इराणसारखी मुस्लीम राष्ट्रे या हल्ल्याचे समर्थन करीत आहेत. दहशतवादास पाठिंबा देणार्या आणि त्यांना सर्वप्रकारची मदत करणार्या देशांचाही बंदोबस्त करायला हवा. आपल्या शत्रूचे नाक कसे ठेचायचे, हे इस्रायलला पुरेपूर ठाऊक आहे.
इस्रायल हा देश सर्व बाजूंनी मुस्लीम देशांनी वेढलेला असला तरी आपल्या दुर्दम्य शक्तीच्या जोरावर, या सर्व देशांच्या आव्हानांना तोंड देत आजही तितक्याच खंबीरपणे उभा आहे. लहानमोठी अनेक युद्धे होत असली तरी या देशाने आपले मनोबल कधीच सोडले नाही. ५० वर्षांपूर्वी १९७३ साली झालेल्या योम किप्पुर युद्धासारखा ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने दोन दिवसांपूर्वी इस्रायलवर भीषण हल्ला केला. १९७३ साली जे युद्ध झाले होते, त्यावेळी इजिप्त आणि सीरियाने इस्रायलने ताब्यात घेतलेला भाग पुन्हा परत मिळविण्यासाठी अचानक हल्ला केला होता. त्या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले होते. आता ‘हमास’ने अत्यंत पूर्वतयारी करून इस्रायलवर अग्निबाण डागले. थेट तेल अविव, जेरूसलेमपासून विविध शहरांवर त्यांचा मारा केला. केवळ अग्निबाणांचाच मारा केला असे नाही, तर सागरी मार्गाने, हवाई मार्गाने ‘हमास’ने इस्रायलमध्ये घुसखोरी केली. सीमेवर असलेले भक्कम कुंपण तोडून, त्या देशात घुसलेल्या ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांवर गोळीबार केला. नागरिक आणि सैनिकांना ओलीस ठेवले. पण, ‘हमास’चा हा हल्ला लक्षात घेऊन त्याविरुद्ध युद्ध पुकारण्यात आल्याची घोषणा इस्रायलने केली. आमच्या देशावर हल्ला करणार्यांना कायमची अद्दल घडेल असे उत्तर आम्ही देऊ, असे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायलच्या संरक्षण खात्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते लेफ्ट. कर्नल रिचर्ड हेच यांनी, ‘हमास’ने जो हल्ला केला, त्याची तुलना अमेरिकेवरील ‘९/११’ शी केली आहे. ‘हमास’च्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व ते करू, असेही या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे. ‘हमास’ने जमिनीवरून, हवाई आणि सागरी मार्गाने केवळ आमच्या लष्करावरच हल्ला केला नाही, तर त्यांनी नागरिकांनाही लक्ष्य केले, असे या प्रवक्त्याने सांगितले. गाझा पट्टीमध्ये एक पार्टी सुरू होती, त्यावरही हल्ला करण्यात आला. तेथून काहींचे अपहरण करण्यात आले. एका आजींनाही पळवून नेण्यात आले. ‘हमास’ने जो हल्ला केला, तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा, इस्लामच्या कायद्याचा भंग करणारा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. ‘हमास’शी हातमिळवणी करण्याची चूक इराण आणि हिजबुल्ला करणार नाहीत, अशी अपेक्षा या संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. ‘हमास’च्या हल्ल्यामध्ये शेकडो इस्रायली नागरिक ठार वा जखमी झाल्याचे लक्षात घेऊन इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर भीषण हवाई हल्ले केले. आमच्यावर युद्ध लादले गेले असल्याचे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
‘हमास’ने हा हल्ला का केला याची कारणे देताना, १६ वर्षांपासून गाझा पट्टीची आणि इजिप्तची करण्यात आलेली नाकाबंदी, वेस्ट बँकमधील शहरांवर केले जाणारे हल्ले, जेरूसलेममध्ये अल अक्सा मशीद परिसरात झालेला हिंसाचार आदी कारणे पुढे केली आहेत. ‘हमास’ने जो हल्ला केला, तो यशस्वी झाल्याबद्दल ‘हमास’चे नेते नमाज पढत असल्याची छायाचित्रेही झळकली आहेत. ‘हमास’ने या हल्ल्यात अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले. इस्रायलच्या ताब्यात जितके पॅलेस्टिनी आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी आवश्यक एवढे ओलीस आमच्याकडे आहेत, असे ‘हमास’च्या एका नेत्याने म्हटले आहे.
अमेरिका, युरोपमधील विविध देश, भारत आदी देशांनी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला लक्षात घेऊन इस्रायलला सर्व ती मदत देण्याचे घोषणाही अमेरिकेने केले आहे. अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौकाही तिकडे पाठविली आहे. ‘हमास’ने जो दहशतवादी हल्ला केला आहे, तो समर्थनीय मुळीच नाही. इराणसारखी मुस्लीम राष्ट्रे या हल्ल्याचे समर्थन करीत आहेत. दहशतवादास पाठिंबा देणार्या आणि त्यांना सर्वप्रकारची मदत करणार्या देशांचाही बंदोबस्त करायला हवा. आपल्या शत्रूचे नाक कसे ठेचायचे, हे इस्रायलला पुरेपूर ठाऊक आहे.
ब्रिटनमध्ये खलिस्तानी मोकाट
हरमनसिंग कपूर हे लंडन शहरातील एक हॉटेल व्यावसायिक. ते ब्रिटनमध्ये २६ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून येथे खलिस्तानी समर्थक सक्रिय आहेत. त्याबद्दलची एक क्लिप कपूर यांनी शेअर केली असता, त्यांना मोठ्या प्रमाणात धमक्या देण्यात आल्या, जी क्लिप व्हायरल करण्यात आली ती मागे घ्यावी आणि त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी हे तथाकथित खलिस्तान समर्थक आपल्याकडे करीत होते. पण, मी माफी मागण्यास नकार दिला, असे कपूर यांनी ठामपणे सांगितले. “लंडन शहरामध्ये मी सुरक्षित आहे, असे मला वाटले होते. पण, त्यांनी मला ऑनलाईन धमक्या दिल्या. त्यामुळे मला अत्यंत मानसिक त्रास झाला,” असे कपूर यांनी म्हटले आहे. “दि. २५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी त्यांनी मला लक्ष्य केले. ते माझेच शीख बांधव होते. पण, ते मला इजा करण्यासाठी आले होते. ते भारत, हिंदू आणि शीख यांना शिव्या देत होते. खलिस्तान समर्थकांनी त्याच्या मोटारीची नासधूस केली. पण, पोलिसांनी माझ्या तक्रारीची केवळ दखल घेतली, त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई केली नाही,”असे कपूर यांचे म्हणणे. हे पाहता खलिस्तानी समर्थकांचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. एखाद्या नागरिकावर जेव्हा हल्ला होतो, तेव्हा पोलिसांनी हल्लेखोरास पकडायला हवे. पण, कपूर यांच्या बाबतीत पोलिसांनी कोणत्याही खलिस्तान समर्थकास ताब्यात घेतले नाही. दि. ३० सप्टेंबर रोजी अनोळखी हल्लेखोरांनी हरमन कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दोन स्वतंत्र हल्ले केले. खलिस्तानविरुद्ध बोलल्याबद्दल कपूर यांना खुनाच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, असे असतानाही कपूर यांच्या निवासस्थानी धोक्याचा इशारा देणारी जी घंटा होती, ती प्रशासनाने काही दिवस आधी बंद केली होती. असे सर्व घडत असतानाही कपूर यांच्यासारखे असंख्य शीख बांधव खलिस्तान समर्थकांना धूप घालत नाहीत, हे अत्यंत अभिमानस्पद आहे. त्या देशात राहणार्या भारतीयांनीही कपूर यांच्यासारख्या व्यक्तीच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे.
हा कसला ख्रिस्ती धर्मगुरू! हा तर नराधमच!
स्वतःस ख्रिस्ती धर्मगुरू म्हणविणारा रॉबर्ट कार्टर नावाचा धर्मगुरू किती नीचपणे वागू शकतो, यावर अलीकडेच प्रकाश पडला आहे. ख्रिस्ती धर्मगुरू आपल्या संपर्कात आलेल्यावर किती लैंगिक अत्याचार करीत असत, याच्या बातम्या या आधी सर्वत्र झळकल्या आहेत, अशा धर्मगुरूंच्याबद्दल धर्मपीठानेही चिंता व्यक्त केली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अमेरिकेमध्ये घडला आहे. टेक्सासमधील ह्यूस्टन शहरातील एक ख्रिस्ती धर्मगुरू रॉबर्ट कार्टर याने २००८ साली एका सात वर्षे वयाच्या मुलीवर प्रथम बलात्कार केला. आता वरिष्ठ धर्मगुरू असलेल्या या नराधमाने त्या मुलीवर गेल्या १५ वर्षांमध्ये ६०० वेळा बलात्कार केला. ३९ वर्षांच्या या धर्मगुरूने आपल्या मुलीचा गैरफायदा घेतला, असे त्या मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. आता या नराधमावर, विविध ठिकाणी सदर मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. पण, एवढे आरोप होऊनही, त्या धर्मगुरूस अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही, याला काय म्हणावे! पांढरा झगा परिधान करणारे धर्मगुरू किती अमानुष कृत्ये करतात, त्याची कल्पना अशा घटनेवरून यावी.