लोकसभा निवडणूकीसाठी मिशन ४५ +, मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा - खा. सुनिल तटकरे

    29-Oct-2023
Total Views |
NCP MP Sunil Tatkare on Maratha Reservation

ठाणे :
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष, महाराष्ट्रात मिशन ४५ + मोहीम राबविणार आहे. तीनही पक्षाचे राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेणार आहेत. तसेच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, खा. सुनिल तटकरे हे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, मा. नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे, ठाणे राप्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गोतपागर, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील, ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य मोहसीन शेख, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

येणारी लोकसभा निवडणुक भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढणार आहेत. महाराष्ट्रात मिशन ४५+ ही मोहीम आम्ही राबविणार आहोत. योग्यवेळी तीनही पक्षातील मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम, जसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल तसेच दोन्ही पक्षातील केंद्रस्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभा जागेबाबत निर्णय घेतील व तो आम्हा तीनही पक्षांना मान्य असेल. दिवाळीपूर्वी मी महाराष्ट्र दौरा करणार आहे तर दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातुन महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहोत अशी माहिती खा. सुनील तटकरे यांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात, न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. तसेच अल्पसंख्याक समाजालाही ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबींवर हे आरक्षण काही टीकले नाही, नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राणे समितीने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती जमा केली होती.

यानंतर देवेंद्रजींच्या सरकारनेही तसेच उद्धवजींच्या सरकारनेही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते. आजही जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा जाहीर पाठिंबा आहे. मराठा समाजाला यासाठी आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे, इतरही समाजाची आरक्षणाची मागणी आहे. त्याचेही आम्ही समर्थन करतो. पण आरक्षण कायद्याच्या व न्यायालयाच्या आधारावर टीकावे हीच आमची स्पष्ट भूमिका आहे, असे खा. सुनिल तटकरे यांनी सांगितले.

भाजप, शिवसेना यांच्याबरोबर अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या विकासाच्या तळमळीतून सत्तेत सहभागी झाला आहे. पण सत्तेत सहभागी होताना शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आम्ही अजिबात सोडलेली नाही किंवा धर्मनिरपेक्षताही सोडलेली नाही. सत्तेत आल्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सर्वसामान्यांची कास धरणारे घेतलेले गतीमान निर्णय याची साक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्यतेचा दावा निवडणूक आयोगाकडेदाखल झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा घटनात्मक दर्जा मान्य केला आहे. निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्याचा सर्वांनी सन्मान करायला हवा, असेही खा. सुनील तटकरे म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.