जागे व्हा ! संस्कृती रक्षणासाठी थप्पड मारण्याची तयारी ठेवा : महंत श्री महावीर दास

08 Oct 2023 19:31:10
Mahant Shri Mahaveer Das On Culutre protection

ठाणे :
एका गालावर मारले की, दुसरा गाल पुढे करणे, अशी अंहिसा काय कामाची ? त्यापेक्षा आपला धर्म व संस्कृती रक्षणासाठी थप्पड मारण्याचीही तयारी ठेवा. असे ज्वलंत प्रतिपादन कबीर मठाचे महंत श्री महावीर दास यांनी केले.तसेच, अशा प्रकारच्या शिवशौर्य यात्रामुळेच समाज जागृत होत असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.

शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषद षष्ठीपूर्ती वर्ष निमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल ठाणे द्वारे शनिवार - रविवारी ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज शिवशौर्य यात्रा काढण्यात आली. या अनुषंगाने शनिवारी सायंकाळी टीप टॉप प्लाझा येथे झालेल्या समारोप सभेला महंत श्री महावीर दास यांनी संबोधित केले. याप्रसंगी, व्यासपीठावर आमदार निरंजन डावखरे, मुंबई क्षेत्राचे संघटन मंत्री श्रीरंग राजे,टीजेएसबीचे शरद गांगल, माजी नगरसेवक भरत चव्हाण, रमेश आंब्रे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ठाणे कार्यवाह अनंत करमुसे, दुर्गावाहिनीच्या साठे ताई आदी तर सभागृहात विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महंत श्री महावीर दास यांनी संबोधित करताना,गेली ७० ते ७५ वर्षे आपण केवळ 'जिहाद'ची चर्चा करत आहोत. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद ...या सर्वाचे मुळ कारण आपणच आहोत. आपल्या कुटुंबातील सदस्यांनी योग्य दक्षता घेतली तर कुणाची बिशाद आहे. आपण कमजोर व सुस्त आहोत, म्हणुनच त्याकाळात महमद गजनी, महमद घोरी सारख्यांनी आक्रमणे करून लूट केली. आताही आपल्या शिक्षण पद्धतीत आपला इतिहास आपली संस्कृती अत्यंत त्रोटकपणे शिकवली जाते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी महाराणी दुर्गावती याचा इतिहास केवढा महान आहे. शिवरायांच्या काळातच अनेक महात्मा झाले.याकडे महंत महाविर महाराजांनी लक्ष वेधले. पुढे बोलताना त्यांनी राजकिय प्रवृत्तीवर सडेतोड भाष्य केले.

जवाहरलाल नेहरू हे ब्राम्हण नसतानाही त्यांना पंडीत बिरुदावली लागली. संपुर्ण काश्मिरमध्ये नेहरू कुटुंबच नव्हते. तरी आपल्या माथी हे पंडीत असल्याचे मारण्यात आले. तेव्हा जागे व्हा.. जागृत व्हा ! असा उपदेश करून महंतांनी, एका गालावर मारले की, दुसरा गाल पुढे करणे, अशी अंहिसा काय कामाची, त्यापेक्षा आपल्या संस्कृती रक्षणासाठी थप्पड मारण्याची तयारी ठेवा. अशी ठाम भूमिका महंत श्री महावीर दास यांनी मांडली.

दरम्यान, वक्ते अनंत करमुसे यांनी, गांधीजी ऐवजी छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांना पुजाल तर, धर्म रक्षणासाठी संघर्ष करावा लागणार नाही. असे नमुद करून जर शिवाजी महाराज नसते तर, आपल्या इथेही गाझा पट्टी व हमास झाले असते. असे सांगितले.

शिवशौर्य यात्रेचे जोरदार स्वागत

शनिवारी ठाण्यात आगमन झालेली शिवशौर्य यात्रा शिवरायांच्या जयघोषात वाजत गाजत मार्गक्रमण झाली. रविवारी टेंभीनाक्यावर जैन समाजाच्या वतीने तसेच शिवसेनेच्या वतीने या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी कोकण प्रांत संयोजक संदीप भगत, बजरंग दलाचे सुरज तिवारी, रवींद्र पाटील व विजय पांडे तर विहिंपचे दीपक मेढेकर,सचिन म्हस्के,गोपाळ साबे शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, कमलेश चव्हाण, निखिल बुडजडे, स्वानंद पवार, जॅकी भोईर,नितेश ( आऊ ) पाटोळे, अश्फाक चौधरी, शिवसैनिक तसेच जैन समाजाचे उदय परमार, अशोक पारेख , रमेश जैन आदी उपस्थित होते. ठाणे शहरातुन ही यात्रा कळवा उपनगराकडे मार्गस्थ होऊन कळवा, वाघोबा नगर येथे चौक सभा झाल्यानंतर खारेगाव, शिळफाटा येथेही मोठी सभा पार पडली.

Powered By Sangraha 9.0