काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने तेथील स्थानिकांशी चर्चा करुन तेथील सद्यस्थिती, वास्तव जाणून घेण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न...
”भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरूष हैं। हिमालय इसका मस्तक हैं, कश्मीर किरीट हैं,” या शब्दांत भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीरसह भारतभूची महती वर्णिली होती. अटलजींनी हिमालयाला देशाचे मस्तक आणि जम्मू- काश्मीरला त्या मस्तकावरील अलंकार म्हणून संबोधले होते. काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या काही भागांत फिरताना खरोखरच अटलजींच्या ओळीची प्रचिती आली. वर्षभरापासून रखडलेली उत्तर भारताची यात्रा सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या दिवसांत अखेरीस पार पडली. पाच दिवसांच्या यात्रेतील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा असलेल्या जम्मूविषयी न लिहिणं माझ्या मनाला पटणारं नाही. सीमेपलीकडून होणार्या दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावाद्यांमुळे स्थानिकांमध्ये असलेली भीती, यातून काश्मीरचा विकास स्वातंत्र्यापश्चात खुंटला होता. तो ‘कलम ३७0’ रद्दबातल झाल्यानंतर आता मार्गी लागला आहे.
अमृतसरहून रस्ते मार्गाने आम्ही सकाळी ६ वाजता वैष्णवदेवीच्या पायथ्याशी कटरात दाखल झालो. पहाटेच्या शीतल चांदण्यात दिसणारं शेरावालीचं मंदिर आणि सकाळी हलक्याशा सूर्य किरणांत दिसणारं जम्मूच्या झाडीदार डोंगरांच विलोभनीय दृश्य पृथ्वीवरील स्वर्गाची अनुभूती देणारं असचं...पहाटेचं कोवळं ऊन ओसरलं की, लगोलग मी आणि माझे सहकारी मित्र बाहेर पडलो. तिथल्या स्थानिकांशी, व्यापार्यांशी, सैन्य दलाच्या काही जवान- अधिकार्यांशी अन् हेलिकॉप्टरच्या पायलटशी संवाद साधून वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला. कटरामधील व्यावसायिक रशपाल सिंह यांनी जम्मूची सद्यःस्थिती व्यक्त करताना, आपल्याला आता सुरक्षिततेची हमी वाटत असल्याचे सांगत केंद्र शासनाचे आभार मानले. ”हिंसाविरहित जम्मूचे आमचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे.
मुळातच जम्मू कधी अशांत नव्हते; परंतु फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या वक्रदृष्टीचा फटका आम्हालाही बसला, हे नाकारून चालणार नाही. केंद्र सरकारने इथे होणार्या दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात निर्विवाद यश मिळवले आहे. बदलत्या जम्मू-काश्मीरमध्ये देशभरातील मंडळींकडूनही पर्यटनाशिवाय उद्योग उभारणी, सेवा क्षेत्रासह इतर विकासात्मक बाबींना प्रारंभ झाला. त्यातून व्यापार आणि गुंतवणुकीत भरघोस वाढ झाली असून, स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. भयमुक्त जम्मू ते प्रगतिपथावर यशस्वी मार्गक्रमण करणारे जम्मू, असा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे साध्य झाला. त्यासाठी त्यांचे हृदयपूर्वक धन्यवाद!”
सैन्याच्या अधिकार्यांशी साधलेल्या संवादातून तिथल्या हिंसाचारात झालेली घट आणि परिणामी जनतेत निर्माण झालेला विश्वास याची शाश्वती पटली. ”जम्मूत हिंसाचाराच्या घटना कमी करण्यात आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, जनतेच्या मनात भिनलेली भीती बाहेर काढण्यात सरकारला अपेक्षित यश आले आहे. बारामुल्ला आणि अनंतनाग या अतिसंवेदनशील जिल्ह्यांत नागरिक मुक्तसंचार करीत असून, त्यांना दहशतवाद्यांची कसलीही भीती वाटत नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे स्थानिक पोलीस जे करू शकत नव्हते, ते केंद्राच्या निर्णयामुळे सैन्य सहजगत्या करीत आहे आणि यातूनच जम्मू-काश्मीरचा कायापालट होऊ लागला आहे,” अशी बोलकी प्रतिक्रिया हेलिपॅडच्या भागात तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली.
”इस देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान नहीं चलेंगे’ हे स्वप्न पूर्णत्वास घेऊन जाताना देशासाठी प्राणार्पण केलेल्या पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींच्या दृष्टिक्षेपातील या प्रदेशाचे नवे स्वरूप संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करीत आहे. सुरक्षिततेच्या हमीसह गुंतवणूक अन् औद्योगिक विस्तारासाठी निर्माण झालेले पोषक वातावरण, फुटीरतावाद्यांच्या भ्रमात अडकून दगडफेकीकडे जाणार्या हातांमध्ये केंद्र सरकारने आयआयटी-आयआयएमच्या उभारणीतून दिलेले प्रगतीचे पुस्तक जम्मूच्या नव्या पहाटेची सुरुवात आहे. सीमाभागात पायाभूत सुविधाच उभ्या करायच्या नाही, जेणेकरून शत्रू आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, अशी पराभूत मानसिकता मोडून काढून देशातील शेवटच्या गावाला मुख्य प्रवाहात जोडण्याची भूमिका घेतलेले केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या भयमुक्त आणि प्रगतिशील वाटचालीचे शिल्पकार आहे.
जनतेच्या सहभागाशिवाय हे शक्य नव्हतं आणि लोकांनीही देशभावनेला अंगीकारत देशाच्या एकतेसाठी सरकारला मदत केली, हे नाकारून चालणार नाही. औंदाच्या भेटीत वेळेअभावी जिथं जाता आलं नाही, तिथं वेळ काढून जायची खूणगाठ देखील मनाशी बांधली आहे. आपणही देशाचं अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीरला भेट द्यायला हवी आणि बदलत्या जम्मू-काश्मीरचे साक्षीदार व्हायलाच हवे!