महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडी आणि राजकीय स्थित्यंतरांमुळे कधी काय घडेल, याचा अंदाज बांधणे केवळ अशक्यच. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भरभक्कम बहुमताचे सरकार सत्तेत आल्याने उरलासुरला विरोधी पक्ष आता गलितगात्र ठरल्याने मोठमोठ्या राजकीय प्रस्थापितांसमोरही येत्या निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहेच. २०१९ मध्येही मोदींच्या करिष्म्यामुळे अशीच स्थिती तेव्हा अनेक विरोधी नेत्यांवर आली होती. आता महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण मतदारसंघात वर्षानुवर्षे चिकटलेल्या नेत्यांसाठी पक्षफुटी ही डोकेदुखी ठरली आहे. २०१९च्या मोदीलाटेत आपला पराभव होणार, याची एक हजार टक्के खात्री राहुल गांधींना होती. त्यामुळे त्यांनी संभाव्य मानहानिकारक पराभव आणि हक्काच्या मतदारसंघातून बेदखल होण्याच्या भीतीतून अमेठी सोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवली. अपेक्षेप्रमाणे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीत गांधींचा लाजिरवाणा पराभव झाला आणि वायनाडच्या जागेवरून विजयी होत, त्यांनी लोकसभा गाठली. हाच कित्ता शरद पवार गटाच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेदेखील गिरवत असल्याचे दिसून येते. अजितदादांचे बंड, भाजपचे बारामती लोकसभेवर असलेले विशेष लक्ष आणि सुनेत्रा पवारांच्या निवडणूक लढविण्याच्या चर्चेमुळे सुप्रियाताईंसाठी आता बारामतीचा किल्ला सर करणे अवघड दिसू लागले. परवा एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपल्याला वर्धा लोकसभेतून निवडणूक लढवायला आवडेल, असे विधान करून आपणही ’वायनाड शोधला’ हे जणूकाही जाहीरच करून टाकले आहे. गेल्या अनेक वर्षांत केवळ पवारांची कन्या आणि राजकीय उत्तराधिकारी म्हणूनच सुप्रियाताई बारामतीतून विजयी होत आल्या. त्यात अजितदादांचे योगदान सर्वाधिक होते, हे सर्वमान्य. मात्र, आता दादांनी थेट मोठ्या पवारांविरोधात शड्डू ठोकल्याने या लढाईत सुप्रियाताईंचाही निभाव लागेल का, असा सवाल खुद्द मोठ्या पवारांनाही पडला असावा. त्यामुळे पवार साहेब आणि सुप्रियाताई जाग्या झाल्या असून, बारामतीतील संभाव्य पराभवानंतरचा पर्याय म्हणून कदाचित त्यांनी वर्ध्याला निवडले असेल, तर हा पवारांचा नैतिक पराभव आहे, हे मात्र नक्की!
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दरबारातील सल्लागारांची देशात कायम चर्चा ऐकायला मिळायची. आर. के. धवन असोत किंवा वादग्रस्त तथाकथित आध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी, या सगळ्याच मंडळींनी दिलेले सल्ले अन् त्यातून उद्भवलेले वाद यामुळे इंदिरा अनेकदा अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. अशाच प्रकारे आता गांधींची तिसरी पिढी असलेल्या राहुल आणि प्रियांका यांच्या सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्याची प्रकर्षाने चर्चा होत आहे. प्रियांका यांचे सल्लागार प्रमोद कृष्णन यांनी प्रियांका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवतील, असे संकेत दिले आहेत. त्याला जोडूनच काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया द्वेत प्रियांका यांचे स्वागत केले आहे. राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्राकडे मोदी आणि शाह यांनी लक्ष केंद्रित केल्यानंतर आता काँग्रेसही आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवणार, याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रियांका यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून पक्षाची स्थिती सुधारण्याचे हे प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेससाठी कितपत फायदेशीर ठरतील, हा मोठा प्रश्न आहेच. २०१७ साली राजकीय अनुषंगाने उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून आपला पाया मुळासकट उखडून फेकला जाऊ नये, यासाठी प्रियांका यांच्यवर महासचिवपदाची जबाबदारी देऊन ’प्रतिइंदिरा’ म्हणून त्यांना प्रोजेक्ट केले खरे. परंतु, केवळ इंदिरा यांच्यासारखे नाक हा एकमेव ‘युएसपी’चा मुद्दा असलेल्या प्रियांका यांना उत्तर प्रदेशाने सपशेल नाकारले आणि सगळ्या जागांवर पराभवाची चव चाखायला लावली. हाच कित्ता काँग्रेस आणि प्रियांका जर महाराष्ट्रात गिरवू पाहत असतील, तर काँग्रेसची स्थिती ’आस्मान से गिरे और खजूर में अटके,’ अशी व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सरकारच्या माध्यमातून आपल्या पक्ष संघटना बळकट केल्या आहेत. शरद पवार गट आणि उबाठा गट यांचे एकूणच अस्तित्व किती आणि सध्याच्या भावनिक वातावरणाला निवडणुकीपर्यंत कायम ठेवून त्याचे मतात रुपांतरण करण्यात दोन्ही गट यशस्वी होतील का, याबाबत मोठी साशंकता आहे. या परिस्थितीत काँग्रेसची संघटनात्मक शक्ती या दोन्ही गटांपेक्षा कणभर अधिक असली, तरी सक्षम नेतृत्व नसल्याने महाराष्ट्र काँग्रेस गलितगात्र अवस्थतेत आहे. या गदारोळात जर प्रियांका लोकसभेसाठी महाराष्ट्रात आल्या आणि जर उत्तर प्रदेशच्या पराभवाची पुनरावृत्ती झाली, तर प्रियांका यांच्यासाठी तो दुसरा मोठा धक्का मानावा लागेल.