अमेरिकेतील अक्षरधाम, भगवंताचे अधिष्ठान....

    07-Oct-2023
Total Views |
baps-swaminarayan-akshardham-murti-pratishtha-ceremony-in-robbinsville

अमेरिकेतील रॉबिन्सव्हीलच्या अक्षरधाम या जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य मंदिराचे आज, रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. ‘स्वामी नारायण संस्थे’चे सध्याचे प्रमुख आणि भगवान स्वामी नारायण यांचे सहावे उत्तराधिकारी श्री महंत स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज विधिवत प्रतिष्ठापना होऊन, हे मंदिर जनतेसाठी खुले होईल. १८३ एकर परिसरात या भव्य मंदिराची दिमाखदार वास्तू उभारण्यात आली आहे. २0११च्या सुरुवातीस असे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा जो विचार ‘बीएपीएस’च्या नेतृत्वाने केला होता, तो २0२३ साली त्यांनी पूर्णत्वास नेऊन दाखवला. त्यानिमित्ताने या मंदिराची रचना आणि त्याचे तेथील हिंदू धर्मीयांसाठीचे विशेष महत्त्व यांची माहिती देणारा हा लेख...

भारताच्या क्षेत्रफळाच्या अडीचपट असलेल्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे एक टक्का म्हणजे साधारण ३ लाख, ३३ हजार इतकीच हिंदूंची लोकसंख्या अमेरिकेत आहे. त्यामध्येदेखील भारताव्यतिरिक्त अमेरिका, युरोप, कॅरेबियन, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इथून आलेले हिंदू असले तरी त्यात एकूणच लहान स्वरुपात भारताला पाहता येते. ते जसे विविध भारतीय भाषा, राज्ये, स्थानिक संस्कृती, आचारविचार आदीसंदर्भात दिसू शकते तसेच ते विविध पंथ आणि गेल्या काही शतकांतील महात्म्यांनी चालू केलेल्या संस्थात्मक पंथांतून आणि त्यांच्या देवळातून पण दिसून येते. त्यात शिर्डीच्या साईबाबांचे भक्त, शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त, स्वामी चिन्मयानंदांच्या ‘चिन्मय मिशन’मधील भक्त, सद्गुरूंची ‘ईषा फाऊंडेशन’, श्री श्री रविशंकर यांचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, स्वामी विवेकानंद यांनी स्थापलेली ‘वेदान्त सोसायटी’ असे अनेक असतात. पण, किंबहुना यासंदर्भात संख्येने सर्वात अधिक असू शकतील, अशी धार्मिक संस्था म्हणजे स्वामी नारायण मंदिराशी संलग्न असलेली ‘बोचनवासी श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण’ संस्था अथवा (इअझड) ही आहे.

अमेरिकेत अगदी सहज १ हजार, ४00च्या वर हिंदू मंदिरे आहेत. ती प्रामुख्याने न्यूयॉर्क, टेकसास, मॅसाच्युसेट्स या राज्यात येतात. ‘बीएपीएस’ने स्थापलेली मंदिरे बर्‍याच राज्यांत असतील, याबाबत शंका नाही. मात्र, २0११च्या सुरुवातीस जे काही भव्यदिव्य मंदिर बांधायचा विचार ‘बीएपीएस’च्या नेतृत्वाने केला होता, तो त्यांनी २0२३ पूर्णत्वास नेऊन दाखवला आहे. अशा या रॉबिन्सव्हील (ठेललळर्पीींळश्रश्रश) न्यूजर्सी, अमेरिका येथे साकार झालेल्या अक्षरधाम मंदिराची थोडक्यात माहिती समजून घेऊयात. भगवान स्वामी नारायण यांचे आध्यात्मिक पाचवे उत्तराधिकारी श्री प्रमुख स्वामी महाराज यांनी अमेरिकेत स्वामी नारायण अक्षरधाम मंदिर असावे, अशी त्यांच्या संप्रदायाला दृष्टी दिली. अनेक वर्षांपूर्वी दिलेला या विचारांचा कृतिशील संकल्प २0११ साली सोडण्यात आला आणि १२ वर्षांच्या तपश्चर्येनंतर हे मंदिर साकार झालेले आहे. आजपर्यंत अक्षरधाम मंदिर हे केवळ गुजरात आणि दिल्लीतच होते. आता तिसरे अक्षरधाम मंदिर हे न्यूजर्सीत उभे राहिले आहे.

या मंदिराची तशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. जगातले सगळ्यात मोठे मंदिर हे १२व्या शतकात कंबोडियात बांधलेले अंगकोर वाट. त्यानंतर जगातले सगळ्यात मोठे आणि भव्य मंदिर हे आता रॉबिन्सव्हीलचे अक्षरधाम ठरणार आहे. १८३ एकरच्या जमिनीवर ही २५५ फूट रुंदी, ३४५ फूट लांबी आणि १९१ फूट उंचीची वास्तू उभारण्यात आली आहे. प्रत्यक्ष देवळाच्या वास्तूवर, आवारात आणि परिसरात सुमारे एक हजार विविध प्रकारांची शिल्प आहेत. त्यात जसे प्राचीन भारतापासूनच्या ज्ञात स्त्री आणि पुरुष व्यक्ती दाखवल्या आहेत, तसेच त्यात भारतीय संगीताची विविध वाद्ये, नृत्यप्रकार आदी अनेक गोष्टी शिल्पाकृतीच्या माध्यमातून चितारलेल्या आहेत. एक प्रमुख आणि १२ इतर मंदिरे असलेला असा हा मंदिराचा आवार. या अवाढव्य बांधकामासाठी लागणारे विविध प्रकारचे दगड, माती वगैरे हे भारत, चीन, तुर्कस्तान, बल्गेरिया, म्यानमार, ग्रीस, इटली तसेच लॅटिन अमेरिकेतून आणण्यात आले. एकूण २९ ठिकाणांहून अशाप्रकारे विविध बांधकाम साहित्य अमेरिकेत दाखल झाले.

एवढेच नाही तर पर्यावरणाचे पुरेपूर भान राखत या मंदिरात परिसरात सौरऊर्जेस प्राधान्य दिले गेले आहे. या प्रकल्पाच्या नावाने ‘बीएपीएस’ संस्थेने जगभरात २०लाख झाडांचे वृक्षारोपण केले आहे. मंदिर बांधकाम आणि परिसराचे नियोजन करताना केलेला विचार आणि त्याला अनुसरून प्रत्यक्ष काळजीपूर्वक दाखवलेली कृतिशीलता, यामुळे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर भागापासून ६०मैलांवर तयार झालेला हा परिसर केवळ स्वामीनारायण भक्तांना अथवा फक्त हिंदूंनाच आकर्षित करणारा नसेल, तर प्रमुखस्वामी महाराजांच्या विचारानुसार हा परिसर आणि देऊळ हे कुठल्याही धर्म, पंथ, वंश आदी अनैसर्गिक विभागणीने मर्यादित राहणार नाही, तर सर्वांसाठी एक आध्यात्मिक आकर्षण ठरणार आहे.
 
पण, या सर्व कृतिशील योजनेतील सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रेरणादायी भाग आहे तो सेवाभावी कामाचा. गेल्या १२ वर्षांत या कामात ‘बीएपीएस’च्या भक्त समुदायाकडून केवळ आर्थिकच नाही, तर प्रत्यक्ष मदतीसाठी १२ हजार, ५0०स्वयंसेवी स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला. त्यात विविध वयोगटांतील स्वयंसेवक सहभागी होते. काहींनी वर्षभरासाठी शिक्षण थांबवून, तर काहींनी चांगल्या चालू असलेल्या नोकरी-धंद्यातून काही अवधी काढून येथे पूर्णवेळ कामासाठी दिला आणि हे कार्य ठरल्याप्रमाणे आणि वेळेत पूर्णत्वास जाईल, याची सामुदायिक जबाबदारी घेतली.

‘स्वामी नारायण संस्थे’चे सध्याचे प्रमुख आणि भगवान स्वामी नारायण यांचे सहावे उत्तराधिकारी श्री महंत स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या देवळाची दि. ८ ऑक्टोबरला विधिवत प्रतिष्ठापना होऊन ते जनतेसाठी खुले होणार आहे. त्यानिमित्त गेले काही दिवस येथे विशेष असे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले होते. दि. ३०सप्टेंबरला एका विशेष कार्यक्रमात विविध हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींना विशेष आमंत्रण होते. त्या कार्यक्रमात, श्री. महंत स्वामी महाराजांच्या हस्ते हिंदू स्वयंसेवक संघाचे माननीय संघचालक प्राध्यापक वेद नंदाजी यांचा विशेष सत्कारदेखील करण्यात आला.

२0१९-२0२३ या काळात ९ हजार, ४0८ महिलांनी अक्षरधाम मंदिर वेळेत पूर्ण होण्यासाठी स्वयंसेवी वृत्तीने स्वतःला झोकून दिले होते. दि. ३ ऑक्टोबरला ‘विशेष महिला दिन’ साजरा करण्यात आला, ज्यात महिलांचे घरातील आणि घराबाहेर विविध ज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय आदींमधील सहभागाचे महत्त्व यावर कार्यक्रम झाला. दि. ४ ऑक्टोबरला एका विशेष कार्यक्रमात बौद्धधर्मीय, तसेच ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मांच्या विविध प्रथांचे २०प्रतिनिधी आले होते आणि सर्वधर्मीय कार्यक्रम केला गेला. दि. ५ ऑक्टोबरला स्थानिक महापौर आणि इतर अमेरिकन राजकीय महत्त्वाच्या व्यक्तींनी येऊन, या मंदिर प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
जिथे मंदिर निर्माण प्रकल्पाची सांगता होणार आहे, तिथेच या वास्तूच्या निमित्ताने ‘समाजबांधणी’ प्रकल्पाची सुरुवात झालेली असेल आणि ‘समाजबांधणी’ प्रकल्प हा सातत्याने घडणारा प्रकल्प असेल. आज त्या प्रकल्पाची अमेरिकेत हिंदू आणि हिंदू नसलेल्या जनतेला पण विविध कारणांनी गरज आहे, असे वाटते. जेव्हा समाजात टोकाच्या भावनांचा, मग त्या सामाजिक विषयांवर आधारित असोत अथवा राजकीय कारणामुळे असोत; पण उद्रेक झालेला असतो, तेव्हा त्यातून इतर काही नाही, तर केवळ सामाजिक विचारवंतांसाठी चिंतेचेच वातावरण असते.

आज अमेरिकेत हिंदू हे वैचारिक हिंदूविरोधाला ज्याला इंग्रजीत ‘हिंदू फोबिया’ म्हणतात, त्याला तोंड देत आहेत. अशा ‘हिंदूफोबिया’चे दूरगामी परिणाम हे हिंदू समाजासाठी चिंतेचे ठरू शकतात. अशा काळात अक्षरधामसारखे मंदिर आणि त्याचबरोबर त्यांचे सामाजिक प्रकल्प हे येथील पुढील पिढीतील हिंदूंना नक्कीच प्रेरणादायी ठरतील. तसेच हिंदू नसलेल्या इतरांनीही ते आपल्या धर्माची एक देखणी ओळख करून देतील, जे अतिशय महत्त्वाचे आहे. राजकीय आणि इतर सामजिक भेद यांनी तर संपूर्ण अमेरिकन समाजाला ग्रासले आहे. देश अथवा समाज अशाने मोठा होऊ शकत नाही आणि मोठा असलेला तसा राहू शकत नाही. पण, जेव्हा समाजात केवळ ज्याला ‘बायनरी’ अर्थात फक्त आमच्या बाजूने अथवा विरुद्ध अशा दोन प्रकारांत बघितले जाते, तेव्हा वैविध्यतेने नटलेला समाज एकत्र कसा आणायचा, हे मोठे आव्हान असते. १९९३ साली अटलबिहारी वाजपेयी यांना एका अनौपचारिक कार्यक्रमात भेटण्याचा योग आला होता.

तेव्हा काही जण त्यांना आम्ही येथे अमेरिकेत मंदिरे कशी बांधत आहोत, हे सांगत होते. अटलजींनी शांतपणे ते ऐकले आणि म्हणाले, “ही मंदिरे समाजमंदिरे असून, अर्थात त्याचा उपयोग हा आध्यात्मिक कारणासाठी जसा होणे महत्त्वाचे आहे, तसाच तो समाजासाठी होणेदेखील गरजेचे आहे.” अक्षरधाम मंदिरातून जसा हिंदूंना धार्मिक गोष्टींसाठी उपयोग होणार आहे, तसेच ‘स्वामीनारायण संस्थे’च्या कृतिशील समाजसेवेमुळे, हे बांधकाम चालू असताना, ‘कोविड’काळात आणि इतर वेळेस पण सढळहस्ते स्थानिकांसाठी चालू राहिली होती, ती एक समाजमंदिराची प्रेरणाही नक्कीच देईल. विविध विचार, ध्येय, आवडीनिवडींमुळे समाजात जसे वैविध्य येते, तसेच चळवळी पण येत असतात. पण, ज्या चळवळी समर्थपणे उभ्या राहू शकतात, त्यांच्या पाठीशी भगवंताचे असे अधिष्ठान असावे लागते. अक्षरधाम, न्यूजर्सीच्या या देखण्या परिसरात आणि आध्यात्मिक मंदिरात ते नक्की आहे, असे वाटते. या मंदिराच्या उद्घाटनास आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

विकास देशपांडे
(लेखक अमेरिकेतील बोस्टनचे रहिवासी आहेत. ते सातत्याने मराठी आणि इंग्रजीत विविध विषयांवर लेखन करतात. व्यवसायाने पर्यावरणतज्ज्ञ असून अनेक समाजसेवी कामाशी ते संलग्न आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.