कविमनाचा संघर्षयात्री ‘सखाराम’

01 Nov 2023 22:06:58
Article on Sakharam Shivaji Dakhore
 
रानावनातील दगडमातीशी संघर्ष करीत घडलेल्या कविमनाच्या ‘रानवाकार’ सखाराम डाखोरे यांचा जीवनप्रवास...

सखाराम शिवाजी डाखोरे यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील केहाळ. त्यांचा जन्म ’आंध’ या आदिवासी जमातीत झाला. प्रारंभापासूनच दारिद्य्र हे त्यांच्या पाचवीला पूजलेलेच. मुळात डाखोरे यांच्या कुटुंबाची शेती सावकाराकडे गहाण असल्याने व्यवस्थेने दाखवलेल्या वाटेने जाणे त्यांना भाग होते. म्हणूनच त्यांचे आईवडील शेतमजूर, बिगारी कामगार तसेच सालगडी म्हणून काम करीत असत. स्थालांतरितांचं जीवन जगणार्‍या सखाराम यांना शिक्षणासाठी अतोनात संघर्ष करावा लागला. शेतातील पळ्हाटी उपटण्याचे गुत्ते घेणे, गुरे राखणे, शेतमजूर म्हणून काम करणे अशी कामे त्यांना करावी लागली. त्यामुळे शिक्षणासाठी परिस्थितीशी लढण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. मुळात सखाराम डाखोरे यांना त्यांच्या मातोश्रीने ’मंजुळाबाई’ यांनी शिक्षणासाठी प्रेरणा दिली. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत केहाळ या जन्मगावी आणि जवळच असलेल्या येलदरी कॅम्प येथे झाले. लहानपणापासून सखाराम डाखोरे यांना भजनाची आवड. कारण, त्यांचे आजोबा कोंडिबा चिभडे (आईचे वडील) हे उत्तम भजनी होते. वाघ्या-मुरळीची कला ते सादर करायचे.

दरम्यान काम आणि शिक्षण अशा दोन्ही गोष्टी करणारे, सखाराम दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात नापास झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि इंग्रजी विषयात ते उत्तीर्ण झाले. परंतु, ही आनंदाची बातमी ऐकण्यापूर्वीच दुर्धर आजाराने, त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते. त्यानंतरही वडिलांच्या आधाराने व इच्छाशक्तीने ते पुढे शिक्षण घेत राहिले. त्यावेळी आपल्या तीन मुलांचा व एका मुलीचा सांभाळ करता यावा म्हणून वडिलांनी दुसरे लग्न केले. मग घरात आलेल्या ’वनमाला’ (आताची मंजुळाबाई) आईनेसुद्धा सख्ख्या मायेसारखा त्यांना जीव लावला.

त्यावेळी दारिद्य्र आ वासून उभे असतानाही, सखाराम यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. अकरावी ते ’एमए’पर्यंतचे शिक्षण सखाराम यांनी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, छ. संभाजीनगर येथे पूर्ण केले. त्यावेळीही आपल्या परिस्थितीची जाणीव असल्याने सखाराम यांनी कधीच आपल्या शिक्षणाचा बोझा कुटुंबावर होऊ दिला नाही. म्हणून शिक्षणापेक्षा जास्त वेळ त्यांचा वेगवेगळी कामे करण्यात जात असे. त्यावेळी पदवीचं शिक्षण घेताना वीटभट्टीवर काम, शेतमजुरी, पुढे ५०० रुपयांची शिपायाची नोकरी, पगार जास्त मिळेल म्हणून शाळेच्या गाडीवर क्लिनर, ड्रायव्हर अशी अनेक कामे सखाराम यांनी केली. पण, नोकरीमुळे पूर्णवेळ शिक्षणासाठी प्रवेश घेऊनही, त्यांना नियमित महाविद्यालयात जाता आले नाही. त्यानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालयात त्यांना ’बीएड’साठी प्रवेश मिळाला. तेव्हा मात्र नोकरी सोडून पूर्णवेळ नियमित शिक्षण त्यांनी घेतले. त्यातच वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर सखाराम कविता लिहू लागले. ’माय-बाप’ या कवितेने त्यांना खर्‍या अर्थाने कवी म्हणून ओळख प्राप्त करून दिली. दरम्यान, ’एमए’च्या द्वितीय वर्षाला असताना सखाराम यांनी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण केली.
 
त्यानंतर ‘बीएड’चे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ कार्यालयात राजपूत सरांना मदत म्हणून सामान्य लिपिक स्वरुपात तात्पुरती नोकरी करू लागले. पण, अध्यापक म्हणून काम मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष संपला नव्हता. कारण, शिक्षण संस्थांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी बर्‍याचदा त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. पण, अशा मार्गाने नोकरी मिळण्याचे त्यांचे उद्दिष्ट नसल्याने, त्यांनी नोकरीचे मिळवण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. मग पुढे जेईएस महाविद्यालय, जालना येथे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयासाठी अर्धवेळ शिक्षणसेवक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये वसईच्या अण्णासाहेब वर्तक पदवी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले आणि शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या ’आंध’ समाजातील सखाराम यांनी मुंबईनगरीत आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा ’रानवा’ हा पहिलाच कवितासंग्रह ‘डिंपल’प्रकाशन’ने प्रकाशित केला. त्यावेळी वर्तक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शत्रुघ्न फड यांचेही त्यांना बहुमोल सहकार्य लाभले.

दरम्यान, ज्या विद्यापीठात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, त्याच विद्यापीठात त्यांची ’बिरसाईता’ ही कविता नुकतीच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी ’मराठी व हिंदीतील आदिवासी कवितेचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर शिक्षण क्षेत्रातील ‘पीएचडी’ ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. तसेच त्यांची ‘चल जाऊ समिंदरा’, ‘बिरसा मुंडा आला’, ‘जिजाऊ मर्दानी’ ही गीतेही सुप्रसिद्ध आहेत. कोरोना काळामध्ये ’उलगुलान एक साहित्यिक चळवळ’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून, त्यांनी देशभरातील अभ्यासकांची ११६ व्याख्याने आयोजित करून आदिवासी समाजातील अनेक प्रश्न समाजासमोर आणले. दरम्यान, सखाराम डाखोरे यांची नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. अशा या हरहुन्नरी कविमनाच्या सखाराम यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी खूप सार्‍या शुभेच्छा!
 
९३५९६९२४५४
Powered By Sangraha 9.0