पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. या लेझर लाईटमुळे जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याला काही अंशी अंधत्व आल्याची घटना घडली आहे. तर, पुण्यात लेझरमुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची सुमारे १५ प्रकरणे समोर आली आहेत.
अनिकेत (वय 23) असे दृष्टीने अधू झालेल्या या तरुणाचे नाव आहे. अनिकेत मिरवणुकीच्या दिवशी पर्वती पायथा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. नाचत असताना डिजेवरील हिरवा लेजर लाईट त्याच्या एका डोळ्यावर पडला. त्यावेळी अंधारी आली. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जवळपास ७० टक्क्याने कमी झाल्याचे अनिकेत ने सांगितले.
यानंतर अनिकेत सिंहगड रस्त्यावरील दूधभाते नेत्रालयात गेला. येथे त्याला नेत्ररोगतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी उपचार केले. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. दूधभाते म्हणाले की, अनिकेतच्या डोळ्यावर लेजर लाईट पडल्याने त्याच्या नेत्रपटलावर रेटिना वर बर्न झाले आहे. आता त्याच्यावर उपचार सुरू असून तो बरा होत आहे असे डॉ. दुधभाते यांनी स्पष्ट केले.