140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या कृषिप्रधान देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि सिंधू यांसारख्या मोठ्या नद्या आहेत. अनेक कारणांमुळे नदी खोर्यांवर पडणारा ताण पाहता भारतातील नदी जोडप्रकल्पांचा आणि त्यांच्या परिणामांचा केलेला हा उहापोह...
जगभरातील नद्यांच्या खोर्यांप्रमाणेच, जागतिक हवामान बदल, प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा अनियंत्रित वापर आणि प्रदूषणामुळे, भारतीय नदी-खोर्यांवरही तीव्र ताण पडतो आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान होणारा भारतीय मान्सून हा भारतीय नदी खोर्यांमधील पाण्याचा प्राथमिक स्रोत आहे. जो देशाच्या वार्षिक पावसाच्या जवळपास 80 टक्के इतके पाणी आपल्याला देतो.
गेल्या काही दशकांमध्ये, पावसाळ्यात होणार्या सरासरी पर्जन्यमानात घट आणि अतिवृष्टीची तीव्रता तसेच अतिवृष्टीच्या घटनांच्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे. या बदलत्या हवामानामुळे भारतातील पूर आणि दुष्काळच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे आणि देशभरातील पाण्याच्या प्रणालीवरचा ताण वाढला आहे. या वाढत्या ताणाचा सामना करण्यासाठी, उपाय म्हणून भारताने 168 अब्ज डॉलर्सच्या प्रस्तावित बजेटसह आपल्या नद्यांवर मोठ्या प्रमाणात परस्पर जोडणी प्रकल्पांची योजना आखली आहे. या प्रस्तावात अंदाजे 15 हजार किमी लांबीच्या कालव्यांचे जाळे आणि तीन हजार जलाशयांचा समावेश आहे. ज्यामध्ये दरवर्षी 174 अब्ज घनमीटर पाणी, पाण्याची कमतरता असलेल्या खोर्यात पाठवले जाईल आणि सोबतच 34 दशलक्ष किलोवॅट वीजनिर्मितीदेखील केली जाईल. तसेच, पूरनियंत्रण, दुष्काळ-नियंत्रण यासारखे फायदेदेखील या प्रस्तावतून मिळणार आहेतच. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे, एकमेकांशी जोडलेल्या जलाशयांचा वापर करून, सध्या अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी जमिनीवर ठेवण्यासाठी ही महत्त्वाकांशी योजना आखलेली आहे. पण, या प्रकल्पांच्या आखणीत, नद्यांचे खोरे, हे एकमेकांपासून भौगोलिकदृष्ट्या जोडलेले नसल्याने, स्वतंत्र असावेत असे गृहीत धरावे लागले आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, हे बरोबर आहे का? का आपल्याला जलचक्राबद्दल अजून काही शिकणे बाकी आहे?
चीनमधील नदी एकमेकांना जोडण्याच्या प्रकल्पातून भूजलाचे स्थिरीकरण होत असल्याचे दिसून आले आहे. पण, अशा महत्त्वाकांक्षी योजनेचा आपल्याकडील जलपरिसंस्थेच्या पर्यावरणावर आणि मत्स्यविविधतेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, हे आपल्याला माहीत आहे. संशोधन साहित्यदेखील हेच दर्शविते की नदीचे नियमन वाढल्याने संबंधित क्षेत्रातील भूजलाचे प्रमाण वाढू शकते. म्हणून, पर्यावरणीय शाश्वतेला परस्परविरोधी उद्दिष्टांना एकत्रित आणून आणि पाण्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी इंटरलिंकिंगसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना काळजीपूर्वक डिझाईन करणे गरजेचे असते. हेच जलचक्र आणि पर्यावरणाचे अंतरिक संबंध समजण्यासाठी केलेल्या एक नवीन संशोधनाचा आढावा आज आपण घेणार आहोत.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी’ आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या सहकार्यांसोबत काम करत असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मधील सिव्हिल इंजिनिअर्स आणि हवामानशास्त्रज्ञांच्याटीमला मॉडेलिंगद्वारे असे आढळून आले आहे की, भारतातील नद्यांना एकमेकांशी जोडण्याची योजना अनवधानाने मान्सूनच्या पावसाचे प्रमाण आणि स्थान यावर नकारात्मक परिणाम करू शकते. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अभ्यासात, या गटाने विविध मॉडेलिंग तंत्रांचा वापर करून भारतातील हवामानाच्या प्रणालींमध्ये ‘इंटरलिंकिंग’ प्रकल्पामुळे अनपेक्षित बदल होण्याची शक्यता तपासली आहे.
भारतातील अधिकार्यांच्या हातावर एक स्पष्ट समस्या आहे ती म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अन्न कसे पुरवायचे, आर्थिक वाढ कशी टिकवायची आणि पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे, यापैकी ही शेवटची समस्या भीषण होत चालली आहे. भारताला आपल्या लोकांना खायला घालायचे असेल, तर त्याला अधिक अन्न पिकवायला हवे आणि त्यासाठी जास्त पाणी लागेल. मात्र, आपल्या देशात पाण्याची उपलब्धता कमी होत आहे.
आता, नद्या एकमेकांना जोडण्याचा प्रकल्प या प्रश्नावरचामहत्त्वाचा उपाय असला तरी ते इतकं सोप नाही. कारण, प्रत्यक्षात कोरड्या खोर्यांना या प्रकल्पाद्वारे पाणी देता येईल ना? होय, कोरड्या खोर्यांवरील पाण्याचा तत्कालीन ताण कमी करण्याची आणि देशाला अधिक व्यापक सिंचन क्षमता प्रदान करण्याची ताकद या प्रकल्पामध्ये निश्चितच आहे व पर्यायाने यामुळे अधिक अन्न आणि उत्तम जीवनशैलीदेखील प्रदान करता येईल. परंतु, दुर्दैवाने अशा तीव्र बदलाशी संबंधित दीर्घकालीन वातावरणीय बदल आपल्याला अजून समजत नाहीत आणि म्हणूनच या अशा संशोधनांची गरज आहे.
या अभ्यासाच्या संशोधकांनी गंगा, गोदावरी, महानदी, कृष्णा, कावेरी आणि नर्मदा-तापी या देशातील प्रमुख नदी खोर्यांचे विश्लेषण केले आहे. ही खोरी एकमेकांशी जोडलेली आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी अनेक पद्धती वापरल्या आहेत. आधी नमूद केल्याप्रमाणे, आत्तापर्यंतच्या संशोधनातून असेच माहीत होते की, भौगोलिकदृष्ट्या खोरी जर विलग असतील, तर ती वेगळी असतात. पण, या संशोधनातून कळू लागले आहे की, खोरी वातावरणाद्वारे जोडलेली असतात. एका खोर्यातून होणार्या बाष्पीभवनाने दुसर्या खोर्यात पाऊस पडू शकतो. एका खोर्यातून दुसर्या खोर्यात, वारे आर्द्रता अर्थात हवेतील पाणी वाहून नेत असल्याने, वातावरणातील (खपींशीलेपपशलींळपस श्रळपज्ञी) दुवे तयार होतात.
या अभ्यासात नमूद केले आहे की, सर्व खोर्यांमधील जमीन आणि आर्द्रता मापदंडांमध्ये अनेक संबंध सापडतात. पृष्ठभागावरील मातीची आर्द्रता वेगवेगळ्या नदीच्या खोर्यांमध्ये असली तरी ती जोडलेली असते. काही खोरी (खपलेाळपस श्रळपज्ञी) येणार्या दुव्यांपेक्षा जास्त (र्जीींसेळपस श्रळपज्ञी) बाहेर जणारे दुवे दाखवतात. उदाहरणार्थ, गंगा खोर्याची जवळपास सगळ्या नदी खोर्यांशी आर्द्रतेची ‘आऊटगोईंग’ लिंक आहे. मात्र, गंगा खोर्यात महानदी आणि गोदावरी खोर्यांमधून येणारे दुवेदेखील आहेत. जमीन-वातावरणाचे हे साद-प्रतिसाद दुवे, मान्सूनचे पुनर्विनीकरण करते आणि पावसाचे प्रमाण प्रभावित करते. याच दुव्यांवर वरील संबंधित खोर्यातील पावसाचे प्रमाण आधारित असते.
दुसरीकडे, कावेरी खोर्यात इतर सर्व खोर्यांमधून मोठ्या प्रमाणात येणारे दुवे आहेत. पूर्वीचे संशोधन साहित्य दाखवते की, कावेरी खोर्यात शेजारच्या प्रदेशातून बाष्पीभवनाने होणार्या पुनर्विनीकरणामुळे अधिक प्रमाणात पाऊस पडतो म्हणून, दक्षिण भारतातील खोर्यात परत जाणार्या मान्सूनमुळे देखील पाऊस पडतो. पण, आत्ताच्या काळात, तुम्ही कावेरी संबंधित पाण्याच्या कमतरतेने होणारे वाद बघू शकता आहात. याचा अर्थ, नदीच्या खोर्यांमध्ये ’डोनर बेसिन’ आणि ’रिसीव्हर बेसिन’ असण्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, हे वातावरणीयमार्गांद्वारे ओलाव्याच्या निव्वळ हस्तांतरणावर अवलंबून असू शकतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या नदी खोर्यांमधील आर्द्रता, पाण्याचे प्रमाण, दमटपणा आणि तापमान या दुव्यांचे चक्र चालू ठेवायला महत्त्वाच्या गोष्टी ठरतात.
संशोधनातून पुढे असे आढळते की, वेगवेगळ्या नदीच्या खोर्यांमधील येणार्या आणि जाणार्या अशा दोन्ही दुव्यांची उपस्थिती दर्शवते की, एका खोर्यातील मातीचा ओलावा दुसर्या खोर्यातील मातीचा ओलावा कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो. अशाप्रकारे, जरी भौगोलिकदृष्ट्या न जोडलेले खोरे एकमेकांपासून थेट पाणी हस्तांतरित करू शकत नसले तरी, आपण इतर अप्रत्यक्ष दुवे पाहू शकतो जे हवामान आणि वातावरणीयघटकांद्वारे क्षेत्राच्या एकूण तापमानावरदेखील परिणाम करतात. तापमानातील बदलाचा वार्याच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम परिसरात होत असलेल्या पर्जन्यमानावर होतो. त्यामुळे या सर्व घटनांची साखळी एकाच वेळी वेगवेगळ्या खोर्यांमधील जमिनीतील ओलावा नियंत्रित करू शकते. अशा प्रकारे या संशोधनातून, खोरी वातावरणातून कशी जोडलेली असतात हे आपल्याला कळते.
बाष्पीभवनाद्वारे पुरविलेल्या ओलाव्यामुळे त्याच खोर्यामध्ये पर्जन्यवृष्टी होऊ शकते किंवा होणारा पाऊस वार्याद्वारे दूरच्या प्रदेशात वाहून जाऊ शकतो. बाष्पीभवनामुळे तापमान कमी होते व त्यामुळे महासागर आणि जमीन यांच्यातील तापमानात फरक पडतो व वेगवेगळ्या प्रदेशांमधील वार्याचे स्वरूप बदलते. त्यानंतर आर्द्रता आणि पाऊस या गोष्टीदेखील बदलतातच. खोर्यात जास्त पाणी असल्याने भू-पृष्ठभाग थंड होऊ शकतो व त्यामुळे मान्सूनच्या पावसात घट होऊ शकते, असे देखील काही संशोधनातून आढळते. ही प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असल्याने यावर अजून संशोधन होण्याची गरज आहे. पण, एकंदरीत आंतर-खोर्यातील जल हस्तांतरणामुळे होणार्या भूजल व्यवस्थापनातील बदलामुळे, जमिनीवरील पर्जन्यमानाच्या प्रमाणावर नक्कीच परिणाम करू शकतो.
पुढे, संशोधकांनी नदी एकमेकांना जोडणार्या प्रकल्पांच्या सिंचन उद्दिष्टांच्या मॉडेलचा अभ्यास केल्यावर असे आढळले की, ‘इंटेरलिंकिंग’नंतर देशातीलकाही शुष्क प्रदेशांमध्ये सप्टेंबरच्या पावसात 12 टक्क्यापर्यंत घट होऊ शकेल आणि इतर प्रदेशांमध्ये सप्टेंबरच्या पावसात दहा टक्क्यांने वाढ. संशोधकांनी यावर भर दिला की, प्रस्तावित नदी ‘इंटेरलिंकिंग’ प्रकल्पाचे नियोजन करताना मान्सूनच्या बदलाचा विचार करणे आवश्यक आहे. सुबिमल घोष, अभ्यासाचे सह-लेखक म्हणाले की, “या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्थलीय जलचक्र बदलल्याने वातावरणातीलप्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, नदीच्या ‘इंटेरलिंकींग’सारख्या मोठ्या प्रकल्पांचे नियोजन करताना जल-हवामानशास्त्रीय परिणामांचे कठोर, मॉडेल-मार्गदर्शित मूल्यमापन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पांमध्ये आपल्या कृषिप्रधान देशाचे जलसंकट कमी करण्याची क्षमता आहे हे नाकारता येत नाही. परंतु, शाश्वत जलस्रोत व्यवस्थापनासाठी अशा प्रकल्पांचे सर्वांगीण मूल्यमापन आणि त्यानंतरच्या नियोजनात जमीन-वातावरणाचा अभ्यास, पर्यावरणीय परिणाम, भूजलमापन, सागरी बदल इत्यादींचा सखोल अभ्यास आवश्यक आहे.
नदी ‘इंटेरलिंकिंग’ प्रकल्पाबद्दल गेल्या काही दिवसात तुम्ही बर्याच चांगल्या वाईट गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या असतील. पण आपल्याला हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, प्रकल्पाची कल्पना वाईट नाही आणि अशा प्रकल्पाची भारताच्या भविष्यासाठी अत्यंत गरज आहे. विकासाच्या मार्गावर असलेला आपला देश, पाण्यासंबंधीच्या गहन प्रश्नांनी लवकरच वेढला जाऊ शकतो हे आपण जाणतो, तर आता गरज आहे ती अजून संशोधनाची आणि विज्ञानाच्या आधारे मार्ग शोधण्याची. जेणेकरून, उपाय म्हणून अमलात आणला जाणारा हा धाडसी प्रकल्प, स्वतः नवे प्रश्न निर्माण करणार नाही.