जबलपूर : आगामी विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जबलपूरमध्ये 'वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान'ची पायाभरणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदींनी तेथील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, जगातील कोणत्याही देशात राणी दुर्गावती सारखी वीरांगणा असती तर त्या देशाने आपले गुणगाण गायले असते. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशानेही असेच करायला हवे होते. परंतु, आपल्या महापुरुषांना विसरले गेले.
तसेच त्यांनी राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्यात १२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. पाणी आणि गॅस पाइपलाइन असो किंवा चौपदरी रस्त्यांचे जाळे हे लाखो लोकांचे जीवन बदलणारे प्रकल्प आहेत. याचा फायदा शेतकरी व तरुणांना होणार आहे. तसेच नवीन कारखाने आणि प्लांट्स उभारुन तरुणांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, २०१४ पूर्वी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे व्हायचे. गरिबांवर खर्च होणारा पैसा काँग्रेसच्या तिजोरीत जात होता. परंतु, आमचे सरकार आल्यानंतर काँग्रेस सरकारने केलेल्या भ्रष्ट योजनांच्या विरोधात आम्ही स्वच्छता मोहीम राबवली, असे ते म्हणाले. सरकारी कार्यालयातून ११ कोटी बनावट नावे काढून टाकण्यात आली.
आता गरीबांचा पैसा लुटू देणार नाही आणि काँग्रेसची तिजोरी भरू देणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही जनधन, आधार आणि मोबाईल अशी त्रिमूर्ती निर्माण केली, ज्यामुळे काँग्रेसची भ्रष्ट व्यवस्था नष्ट झाली. तसेच चुकीच्या लोकांच्या हातात गेलेल्या २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे वाचवण्याचे कामही आम्ही केले असल्याचे त्यांनी सांगितले.