आचार्य म्हणजे शुद्ध आचरणाने परिपूर्ण असलेले दिव्योत्तम व्यक्तिमत्व अशा आचार्यांची प्रत्येक कृती व त्याचे सदाचारसंपन्न जीवन हे ब्रह्मचार्यांसाठी आदर्शांचा प्रेरक दीपस्तंभ असतो. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना ‘ब्रह्मचारी’ नावाने संबोधतात, ‘विद्यार्थी’ म्हणून नव्हे. कारण, विद्यार्थी म्हणजे केवळ विद्येला ग्रहण करणारा! पण, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरति- नेहमी ब्रह्मतत्वात विचरण करणारा!
ओ३म् अग्ने सुश्रव: सुश्रवसं मा कुरु।
यथा त्वमग्ने सुश्रव: सुश्रवा असि।
एवं मां सुश्रव: सौश्रवसं कुरु।
यथा त्वमग्ने देवानां यज्ञस्य निधिपा असि।
एवमहं मनुष्याणां वेदस्य निधिपो भूयासम्॥
(पारस्कर गृह्यसूत्र -२/४/२)
अन्वयार्थ
(अग्ने) हे अग्निस्वरूप परमेश्वरा! तुझी (सुश्रव:) कीर्ती सर्वत्र ऐकली जाते. (मा) मला (सुश्रवसं कुरु) कीर्तीयुक्त बनव. (सुश्रव: अग्ने) कीर्तीयुक्त अग्निरुपी परमेश्वरा! (त्वं) तू (यथा) जसा (सुश्रवा असि) अतिशय यशस्वी व सुकीर्तिमान आहेस, (एवम्) त्याचप्रमाणे (माम्) मला (सुश्रवः) श्रेष्ठ कीर्तिसंपन्न तथा (सौश्रवसम्)उत्तम कीर्तीची व ख्यातनाम अशी संतती असणारा (कुरु) कर ! (अग्ने) अग्निस्वरूप देवा! (यथा त्वम्)जसा तू (देवानां यज्ञस्य) दिव्य गुणांना धारण करणार्या व्यक्तींच्या ’यज्ञ’ म्हणजेच सर्व प्रकारच्या सत्कार्यांमुळे उत्पन्न झालेल्या (निधिपा) भांडारांचे रक्षण करणारा (असि) आहेस, (एवम्) त्याचप्रमाणे (अहम्) मी (मनुष्याणां) माणसांच्या (वेदस्य) ज्ञानरूपी (निधिप:) भांडारांचा, खजिन्याचा रक्षक (भूयासम् ) होऊ इच्छितो.
विवेचन
सत्य, ज्ञान व शुद्ध आचरणाशिवाय माणसाची निर्मिती होऊ शकत नाही आणि ही प्रक्रिया घडते, ती उत्तम आचार्यांच्या सान्निध्यात राहिल्याने! बालकांचा उपनयन संस्कार झाल्यानंतर शक्यतो त्याला जोडूनच वेदारंभ संस्कार करण्यात येतो. पण, काही कारणांमुळे त्यादिवशी शक्यच झाले नाही, तर दुसर्या दिवशी हा संस्कार केला जातो आणि समजा याही दिवशी जमले नाही, तर एका वर्षांनंतर हा संस्कार करण्याचे विधान आहे. सदरील संस्कार हा गुरुगृही म्हणजेच गुरुकुलात पार पाडला जातो. आई-वडील आपल्या बालकांना घेऊन गुरूंच्या आश्रमात येतात. त्यांच्या उपस्थितीत हा संस्कार संपन्न होतो. कदाचित याच समारंभात कुटुंबीयांकडून आपल्या मुलाला ज्ञानग्रहणासाठी व चौफेर व्यक्तिमत्व विकासासाठी दिला जाणारा भावपूर्ण निरोपदेखील आहे, असे समजावयास हरकत नाही.
’वेदारंभ’ म्हणजेच वेदविद्येच्या पठणाचा प्रारंभ! उपनयन संस्काराच्या माध्यमाने बालक-बालिकेला आचार्यांच्या जवळ (उप) नेणे (नयन) झाले. पण, हे सर्व कशासाठी? तर त्याला वेदज्ञान व इतर ऋषीप्रणित आर्ष ग्रंथांच्या ज्ञानप्राप्तीसाठी! आचार्यांच्या माध्यमाने विद्यार्थ्याला नवदृष्टी प्राप्त होते. उच्च ज्ञानाने परिपूर्ण अशा सदाचारी गुरूंच्या सान्निध्याने बालकांना वैदिक शिक्षण मिळावे व त्यांची शारीरिक, मानसिक, आत्मिक उन्नती साधली जावी, या उद्देशाने केला जाणारा हा ‘वेदारंभ’ संस्कार! आपल्या घरी मुला मुलींचा उपनयन (व्रतबंध) संस्कार करण्यात आला. म्हणजे सर्व काही झाले असे नव्हे, तर उपनयनाला क्रियात्मक रूप प्रदान करणारा भाग म्हणजेच ‘वेदारंभ’ संस्कार करणे, हे सर्व दृष्टीने इष्टतमच!
आता बालक हा ’ब्रह्मचारी’ आणि बालिका ही ’ब्रह्मचारिणी’ होणार, यासाठी तशा प्रकारचे आचार्य किंवा आचार्या असावयास हव्यात म्हणूनच तर आपली प्राचीन गुरुकुलीय शिक्षण व्यवस्था गुरुकुल म्हणजे गुरूंचे कुळ हे गुरुकुल शहर वा गावांपासून दूर पर्वत व वनराजीने नटलेल्या आणि खळाळणार्या नद्यांच्या काठांवरील निसर्गरम्य वातावरणात रमलेले असते. नानाविध दोष व विषयांच्या भोगविलासी प्रदूषणांपासून अलिप्त अशा एकांत पावनस्थळी गुरुकुलात राहिल्यास विद्यार्थ्यांचा मानसिक व आध्यात्मिक विकास साधणे सोपे जाते. यासाठी प्राकृतिक पर्यावरणाने वेढलेल्या शांत ठिकाणी गुरूंची आश्रमे असायची. मातृ-पितृकुळात असताना मुले ही आपल्या नातेसंबंधांच्या मोहबंधनांत व स्वार्थ वृत्तीत अडकलेली असतात, पण गुरुकुलात आल्यावर मात्र ही मोहबंधने किंवा कुटुंबाप्रतीचे आकर्षण राहत नाही.
गुरूंच्या या कुळात सर्वकाही समानच कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. जात-पंथ, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत अशा भेदभावना गुरुकुलामध्ये गळून पडतात. सर्वांना एकसमान जेवण, सारखीच वस्त्रे व अंथरूण-पांघरून, निवास व शिकवण्याची पद्धतदेखील एकसमानच! गुरुकुलीय व्यवहारात दृष्टीस पडणारा किती मोठा हा समतेचा सिद्धांत कुटुंबाच्या अथवा गावाच्या सर्व प्रकारच्या चिंतांपासून दूर असलेल्या या विद्यार्थ्यांना आता ’ब्रह्मचारी’ ही संज्ञा मिळणार, तर त्यांचा सर्वांगीण विकास साधणारे गुरू हे ’आचार्य.’ असे हे आचार्य म्हणजे साक्षात आई-वडील आणि ब्रह्मचारी म्हणजे जणू काही त्यांची मुलेच! असे हे आचार्य आपल्या ब्रह्मचार्याची अतिशय आप्तत्वाने काळजी वाहण्याचे कार्य करतात. दोघांचे निवासस्थान हे आश्रमच. येथे दोघेही एकमेकांचे सर्व प्रकारे रक्षण करतात. उपनिषदातील खालील मंत्रातून हीच भावना व्यक्त होतेय-
सहनाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥
समतेने परिपूर्ण अशा आश्रमात आचार्य व ब्रह्मचारी हे दोघे श्रमच श्रम करतात. व्यक्तिमत्वाचा सर्वंकष विकास आढावा यासाठी सतत तपोमय जीवन जगतात. ‘सदैव श्रमं नैव विश्रमम्!’
आचार्य म्हणजे शुद्ध आचरणाने परिपूर्ण असलेले दिव्योत्तम व्यक्तिमत्व अशा आचार्यांची प्रत्येक कृती व त्याचे सदाचारसंपन्न जीवन हे ब्रह्मचार्यांसाठी आदर्शांचा प्रेरक दीपस्तंभ असतो. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना ‘ब्रह्मचारी’ नावाने संबोधतात, ‘विद्यार्थी’ म्हणून नव्हे. कारण, विद्यार्थी म्हणजे केवळ विद्येला ग्रहण करणारा! पण, ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मणि चरति- नेहमी ब्रह्मतत्वात विचरण करणारा! ’ब्रह्म’ या शब्दाचे ईश्वर, ज्ञान, दिव्यता व महानता असे अनेक अर्थ होतात. जो या सर्वच अर्थांसमवेत नाते जोडून आपली प्रत्येक कामे करतो, तो ब्रह्मचारी! तसेच ब्रह्म म्हणजे वीर्यशक्ती आपल्या शरीरातील वीर्य या अमोघ धातूला नष्ट न करता, त्याचे कटाक्षाने रक्षण करतो, तोदेखील ब्रह्मचारी! थोडक्यात, ‘ब्रह्म’ या व्यापक अर्थाने उच्चारलेला ब्रह्मचारी हा त्या त्या बटूंना उच्च आदर्शांचे स्मरण करून देणारा आहे. ब्रह्मचर्य पालन म्हणजेच चारित्र्याचे रक्षण किंवा सदाचाराचे पालन करणे होय. अशा या गुरुकुलीय आश्रम व्यवस्थेत किमान वयाच्या २४ व्या वर्षांपर्यंत राहून ब्रह्मचार्याला पवित्र व्रत धारण करीत वेदविद्येला प्रारंभ करावयाचा आहे.
गुरुकुलाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना केवळ वेदज्ञान देऊन किंवा अक्षरी विद्या शिकवून साक्षर बनविले जात नाही, तर सर्व प्रकारच्या भौतिक ज्ञान-विज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञानदेखील दिले जाते. यालाच मुंडक उपनिषदात ’अपरा विद्या’ व ’परा विद्या ’असे म्हणतात, तर छान्दोग्य उपनिषदात ‘मंत्रविद्या’ व ‘आत्मविद्या’ या नावाने संबोधले आहे. अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत कोणकोणते विषय शिकवावेत? या संदर्भात शास्त्रात म्हटले आहे- ब्रह्मचार्यांना अष्टाध्यायी, धातुपाठ, महाभाष्य, निघंटू, निरुक्त, कोश, छंद, मनुस्मृती, विदुरनीती सूर्यसिद्धांत, पूर्वमीमांसा, वैशिषिक, न्याय, योग सांख्य हे दर्शन तसेच दहा उपनिषदे, वेदांत शास्त्र, ब्राह्मणग्रंथ, विविध गृह्यसूत्रे, वेद, उपवेद सुश्रुत, चरक, वाग्भट संहिता इत्यादी विविध विषयात पारंगत केले जावे. आधुनिक देशी-विदेशी अशा विविध भाषा, विज्ञान, संगणक विद्या, तंत्रविद्या, चिकित्सा, अभियांत्रिकी यासोबतच सामाजिक शास्त्रांचे ज्ञानदेखील विद्यार्थ्यांना देण्यात यावे. पण, त्या त्या विद्यार्थ्यांच्या आवड व इच्छेप्रमाणेच!
वरील सर्व विषयात भौतिक व आध्यात्मिक विद्यांचे ज्ञान दडलेले आहे. असे हे सर्व प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप मोठी तपश्चर्या करावयाची आहे. ज्याप्रमाणे अग्नी हा तप्त असतो, त्याचप्रमाणे गुरुकुलात शिकणार्या या ब्रह्मचार्याला तपस्वी बनावयाचे आहे. ‘वेदारंभ’ संस्काराच्या प्रारंभी वरील मंत्राच्या माध्यमाने ब्रह्मचारी हा अग्निकुंडातील अग्नीला एकत्र जमवतो. अग्नीचा संचय केल्याने तिची शक्ती द्विगुणीत आणि ती तितक्याच प्रमाणात प्रकाशमान होऊन सर्वांना आनंद, सुख, आरोग्य व प्रकाश देते. या अग्नीची सर्वत्र ख्याती पसरते. त्यामुळेच सर्वांत प्रथम हा ब्रह्मचारी अग्नीला उद्देशून म्हणत आहे - हे अग्नीरूप परमेश्वरा! तुझी ख्याती सर्वत्र पसरलेली आहे, तशीच ज्योतिष्मती अशी ख्याती माझीदेखील सर्वत्र पसरू दे. ज्याप्रमाणे तू दिव्यगुणांना धारण करणारा व सर्व प्रकारच्या निधींचा रक्षक आहेस, तसाच मीदेखील ज्ञानरूपी शक्तींचा रक्षक बनू इच्छितो. गुरुकुलात संपन्न होत असलेल्या या ‘वेदारंभ’ संस्कारात स्वयंप्रकाशित होण्याचा प्रबळ आत्मविश्वास या ब्रह्मचार्याच्या मनात दडला आहे, याचे दर्शन वरील मंत्रातून घडते. (क्रमश:)
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८