मुंबई : ७ ऑक्टोबर रोजी सुरु झालेले इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध अजुनही सुरुच आहे. दोन्ही गटांकडून कुणीही माघार घेताना दिसत नाही. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या आणि नग्न धिंड काढलेल्या शानी लौक या जर्मनी महिलेचा मृतदेह सापडला आहे.
शानी लौक ही २३ वर्षीय जर्मन नागरिक आहे. हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी ती दक्षिण इस्रायलमधील किबुत्झ भागात सुपरनोव्हा संगीत महोत्सवात सहभागी झाली होती. या महोत्सवात दहशतवाद्यांनी हल्ला करत असंख्य नागरिकांची हत्या केली होती.
तसेच मोठ्या प्रमाणात येथील लोकांचे अपहरणही केले होते. यावेळी शानी लौकचेसुद्धा अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर एका पिकअप ट्रकमध्ये शनीची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली होती. यावरुन दहशतवाद्यांनी तिची हत्या केल्याचे सांगण्यात येत होते.
परंतु, काही दिवसांनंतर शानीच्या आईने आपली मुलगी जिवंत असून गाझा येथील रुग्णालयात गंभीर अवस्थेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता शानी लौक हिचा मृतदेह सापडला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत शानीच्या मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.