तुघलकी विजयन सरकारच्या हिंदूद्वेषाचा नवा अध्याय...

30 Oct 2023 21:02:52
Hindu hatred Agenda Vijayan Government in Kerala

मंदिर परिसरामध्ये झेंडे उभारण्यास, राजकीय पक्षांचे फलक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. संघप्रेरित केरळ क्षेत्र संरक्षण समितीने, देवस्वोम बोर्डाने जे पत्रक काढले आहे, ते मंदिरविरोधी आहे, ते देवस्थानच्या प्रथांच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे. मंदिरांची संकल्पना मोडीत काढण्याचे साम्यवाद्यांचे जे षड्यंत्र आहे, ते उधळून लावण्यासाठी हिंदू संघटना आणि भाविकांकडून निषेध केला जात आहे, तो दाबून टाकण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.

केरळमधील मलबार देवस्वोम बोर्डाने मंदिरांच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा भरविण्यावर बंदी घातली आहे. आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व मंदिरांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता त्रावणकोर देवस्वोम बोर्डानेही संघाच्या शाखा मंदिरांच्या परिसरात भरविण्यावर बंदी आणली. दि. २० ऑक्टोबर रोजी या मंडळाने आणखी एक आदेश काढून मंदिर परिसरात नामजप करण्यावरही बंदी आणली. या आदेशाची अंमलबजावणी करण्याकडे जे दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यत येईल, असेही या आदेशात म्हटले आहे. मंदिर परिसरामध्ये झेंडे उभारण्यास, राजकीय पक्षांचे फलक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. संघप्रेरित केरळ क्षेत्र संरक्षण समितीने, देवस्वोम बोर्डाने जे पत्रक काढले आहे, ते मंदिरविरोधी आहे, ते देवस्थानच्या प्रथांच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे. मंदिरांची संकल्पना मोडीत काढण्याचे साम्यवाद्यांचे जे षड्यंत्र आहे, ते उधळून लावण्यासाठी हिंदू संघटना आणि भाविकांकडून निषेध केला जात आहे, तो दाबून टाकण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे, असा आरोप केरळ क्षेत्र संरक्षण समितीचे अध्यक्ष एम. मोहनन आणि महासचिव के. एस. नारायणन यांनी केला आहे. हिंदूविरोधी कारवायांच्या विरुद्ध आवाज उठविणार्‍या हिंदू संघटनांना कोणीही अडवू शकत नाही, असेही त्या दोघांनी म्हटले आहे. केरळमध्ये हिंदू मंदिरांचे आणि प्रथांचे रक्षण करण्यासठी ज्या नामजप यात्रा काढण्यात आल्या होत्या, त्या अत्यंत प्रभावी ठरल्या होत्या. २०१८ साली शबरीमला आंदोलनाच्यावेळी त्याची प्रचिती सर्वांना आली होती. भाजप नेते आणि मिझोरामचे माजी राज्यपाल कुम्मानाम राजशेखर यांनी मंदिरांमध्ये भाविकांकडून अनेक कारणांसाठी नामजप केला जात असतो. एखाद्या निर्णयाच्या विरूद्धही नामजप केला जातो, असे ते म्हणाले. भगव्या रंगाचे ध्वज उभारण्यास मंदिर व्यवस्थानाने घातलेल्या बंदीबद्दल आश्चर्य व्यक्त करून ते म्हणाले, “मंदिरात ध्वज उभारण्यास बंदी घालण्याचा आणि भगवी वस्त्रे परिधान करणार्‍या संन्याशांनाही बंदी घालण्याचा निर्धार सरकारने केला आहे काय,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जगन्नाथ मंदिर प्रवेशासाठी वस्त्रसंहिता!

जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट वेशभूषा असली पाहिजे, अशी सक्ती करण्याचा निर्णय श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने घेतला आहे. दि. १ जानेवारी, २०२४ पासून हा निर्णय अमलात येणार आहे. जगन्नाथपुरीचे मंदिर चार धामांपैकी एक महत्त्वाचे धार्मिक मंदिर. लाखो भाविक जगन्नाथाचे दर्शन घेण्यासठी येत असतात. मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिकता राखण्यासाठी विशिष्ट वेशभूषा असलेल्यांनाच या मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ सेवेकरी बिनायक दासमोहपात्रा यांनी ही माहिती दिली. मंदिरास भेट देणारे अनेक भाविक तोकड्या कपड्यांमध्ये असतात. त्यामुळे अन्य भाविकांच्या भावना दुखवतात. त्यामुळे दि. १ जानेवारीपासून सुयोग्य वेश परिधान केलेल्या भाविकांनाच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शॉर्ट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट्स असे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. देशातील अनेक पवित्रस्थानी योग्य वेश असेल तरच प्रवेश दिला जात असल्याचे दासमोहपात्रा यांनी सांगितले. उत्तराखंडमधील नीम करोडी बाबा मंदिर, हरिद्वार येथील दक्षणेश्वर महादेव मंदिर, ऋषिकेश येथील नीलकंठ महादेव मंदिर, मध्य प्रदेशातील स्वामी नारायण मंदिर, श्री लाडलीजी महाराज मंदिर, बरसाना अशा काही मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे.
 
ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काश्मीर विलीनीकरण दिन साजरा

जम्मू-काश्मीरचे भारतामध्ये विलीनीकरण होऊन ७६ वर्षे झाली. या ७६व्या विलीनीकरण दिनाचे औचित्य साधून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ब्रिटनस्थित जम्मू-काश्मीरमधील जनतेने एका समारंभाचे आयोजन केले होते. दि. २६ ऑक्टोबर, १९४७ या दिवशी जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले होते. त्यानिमित्ताने ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये समारंभ योजण्यात आला होता. त्या समारंभास बॉब ब्लॅकमन, पार्लमेंटचे सदस्य हरो इस्ट, जोनाथन लॉर्ड, वोकिंग, थेरेसा वीलर्स, चीपिंग बार्नेट आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन राज घराण्यातील अजातशत्रूसिंह आणि रितू सिंह हे उपस्थित होते. या प्रसंगी गौतम सेन, सुशील पंडित, सज्जाद राजा यांची भाषणे झाली. याप्रसंगी बोलताना सज्जाद राजा यांनी फाळणीच्या वेळी हिंदू आणि शीख यांच्यावर जे अत्याचार झाले, त्याचा उल्लेख केला. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्याशी पाकिस्तानचा काही एक संबंध नाही. कारण, ते आक्रमक होते आणि त्यांनी सक्तीने काश्मीरचा काही भाग गिळंकृत केला. सुशील पंडित यांनी काश्मिरी पंडितांना अजून न्याय मिळत नसल्याकडे लक्ष वेधले. पार्लमेंटचे सदस्य बॉब हे विलीनीकरण झालेल्या कराराची प्रत घेऊन आले होते आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये वर्षोनुवर्षे हा कार्यक्रम काश्मिरी जनता साजरा करीत आहे, याकडे लक्ष वेधले. पाकिस्तानने सरकार पुरस्कृत दहशतवाद थांबवावा, असे आवाहनही त्यांनी पाकिस्तानला केले.

मणिपूरमध्ये प्रचंड शस्त्रसाठा जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला आधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात यश आले. मणिपूरमध्ये मे महिन्यापासून जो वांशिक हिंसाचार उसळला होता, त्यावेळी दंगेखोरांनी शस्त्रागारांवर हल्ले करून मोठ्या प्रमाणात शस्त्रे लुटून नेली होती. शस्त्रे लुटून नेणार्‍या लोकांनी ती सरकारजमा करावी, असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले होते. पण, ती काही त्यावेळी परत करण्यात आली नव्हती. सुरक्षा दलांनी काकचिंग, बिष्णूपूर आणि चुराचांदपूर या जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत हा प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये ‘एके ४७’, ‘एके ५६’ बंदुका, चार कार्बाईन मशीन गन यासह बर्‍याच शस्त्रांचा समावेश होता. तसेच, काडतुसे, स्फोटके, हातबॉम्ब आदींचाही यामध्ये समावेश आहे. हिंसक जमावाने ५ हजार, ६६९ प्रकारची शस्त्रे, विविध प्रकारची पाच लाख जीवंत काडतुसे पोलीस स्टेशन आणि शस्त्रागारामधून लुटली होती. त्यातील आतापर्यंत १ हजार, ६०० शस्त्रे परत मिळविण्यात यश आले आहे. या लूट प्रकरणी ६०० घरांची झडती घेण्यात आली आणि १ हजार, ४०० लोकांचे जबाब घेण्यात आले. पण, त्यापैकी कोणालाही अद्याप अटक कण्यात आलेली नाही.

धर्मांधाकडून स्वीडिश नागरिकांची हत्या

ब्रुसेल्समध्ये एका धर्मांध व्यक्तीने दोन स्वीडिश नागरिकांची हत्या केली. हल्लेखोर दहशतवादी संघटना ‘इसिस’शी संबंधित असल्याचा संशय आहे. कुराणाची प्रत जाळल्याचा सूड उगविण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्या हल्लेखोराने म्हटले आहे. या हत्येनंतर हल्लेखोराने समाजमाध्यमवर एक व्हिडिओ टाकला असून त्यामध्ये,‘अल्ला हूँ अकबर!’ माझे नाव अब्देसालेम अल गिलानी असून मी अल्लासाठी लढणारा योद्धा आहे’, असे म्हटले आहे. आम्ही आमच्या धर्मासाठी जगतो आणि धर्मासाठी मरतो. मी आतापर्यंत तीन स्वीडिश नागरिकांची हत्या केली आहे, असेही त्याने म्हटले आहे. ज्यांची हत्या झाली त्यांनी स्वीडिश फुटबॉल संघाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्या घटनेनंतर बेल्जियम संघाने उरलेला सामना खेळण्यास नकार दिला. ही घटना घडली तेव्हा स्टेडियममध्ये ३५ हजार प्रेक्षक उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव प्रेक्षकांना तेथेच थांबवून ठेवण्यात आले होते. या घटनेने युरोप हादरून गेला, अशी प्रतिक्रिया फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी व्यक्त केली आहे. स्वीडनमध्ये मुस्लीमविरोधी संघटनांनी पोलिसांची अनुमती घेऊन सार्वजनिकरित्या कुराण जाळल्यानंतर त्याचे तीव्र प्रतिक्रिया मुस्लीम जगतात उमटली होती. त्यातूनच ही हत्या करण्यात आली असल्याचे दिसून येते.

९८६९०२०७३२
Powered By Sangraha 9.0