गेल्या काही काळात वातावरणातील दीर्घकालीन बदलांविषयी संशोधन आणि जागृतीही वाढलेली दिसते. या बदलांविषयी जैवविविधतेच्या घटकांवरील तसेच अखंड मानवजातीवरील परिणाम यानिमित्ताने प्रकाशझोतात येत आहेत. अशाप्रकारचे संशोधन, अभ्यास समोर आल्यास निश्चितच त्याचा उपयोग जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी करणे शक्य होणार आहे.
‘ग्लोबल वार्मिंग’ हा आजघडीचा प्राधान्याने विचारात घेतला जाणारा विषय असला तरी, एकेकाळी दुर्लक्षित आणि आधारहीन संकल्पना म्हणून याकडे बघितले जात होते. तापमानाचे असह्य चटके आणि वारंवार ओल्या-सुक्या दुष्काळाची झळ बसू लागल्यानंतर मात्र ‘तापमान बदल’ ही केवळ वल्गना नसून, ते सत्य असल्याचे मानायला आणखीन काही काळ जावा लागला. जैवविविधतेतील अनेक घटक जसे की, जंगलातील प्राणी, वनस्पती, फूलझाडांच्या वनस्पती, छोटे-मोठे कीटक अशा सर्वच घटकांवर गंभीर परिणाम होताना आढळून आले आहेत. तसेच, आणखी एका संशोधनामध्ये मार्जार कुळातील ‘लेपर्ड कॅट’ म्हणजेच वाघाटी हा प्राणी तापमानवाढ आणि ‘ग्लोबल वार्मिंग’ला कसा योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही, याविषयी नमूद करण्यात आले आहे.
या संशोधनानुसार, पश्चिम घाटातील वाघाटींची संख्या जगाच्या इतर भागांपेक्षा आणि अनुवांशिकदृष्ट्याही वेगळी आहे. तापमान बदलांमुळे मध्य भारतातून वाघाटी हद्दपार होण्याची शक्यताही या अभ्यासात वर्तविण्यात आली आहे. या प्रजातीला रस्ते अपघात, पिकांवर कीटकनाशकांचा झालेला अतिवापर यांसारख्या अनेक समस्यांमुळे धोके निर्माण झाले आहेत. ‘आययुसीएन’ (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर)च्या यादीत ‘लिस्ट कन्सर्न’ म्हणजेच दुर्लक्षित आणि फारसे संशोधन न झालेल्या गटात मोडतो. संवर्धन आणि संरक्षण ही अत्यावश्यक गरज नाही, असे असले तरी ही प्रजात तापमानवाढ म्हणजेच ‘ग्लोबल वार्मिंग’चे चटके सहन करू शकणार नाही, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
वाघाटी ही जगभरात सर्वांत मोठ्या प्रमाणात पसरलेली लहान मांजरीची एक प्रजात. दक्षिण, पूर्व ते आग्नेय आशियापर्यंत या प्रजातीचे अस्तित्व आढळते. पण, या प्रजातींकडे आता अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कंबोडियामध्ये केलेल्या एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की, ही प्रजाती इतर मांसाहारी प्राण्यांबरोबर राहत असूनही, त्या प्राण्यांमुळे त्यांच्या लोकसंख्येवर फारसा परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही. त्याचे कारण म्हणजे, अशा स्पर्धात्मक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी या प्रजातीने परिस्थितीशी जुळवून घेतले आहे.
मिझोराम व्याघ्र प्रकल्पातील एका अभ्यास अहवालात या मांजरी निशाचर असल्याचे स्पष्ट झाले असून पक्षी, अंडी, साप किंवा सरडे, गेको इत्यादी त्यांचे खाद्य असावे. वाघाटीच्या अनुवांशिक किंवा जनुकीयदृष्ट्या दोन भिन्न प्रकार भारतात आढळतात. भारतातील विविध जैव-भौगोलिक क्षेत्रांतील ४० वाघाटींच्या ‘स्कॅट’ म्हणजेच विष्ठेच्या नमुन्यांवरील ‘माइटोकॉन्ड्रियलडीएनए’च्या विश्लेषणात पश्चिम घाटातील प्रजात अनुवांशिकदृष्ट्या वेगळी आणि इतर भारतीय आणि आग्नेय आशियाई प्रजातीपासून भौगोलिकदृष्ट्या वेगळी असल्याचे आढळून आले. मध्य भारतात ही प्रजात आढळून येत नाही. यावरून संशोधकांनी असे गृहीत धरले की, सुमारे २० हजार वर्षांपूर्वी ‘एलजीएम’ (लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम) द्वीपकल्पीय प्रदेशातील तापमानात वाढ झाल्यामुळे वाघाटींची संख्या कमी होऊन मध्य भारतातील उन्हाळ्यातील उच्च तापमानामुळे या प्रजातींचे प्रमाण मर्यादित झाले आहे.
वाघाटी ओलसर-दमट क्षेत्रात राहणे पसंत करतात, असेही या अहवालातून निदर्शनास आले आहे. दक्षिण भारतातील भद्रा रंगस्वामी मंदिर परिसरामध्ये सर्वाधिक वार्षिक पर्जन्यमान नोंदवले गेले असून, याच क्षेत्रामध्ये वाघाटी सर्वाधिक प्रमाणात असल्याचेही समोर आले आहे. कोरडे परिसर, कोरडे पडलेले पाणवठे अशा परिसरांमध्ये या वाघाटींची संख्या कमी घनतेची आढळल्यामुळे या प्रजातीवर तापमानवाढीचे परिणाम होत असल्याचे गृहीतक संशोधकांनी धरले आहे. पाणवठ्यांवर असलेल्या या वाघाटींची संख्या लक्षात घेता, ही लहानशी दुर्लक्षित प्रजात वाचवायची असेल, तर त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्तच.