सिक्कीममध्ये ढगफुटी! अचानक आलेल्या पुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता

04 Oct 2023 13:29:23

Sikkim


मुंबई :
सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे अचानक ढगफुटी होऊन तिस्ता नदीला पूर आला आहे. यामध्ये तिथे असलेला लष्कराचा कॅम्प वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच २३ सैनिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
 
उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर ढगफुटी झाल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला पूर आला आहे. ३ ऑक्टोबरला पहाटे दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. नदीलगतच्या परिसरात असलेली लष्कराची छावणी पुराच्या तडाख्यात वाहून गेली आहे. यातील २३ सैनिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
ढगफुटीच्या घटनेनंतर तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढल्याने नदीलगतच्या परिसरात पाणी साचले. त्यामुळे अनेक घरात नदीचे पाणी शिरले. सिंगतमजवळच्या बारदांगमध्ये उभी असलेली लष्कराची वाहने पाण्यात अडकली आहेत.
 
अपघातानंतर बेपत्ता लष्करी जवानांच्या शोधासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. बचाव कार्यासाठी सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र जीवित हानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Powered By Sangraha 9.0