‘इंडिया’वाल्यांचा ‘भारत’विरोध

30 Oct 2023 21:17:15
Kerala govt rejects NCERT's proposal to rename Bharat in school textbooks

’एनसीईआरटी’ अर्थात ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ने आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भावी पिढीला भारताचे नाव समजावे आणि ते जाणून घेता यावे, या भावनेने अशी शिफारस करण्यात आली आहे. अजून याबाबत कुठल्याही ठोस निर्णयाची घोषणाही झालेले नसताना विरोधकांनी मात्र आरडाओरड प्रथेप्रमाणे सुरु केलीच. केंद्रीय स्तरावर कोणताही निर्णय होवो, केरळ सरकारला त्याचे नेहमीच वावडे. आताही केरळचे शिक्षणमंत्री शिवनकुट्टी यांनी निर्णयाविरोधात भूमिका घेतली. शिवनकुट्टी यांनी ‘एनसीईआरटी’ने केलेल्या शिफारसी नाकारल्या आहेत. तसेच, केरळ सरकारने केंद्र सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात केरळच्या शिक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले. देशाच्या एकात्मतेसाठी ‘इंडिया’हे नाव वापरणे योग्य असल्याचे सांगत ‘इंडिया’या नावानेच विद्यार्थ्यांनी देशाचा इतिहास आणि वारसा वाचल्याचा केरळ सरकारचा दावा आहे. तसेच, ‘एनसीईआरटी’ एका विशिष्ट विचारसरणीचेसमर्थन करत असल्याचा दावा करण्याबरोबरच, पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक हेतूने घेतलेल्या अशा निर्णयांचे पुनरावलोकन केले पाहिजे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान, केरळमध्ये डाव्यांच्या सरकारमध्ये नेमका काय सावळागोंधळ सुरू असतो, हे तर अगदी जगजाहीर. ऑगस्ट २०२२ मध्ये विधानसभेत केरळचे नाव बदलून ‘केरळम्’ असे करण्याचा ठराव केरळ सरकारने पारित केला होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हा प्रस्ताव आणला होता आणि आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव ‘केरळम्’ ठेवावे, अशी सूचना केंद्र सरकारला पाठविण्यात आली होती. त्यामुळे स्वतः नाव बदलण्याचा खटाटोप करणारे आता भारत नावालाही विरोध करू लागले आहेत. ‘इंडिया’ला १५०हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. मात्र, त्याउलट ‘भारत’ या नावाला सात हजारांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. हे नाव ऐकून भावी पिढीला आपल्या समृद्ध वारशाचा आणि इतिहासाचा अभिमान वाटेल, हे नक्की.

आनंदली अयोध्यानगरी...

पाच शतकांपासूनचे कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. अयोध्येतील बहुप्रतिक्षित श्री राम मंदिर उद्घाटनाचा नेत्रदीपक सोहळा दि. २२ जानेवारी, २०२४ रोजी अयोध्येत संपन्न होईल. दुपारी १२.३० वाजता राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दि. १६ जानेवारी ते २४ जानेवारी, २०२४ या कालावधीत शुभमुहूर्त असल्याने या कालावधीतील दि. २२ जानेवारीही तारीख निश्चित करण्यात आली. या दिवशी अभिजीत मुहूर्त असल्याने याच दिवशी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अभिजीत मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. या वेळेत केलेले काम कधीही अयशस्वी होत नाही, अशी धारणा. भगवान श्री रामचंद्रांचा जन्मही अभिजीत मुहूर्तावरच झाला होता. श्री राम मंदिराचे भूमिपूजनदेखील अभिजीत मुहूर्तावर करण्यात आले होते आणि आता उद्घाटनदेखील याच मुहूर्तावर करण्यात येणार आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातून चार हजारांहून अधिक साधू-संत, महंत आणि समाजातील २ हजार, ५०० प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उत्तर आणि दक्षिण भारतातील ५१ वैदिक आचार्य अनुष्ठान करतील आणि त्यानंतर रामलला मंदिरात सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललाची पहिली आरती करतील. प्राणप्रतिष्ठा दि. २२ जानेवारीरोजी दुपारी १२ ते १२ वाजून ४५ मिनिटांच्या कालावधीत होईल. या सोहळ्याचे निमंत्रण राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या कुटुंबांनाही देण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दुसर्‍या दिवसापासूनच देशभरातील रामभक्त रामललाचे दर्शन करू शकतील. दरम्यान, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाल्याने अयोध्येत आतापासूनच आनंदोत्सव साजरा केला जात आहे. अयोध्येतील व्यापार्‍यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. तारीख निश्चित झाल्यानंतर अनेक हॉटेल्स, खोल्या आधीच बुक झालेल्या आहे. या सोहळ्याला देशभरातून लाखो लोक येणार असून रामभक्तांची शतकांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे. ‘मंदिर वहि बनायेंगे, तारीख नही बताएंगे’ असे टोमणे मारणार्‍यांनाही यामुळे सणसणीत चपराक मिळाली आहे. त्यामुळे दि. २२ जानेवारी, २०२४ हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरेल, हे निश्चित!
 
Powered By Sangraha 9.0