मुंबई : कोविड केंद्रात झालेल्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरोधात गुन्हा दाखल केला. कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविड केंद्राचे कंत्राट सुजीत पाटकर व त्यांच्या भागीदारांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मिळाले होते. मात्र, या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या घोटाळ्याबद्दल आता नवीन बातमी समोर येत आहे.
सेंटरसंदर्भातील टेंडर निघाल्यानंतर सुजीत पाटकर यांनी लाइफलाइन कंपनीची स्थापना केली होती, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठिकठिकाणी अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले होते. मुंबईतील दहिसर येथेही एक कोविड केंद्र स्थापन करण्यात आले होते. हे कोविड सेंटर 242 ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आले होते. या केंद्रात आणखी 120 रेग्युलर बेड होते. सुजीत पाटकर यांना हे कोविड सेंटर उभारणीचे कंत्राट दिले होते. त्यासाठी सुजीत पाटकर यांनी रातोरात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीची स्थापन करून याचे टेंडर मिळविले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच केला आहे.
आता किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कागदपत्रे ट्वीट केली आहेत. संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांची कमाल, असे सांगत, लाइफलाइन कंपनीची स्थापना 26 जून 2020ला करण्यात आली, पण मुंबई महापालिकेचे टेंडर त्याआधी म्हणजे 22 जून 2020 रोजी काढण्यात आले होते. त्यातही मुंबई महापालिकेने लाइफलाईन कंपनीला 32.60 कोटींचे कंत्राट 19 जून 2020 रोजी दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.