"कुत्र्या गाडी साफ कर"; सपा आमदार शाहजील इस्लामचे चालकाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

31 Oct 2023 16:18:50

Shahjil Islam

लखनऊ :
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या एका आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. शाहजील इस्लाम असे या आमदाराचे नाव आहे. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, भोजीपुरा विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार शाहजील इस्लाम २७ ऑक्टोबर रोजी ट्रेनने लखनऊवरून बरेलीला येणार होते. त्यांना घेण्यासाठी त्यांचा चालक धर्मेंद्र मध्यरात्री बरेली रेल्वे स्थानकावर पोहोचला. परंतु, ट्रेन लेट झाल्याने शाहजील इस्लाम हे दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचले.
 
ट्रेनमधून उतरल्यानंतर गाडीजवळ येताच शहाजील इस्लाम चालक धर्मेंद्रवर चिडले. "कुत्र्या गाडी साफ कर. तुम्हां धोबी लोकांना केवळ कपडे कसे धुवायचे हेच माहिती असतं. गाडी चालवता येत नाही," असे त्याने आपल्या चालकास सुनावले. धर्मेंद्र हा दलित समाजातील आहे.
 
आमदाराने अपशब्द वापरल्याने धर्मेंद्रने त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. यावर शहाजील इस्लाम प्रचंड संतापले आणि धर्मेंद्रला चापट मारली. तसेच "तू मला ओळखत नाहीस. मी तुला घरातून उचलून आणेन," अशी धमकीही दिली. त्यानंतर धर्मेंद्रला स्टेशनवरच ठेवत शाहजील इस्लाम आपल्या गनरसह कारमध्ये निघून गेले.
 
त्यानंतर धर्मेंद्रने लगेच ११२ क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना बोलवले. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. पीडित धर्मेंद्रने तक्रारीत म्हटले की, रात्री स्टेशनच्या बाहेर दव पडल्याने कार ओली झाली. यावरुन शाहजील इस्लामने गाडी अस्वच्छ असल्याचे सांगत त्याला अपशब्दात बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी शाहजील इस्लाम यांच्यावर कारवाई केली आहे.



Powered By Sangraha 9.0