नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट केला जाईल, अशी घोषणा केली आहे. शुक्रवारी दिल्ली येथे अतिरेकी प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते.
यावेळी अमित शहा यांनी येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवादी हिंसाचाराचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, अशी घोषणा केली आहे. तसेच नक्षलवाद हा मानवतेला शाप आहे आणि आम्ही त्याचा सर्व प्रकारांतून संपूर्ण नायनाट करण्याचा संकल्प केला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत डाव्या अतिरेकाला आळा बसला असून आता हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.
तसेच त्यांनी सांगितले की, २०२२ मध्ये गेल्या चार दशकांमध्ये सर्वात कमी हिंसाचार आणि सर्वात कमी मृत्यू झाले. २०१४ ते २०२३ दरम्यान, नक्षलवादी हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये ५२ टक्के घट झाली आहे. त्याच वेळी, हिंसाचारामुळे नागरिकांच्या मृत्यूमध्ये ६८ टक्के आणि सुरक्षा दलांच्या मृत्यूंमध्ये ७४ टक्के घट झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.