साधं १०० मीटर धावण्याचाही आधी तिटकारा येत होता. मात्र, आता त्यांच्यासाठी १०० किलोमीटर धावणे, ही अगदी सामान्य बाब ठरली. जाणून घेऊया डॉ. सोनाली शैलेश होनराव यांच्याविषयी...
स्वामी समर्थांची नगरी अर्थात अक्कलकोट येथे जन्मलेल्या सोनाली शैलेश होनराव यांची आई शिक्षिका आणि वडील इंजिनिअर. कामामुळे वडिलांची कायम बदली होत असे. कामानिमित्त त्यांना हैदराबाद, सिकंदराबाद, गोवा, छत्रपती संभाजीनगर, दुबई अशा अनेक ठिकाणी स्थायिक व्हावे लागले. त्यामुळे सोनाली यांनी इयत्ता पाचवीपर्यंत जवळपास पाच वेळा शाळा बदलल्या. इयत्ता दुसरी आणि तिसरी त्या दुबईत शिकल्या. यावेळी दोन वर्षं त्या अरबी भाषाही शिकल्या. पुढे सोनाली यांचे वडील व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. गोरेगाव येथील गोकुळधाम हायस्कूलमधून सोनाली यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
सोनाली यांना वाचनाची प्रचंड आवड होती. खेळाकडे त्यांचा फारसा कल नव्हता. शाळेत जेव्हा अगदी ५० मीटर धावण्याची स्पर्धा असायची, तेव्हा त्या मागे वळून बघत की, कुणी सोबतीला शेवट राहिले आहे की नाही. म्हणजेच, धावण्याआधीच त्या पराभव स्वीकारत असत. खेळाची कधीही आवड नसल्याने फक्त सहभाग घेणे अनिवार्य असल्याने, त्या खेळांमध्ये भाग घेत असत. बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मुंबईत मेडिकलसाठी प्रवेश न मिळाल्याने त्यांनी अखेर युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला. यावर आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली खरी; मात्र सोनाली यांच्या हट्टामुळे त्यांनी युक्रेनला जाण्यासाठी होकार दर्शविला. १९९२ साली त्या युक्रेनच्या डनेस्क शहरात मेडिकलच्या शिक्षणासाठी गेल्या.
त्यावेळी संपर्काची कुठलीही साधने उपलब्ध नव्हती. साधं एक पत्र पाठवलं किंवा टेलिग्राम केलं, तरीही ते पोहोचण्यासाठी जवळपास २० दिवसांचा कालावधी लागत असे. घरापासून इतक्या दूर आणि त्यातही तीन ते चार महिने बर्फवृष्टी. भारतातून पैसे पाठविता येत नसल्याने संपूर्ण वर्षभराचे पैसे आणि सर्व नियोजन करावे लागत असे. अशा वातावरणात सोनाली यांनी तिथे सात वर्ष एमडीचे (मेडिसीन) शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्या. सात वर्षांत त्या फक्त वर्षातून एकदा सुट्ट्यांमध्ये घरी येत असत. या काळात त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. १९९९ साली एमडी (मेडिसीन) झाल्यानंतर त्या मुंबईत परतल्या. आधी जेजे हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली. लग्नानंतर त्यांनी स्वतःचे क्लिनिक सुरू केले. त्यानंतर त्यांना मुंबईतीलच डायग्नोसिस सेंटरमध्ये नोकरी मिळाली. तेव्हापासून त्या आतापर्यंत याच ठिकाणी कार्यरत आहेत.
दरम्यान, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी चालण्यासह योगाचा सराव सुरू केला. २०१६ सालापासून त्यांनी धावण्याचा सराव सुरू केला. पुढे त्यांनी मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यास सुरुवात केली. मात्र, २०१७ साली स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे त्यांना तीन महिने प्लास्टर लावावे लागले. तीन महिन्यांनंतर चालायला लागल्यावर त्यांना सगळ्या गोष्टी गुगल आणि भूगोल वाचून नाही समजत, त्यासाठी गुरू लागतोच, याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार धावण्याला सुरुवात केली. सायकलिंगलाही प्रारंभ केला.
९० किमी अंतराच्या आणि जगातील सर्वात कठीण व अवघड मॅरेथॉनपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉमरेड मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी सराव सुरू केला. पुणे, लवासा, लोणावळा अशा अनेक ठिकाणी त्यांनी धावण्याचा सराव केला. २०२२ आणि २०२३ अशी दोन वेळा त्यांनी ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. १२ तास स्टेडियम रन, ‘टाटा अल्ट्रा रन’, ‘पुणे मॅरेथॉन’, ‘लाँगेवाला मॅरेथॉन’ अशा अनेक मॅरेथॉन त्यांनी वयाची चाळीशी ओलांडूनदेखील पूर्ण केल्या. सोनाली यांना मुलगी पृथा, पती शैलेश यांच्यासह धनंजय पाध्ये, कौशिक पंचाल, सतीश गुजरण यांचे सहकार्य लाभते.
“शेवटपर्यंत धावणे सुटू नये, असे वाटते. जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते. तब्येतीला झेपेल, जमेल तसा व्यायाम करायलाच हवा. कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरीही स्वतःसाठी किमान एक तास तरी काढायला हवा. २०१७मध्ये फ्रॅक्चर झाल्यानंतर मी धावू शकेल, असे वाटले नव्हते. मात्र, पतीच्या प्रोत्साहनामुळे आणि जिद्दीमुळे पुन्हा नव्याने उभी राहिले,” असे सोनाली सांगतात.
सोनाली यांनी ज्या गोष्टीपासून दूर पळण्यात धन्यता मानली, पुढे त्याच गोष्टीला त्यांनी आपल्या जीवनाचा भाग बनवले. साधं १०० मीटर धावण्याचाही आधी तिटकारा येत होता. मात्र, पुढे त्यांच्यासाठी १०० किमी धावणे, ही अगदी सामान्य बाब ठरली. डॉक्टर तथा धावपटू सोनाली शैलेश होनराव यांना आगामी वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
७०५८५८९७६७