ब्रिटिशकालीन कल्याण रेल्वे स्थानकाचा ‘स्मार्ट’ कायापालट

03 Oct 2023 21:37:20
British Era Kalyan Railway Station Smart Development

मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्थानक म्हणजे मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण जंक्शन. ब्रिटिशकालीन या स्थानकाचा कायापालट करण्याबरोबरच लोकल व लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वेमार्गिका उभारुन स्थानकाचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने...

कल्याण शहर हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आणि ठाणे जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर. कल्याण जंक्शन हे मुंबई-कल्याण मध्य रेल्वेवरील मोठे स्थानक. हे स्थानक स्थानक ब्रिटिश काळामध्ये १८५४ साली बांधले गेले. नाशिककरिता कसारा व पुण्याकरिता कर्जतनंतर रेल्वेमार्ग बदलावे लागतात. परंतु,हे लोहमार्ग सध्या लोकल रेल्वेकरिता व लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी बदलून वापरावे लागतात. या वापरामुळे लोकल गाड्या व लांबपल्ल्याच्या गाड्यांना विलंब होतो. प्रवाशांसाठीही ही बाब फार गैरसोयीची ठरते. म्हणूनच कल्याण स्थानकासारखी काही स्थानकांच्या कायापालटाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे व जोगेश्वरी ही दोन उदाहरणे आहेत.

अशा या मध्य रेल्वेने तब्बल १६९ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात बांधलेल्या कल्याण टर्मिनस स्थानकाचे रुपडे आता बदलणार आहे आणि हे मोठे बदल नक्कीच प्रवाशांच्या सोयीचे व सुखकारक असतील, यात शंका नाही. कल्याण स्थानकावर नाशिककडे व पुण्याकडे जाणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्यांचाही थांबा असतो. शिवाय स्थानिक रेल्वेच्या रुळांचेही काम आहे, जे मध्य रेल्वे पुढील दोन-तीन वर्षांत म्हणजे साधारणपणे २०२५-२६ पर्यंत पूर्ण करणार आहे. यात मध्य रेल्वेकडून अनेक सुखसोयींनी युक्त अशी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत व त्यासाठी रु. ९०० कोटी इतका अंदाजे खर्च येणार आहे. सध्या लांबपल्ल्याच्या गाड्या व लोकल रेल्वेचे मार्ग हे वेगवेगळे करण्यात येणार असल्याने मोठा विलंब टळणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सध्या ८५० गाड्यांहून अधिक रेल्वेगाड्या या कल्याण स्थानक टर्मिनसमधून रोज बाहेर पडतात. कल्याण टर्मिनस स्थानक १८५४ मध्ये बांधले गेल्यानंतर लांबपल्ल्याच्या व लोकल गाड्यांचे रुळ एकत्रच वापरले जात आहेत. यातून प्रवाशांना फार विलंब होत असून प्रवाशांनी बरेच वर्षे ही अडचणीची कळ सोसली आहे. पण, आता लवकरच नवीन कामाला सुरुवात होणार आहे व गूड्स यार्डमधील कल्याण पूर्वेकडील भागातील सुमारे ३२ रुळ उखडून टाकण्यात येणार आहेत. या पूर्वेकडीलभागावर टर्मिनस, रेल्वे ऑफिस इमारत, रिटेल कामासाठी, कमर्शिअल इमारत आणि बहुस्तरीय कार पार्किंग तेथे बांधले जाणार आहे.

मध्य रेल्वेकडून असे सांगण्यात येते आहे की, कल्याण पूर्वेकडील ब्रिटिश जमान्यात बांधलेले संपूर्ण यार्ड बदलले जाईल. उखडल्या जाणार्‍या ३२ रुळांपैकी १२ रुळ गूड्स यार्ड कामाकरिता वापरले जातील व सहा रेल्वेमार्ग टर्मिनस व प्लॅटफॉर्मसह या कामासाठी वापरले जातील. या टर्मिनस इमारतीवरच्या जागेत फूट ओव्हर ब्रिजेस, रोड ओव्हरब्रिजेस आणि ट्रॅव्हलेटर्सची मदत घेऊन लोकल गाड्यांना जोडणारे अत्याधुनिक टर्मिनस बांधले जाणार आहे. ही सुमारे अर्धा किमी लांब टर्मिनस इमारत सर्व लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्मना जोडले जाईल.

या पूर्वेकडील कामात दुसर्‍या लोकल गाड्यांना जोडण्याकरिता थोडीच जागा राहील. परंतु, मध्य रेल्वेचे डिझाईन विभागाकडून पश्चिमेकडील गाड्या आणि सध्याचे प्लॅटफॉर्म यांना कसे जोडायचे, याचा पूर्ण विचार होणार आहे. या कामात अनेक उन्नत रस्त्यांची कामे करावी लागणार आहेत. ही कामे सर्व प्रवाशांना पर्यायी प्लॅटफॉमवर जाण्यासाठी सोयीची ठरणार आहेत. रस्त्यांवरून येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रॅव्हलेटरच्या मदतीन ‘एफओबी’ आणि ‘आरओबी’कडे जाता येईल.

गेल्या सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजर नरेश लालवानी यांनी येथे तपासणी भेट घेऊन कुठली व कशी कामे होणार आहेत, त्याचा सर्व्हे केला होता. त्यात विशेषकरून कसार्‍याकडे व कर्जतकडे जाणार्‍या गाड्यांचे बदल कसे केले जाणार आहेत, त्याविषयी ते रेल्वेमार्ग वेगळे कसे करता येतील याविषयी विश्लेषण केले होते. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मनासपुरे यांनी स्पष्ट केले की हे ट्रॅक वेगळे करण्याचे काम गूडस यार्ड्मध्ये केले जाईल. ट्रॅकसंबंधीच्या कामाचे व ट्रॅक उखडून टाकण्याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट नक्की झाले आहे. माती खणण्याची स्थापत्यकामे, पुलाची कामे इत्यादी. ही कामे पण सुरू केली गेली आहेत.

कल्याण स्थानकावर कोणते बदल होणार?

१. या नवीन कामात एक्सप्रेस व मेल गाड्यांचे व लोकल गाड्यांचे ट्रॅक वेगळे केले जाणार.

२. झटपट व सहजगत्या या स्थानकावर प्रवेश मिळेल.

३. पादचारी, प्रवासी वाहतूक, पार्सल लगेज आणि विविध खाण्याचे जिन्नस या स्थानकावर पोहोचते केले जातील.

४. प्रवाशांच्या सोयीची माहिती, त्याचे दाखविणारे दर्शक बोर्ड, सुरक्षितता व आगीपासून बचाव इत्यादी गोष्टींची येथे प्रणाली असेल.

५. पुरेशी व जरूरीची कमर्शिअल माहिती स्थानकावर दिली जाईल.

कल्याण पूर्वेच्या यार्डाच्या ठिकाणी बहुस्तरीय वाहनतळ बांधल्यावर तेथे २५०० हून अधिक दोनचाकी व चारचाकी वाहने पार्क करता येतील. अंदाजी रचनेप्रमाणे कल्याण स्थानकाच्या येथे ५.६५ लाख प्रवासी सामावून घेण्याची क्षमता असेल. सध्या ही संख्या फक्त ३.७२ लाख इतकी आहे.

मुंबई रेल्वे प्रवासी संघटना संस्थेचे सचिव म्हणून काम करणारे व कल्याण शहरात राहणारे पीव्ही आनंद हे या कल्याणच्या नवीन कामाबद्दल फार खूश झाले आहेत व ते म्हणतात लांब जाणार्‍या व लोकल गाड्यांचे ट्रॅक वेगळे केल्यावर कल्याणच्या प्रवाशांचे खरोखर कल्याणच होईल. कारण, गाड्या सुटण्याचा विलंब टाळता येईल. हा विषय बरेच वर्षे प्रवाशांना त्रास देत होता आणि रेल्वेने तो बदल करण्याचे आता मनावर घेतले आहे. मध्य रेल्वेने या स्थानकावरच्या इतर सुखसोयीमध्ये पण वाढ करायला हवी.. बरीचशी मोकळी जागा वापरात आणायला हवी.

रेल्वे अधिकार्‍यांच्या मते, बदल करून मिळालेल्या जागेत जास्त प्रवासी थांबू शकतात. सुमारे सहा हजार माणसे या जास्तीच्या जागेत मावू शकतील. सध्या फक्त येथे ३०० प्रवासी मावतात.. या जागेवरील छप्परही बदलावे लागेल ते हवेशीर व चांगले दिसणारे करता येईल.. कल्याणच्या पाचव्या व सहाव्या रेल लाईनीकरिता एलटीटी-कल्याण मार्गाकरिता फार सोयीचे ठरणार आहे.

सबर्बन रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्षनंदकुमार देशमुख म्हणतात, “आम्ही मध्य रेल्वेला विनंती केली आहे की, रेमॉडेलिंग केल्यावर उपनगरीय व लांबपल्ल्याच्या गाड्यांचे ट्रॅक नक्की वेगळे करावेत. कर्जत व कसारा गाड्यांसाठी हे ट्रॅक नक्की वेगळे होऊन प्रवाशांची विलंबाची अडचण दूर केली जाईल. रेल्वे अधिकार्‍यांनी शब्द दिला आहे की हे सर्व आमच्या डिझाईन व रिमॉडेलिंग कामात त्याचा उपयोग करून घेतला जाईल.” त्यामुळे एकूणच कल्याण रेल्वे स्थानकाचा कायापालट झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील प्रवासकळा काहीअंशी का होईना, कमी होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 
Powered By Sangraha 9.0