नाशिकच्या चित्रकर्ती विशाखा कुलकर्णी यांच्या अमूर्त शैलीतील कलाकृती या त्यांची ओळख निर्माण करून देणार्या आहेत. रंगलेपनातील नाईफ वा कुंचल्याची हुकूमत, रंगछटांचा रंगछायांशी होणारा लपंडाव आणि एकूणच कलाकृतीचा पृष्ठभाग... हे सारं विशाखा यांच्या स्वयंभू विचारशक्तीतून प्रकटलेलं असतं. म्हणूनच कदाचित त्यांच्या कलाकृती या वेगळ्या वैशिष्ट्य गुणांनी आलेल्या आहेत.
आकार, रूप, रंग आणि रेषा या दृश्य घटकांचा उपयोग करून अमूर्तकला प्रकारातून रचना बनविता येते. ही रचना दृश्य संदर्भांपासून काही अंशी स्वातंत्र्यासह अस्तित्त्वात असू शकते. पुनर्जागरण काळापासून १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत पाश्चात्य कला दृष्टिकोनाच्या तर्काने आधारलेली होती आणि दृश्यमान वास्तवाच्या भ्रमाची पुननिर्मिती करण्याचा प्रयत्न होता. १९व्या शतकाच्या अखेरीस अनेक कलाकारांना नवीन प्रकारची कला निर्माण करण्याची गरज भासू लागली. ज्यामध्ये तंत्रज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानात होत असलेल्या मूलभूत बदलांचा समावेश असेल. वैयक्तिक कलाकारांनी त्यांचे सैद्धांतिक युक्तिवाद ज्या स्रोतांमूधन काढले ते वैविध्यपूर्ण होते.
अमूर्त कला, अलंकारिक कला, नॉन ऑब्जेक्टिव्ह आर्ट आणि गैर प्रतिनिधित्त्वात्मक कला तसेच ‘नॉन रिप्रेझेंटेशनल आर्ट’ या सर्व जवळच्या संज्ञा आहेत .एकसारखे नसले तरी या सर्व संज्ञांचे समान अर्थ आहेत. ‘अॅब्स्ट्रॅक्शन’ कलेमध्ये प्रतिमेच्या चित्रणात वास्तवापासून दूर जाणे सूचित केलेले असते. उच्च दर्जाच्या सत्यतेचा उद्देश असलेली कलादेखील अमूर्त म्हणता येईल. किमान सैद्धांतिकदृष्ट्या... थोडक्यात, अमूर्तततेमध्ये ओळखण्यायोग्य कोणत्याही संदर्भाचा कोणताही आकलन होण्याचा भाग नसतो. भौमितिक अमूर्तता आणि गीतात्मक अमूर्तता दोन्ही सहसा पूर्णपणे अमूर्त असतात. आंशिक अमूर्ततेला मूर्त रूप देणार्या असंख्य कला चळचळींपैकी उदाहरणार्थ फॉसिझम असेल, ज्यामध्ये वास्तविकतेच्या तुलनेत रंग स्पष्टपणे आणि हेतुपुरस्पर बदलला जातो आणि व्यूबिझममध्ये जे चित्रित केलेल्या वास्तविक जीवनातील घटकांचे स्वरूप बदलते.
या सार्या बाबींचा विचार करता आपल्या ध्यानात येईल की, अमूर्त शैली प्रकाराला रसिक वर्ग कमी प्रमाणात लाभत असला तरी, जो लाभतो, तो दीर्घकाळासाठी रसिक बनतो. या शैलीत कलाकृती निर्माण करणारे दृश्य कलाकार हे आत्मानंदासाठी काम करतात, असेही निरीक्षणात आलेले आहे. अभिव्यक्तीवादी चित्रकारांनी, रंगलेपनात पृष्ठभागाचा ठळक वापर, रेखाचित्रातील अमूर्तता, अतिशयोक्ती आणि तीव्र रंग शोधले. हे रंग आणि त्यातील विशिष्ट छटा किंवा छाया, त्यांचं लेपन, त्यांचा पोत या सार्या गोष्टी म्हणजे त्या-त्या दृश्यकलाकाराची स्वत:ची ओळख असते.
ही सारी प्रस्तावना एवढ्याचसाठी की, नाशिकच्या चित्रकर्ती विशाखा कुलकर्णी यांच्या अमूर्त शैलीतील कलाकृती या त्यांची ओळख निर्माण करून देणार्या आहेत. रंगलेपनातील नाईफ वा कुंचल्याची हुकूमत, रंगछटांचा रंगछायांशी होणारा लपंडाव आणि एकूणच कलाकृतीचा पृष्ठभाग... हे सारं विशाखा यांच्या स्वयंभू विचारशक्तीतून प्रकटलेलं असतं. म्हणूनच कदाचित त्यांच्या कलाकृती या वेगळ्या वैशिष्ट्य गुणांनी आलेल्या आहेत. नाशिकच्या ‘नाशिक कला निकेतन’मधून त्यांनी जी. डी. आर्ट प्रथम श्रेणीत पूर्ण केलेले असून डिप. ए. एडदेखील प्रथम श्रेणीत पूर्ण केलेले आहे, त्यांना राज्यकला प्रदर्शनात पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या कलाकृतींना प्राप्त झालेले आहेत.
‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘ललित कला अकादमी, नवी दिल्ली’ यांसह अनेक गॅलरीसह राष्ट्रीय स्तरांवरील प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृतींनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. कलाप्रदर्शनांसह विविध कलाकॅम्पस, कार्यशाळा, सेमिनार्समध्ये त्यांनी यशस्वी सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या कलासाधनेमुळे त्यांच्या रंगांना आणि विषयांना अमूर्त शैलीत व्यक्त करण्याची त्यांची हुकूमत निश्चितच कौतुस्कास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या कलाकृती अनेक ठिकाणी संग्रहासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.
त्यांची तैल व अॅक्रॅलिक रंगांतील लॅण्डस्केप्स ही अनोख्या वैशिष्ट्यांनी नटलेली आहेत. त्यांनी अत्यंत सातत्याने कराव्या लागणार्या पेन-इंक-स्ट्रिपलिंग-रेंडरिंग्जद्वारे त्यांच्या काही कलाकृती साकारलेल्या आहेत. त्यांच्या शैली तंत्रातील वैविध्यपूर्ण हुकूमतीमुळे, त्यांची प्रत्येक कलाकृती ही स्मृतीप्रवण झालेली आहे. त्यांच्या कलाप्रवासास शुभेच्छा.
प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३