरीमिरीत ते केवळ सात जणांसह शत्रूचा बिमोड करण्यास घोड्यावरून निघाले आणि त्यावरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे आधारले आहे. शिवरायांनी अफझल खानाला मारले आणि शाहिस्तेखानालाही मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या सुदैवाने त्याचे जीवावरील संकट बोटांवर निभावले. त्यांच्या या नीतीमुळेच हिंदवी स्वराज्य केवळ स्थापनच झाले असे नव्हे, तर ते भारतभर पसरले आणि भारताच्या भावी स्वातंत्र्ययुद्धाची प्रेरणा ठरले. पण, दुर्देवाने यातून स्वतंत्र भारतातील नेत्यांनी काहीच बोध घेतला नाही.

पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यायोग्य देश नाही आणि त्याचे नेतेही दगलबाज आहेत, याचा पूर्ण अनुभव असताना भारताने वारंवार या शत्रूवर दया दाखविली आहे. ती क्षमाशीलता वांझोटीच ठरली. पुढे कारगिलही घडले आणि नंतर २६/११चा हल्ला. तसेच इतरही अनेक हल्ले झाले. उरी आणि बालाकोटनंतर पाकिस्तान तुलनेने शांत आहे. कारण, त्याला आता कळून चुकले आहे की, भारतावर पृथ्वीराज चौहानचा नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवणार्‍या नेतृत्वाचे राज्य आहे.
 
पृथ्वीराजप्रमाणे दिलदारपणा दाखवून ‘हमास’ला आज माफ केले, तर उद्या ती संघटना दुप्पट शक्तीने इस्रायलवर तुटून पडेल. सुदैवाने इस्रायलमध्ये असे अवसानघातकी नेते नसल्यामुळेच त्याने गाझा पट्टीत व्यापक युद्ध छेडले आहे. ‘हमास’चा पुरता बिमोड केल्याशिवाय ते संपुष्टात येणार नाही. युद्धबंदी हा पर्यायच इस्रायलपुढे नाही.

राहुल बोरगांवकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.