हरीजी केरळहून आले होते. जिथे स्वयंसेवकांना आजही रक्तरंजित संघर्ष करायला लागतो. हरीजींनी हा संघर्ष जवळून पाहिला. मात्र, त्यातला कडवटपणा त्यांना कधीही शिवला नाही.
जेव्हा तुम्ही संघटनेकडून समाजाकडे वाटचाल करता, तेव्हा कधी ना कधी, निवडलेल्या वाटेवर एक चकवा भिरभिरत मध्ये येतो. संघटना स्थावर असते; तर समाज प्रवाही. संघासारख्या संघटना बदलत्या काळानुसार स्वतः बदलही घडून आणतात. किंबहुना, म्हणूनच त्या समकालीन विचारधारांसारख्या संदर्भहीन होत नाहीत. पण, तो बदल आधी समाजात घडलेला असतो. अशा चकव्यात आपली मूल्ये जी आपण मनेन, वाचेन, कायेन जी शिकलो, ती किती सुसंगत आहेत?
हा असतो तो चकवा. रंगा हरींसारखे दिग्गज इथे दीपस्तंभासारखे उजळत असतात. मार्ग दाखवित असतात. हरीजी मूळचे केरळचे. आजही तिथे डाव्या समाजवादी मंडळींच्या हिंसक कारवायांना राजमान्यता आहे. अभिव्यक्ती वगैरे तर लांबची गोष्ट. विचार पटला नाही, तर सरळ रक्तरंजित संघर्ष अटळ! हरीजी अशा केरळमधून आलेले आणि आपल्या शेवटच्या प्रवासातील काही वर्षं केरळलाच होते. हरीजी स्थितप्रज्ञ होते. पण, आनंदाची एक निराळीच छटा त्यांच्यापाशी होती. प्रचारकाचे आयुष्य सोपे नाही. जेव्हा हरीजी प्रचारक निघाले, तो काळ तर बिलकुलच अवघड. दामुअण्णा दातेंसारख्या माणसांनी महाराष्ट्रात आपल्या सुरुवातीच्या प्रचारकी जीवनात काय भोगले, याची आपल्याला कल्पना आहे. आपण त्याची कल्पनाच करू शकतो. हरीजीही त्याच परंपरेचे पाईक. ज्यांनी हरीजींचे बौद्धिक ऐकले, त्यांना त्यातली मजा माहीत आहे. ढोंगी डाव्यांचे वर्णन करताना त्यांनी सांगितलेली गोष्ट अजरामर आहे.
एका टुकार प्राणिसंग्रहालयातला गोरिला मरतो. नवा आणणे शक्य नसते, मग एका कर्मचार्यालाच गोरिलाचे कपडे घालून पिंजर्यात ठेवले जाते. आपण उत्तम गोरिला आहोत, हे दाखविण्यासाठी तो खूप उड्या वगैरे मारून दाखवितो. आता हा इसम उड्या मारता-मारता शेजार्याच्या पिंजर्यात उडी मारतो. तो पिंजरा असतो-सिंहाचा. सिंह उठून जवळ यायला लागतो. जसा तो सिंह अगदी नजीक येतो, तसा तो गोरिला बनलेला माणूस ‘वाचवा-वाचवा’ म्हणून ओरडायला लागतो. सिंह पटकन त्याला म्हणतो की, “गप्प बस नाही; तर मी पण खोटा आहे, हे लोकांना कळेल.” कथा इथे संपते आणि साहजिकच हास्याची लाट उसळते. आपल्या वामनमूर्ती अवतारात केरळी लुंगी आणि अर्ध्या बाह्यांचा शर्ट घातलेल्या हरीजींना ज्यांनी ही कथा साभिनय सांगताना ऐकले आहे, तेच ‘हरीजी’ समजू शकतात. ज्या वयात ते कानावर पडले, त्या वयात त्याची मजा वाटली. नंतर त्यामागची पक्की वैचारिक बैठक उमजायला लागली.
हरीजींना भरपूर भाषा येत. देशभरातल्या प्रवासात ते स्वयंसेवकांशी सहज त्यांच्या मातृभाषेत बोलायला सुरुवात करीत. नव्वदीच्या दशकात सुरेशराव कोप्पीकर मुंबईच्या वरळी नगराचे संघचालक होते. केंद्रीय कार्यकर्त्यांचा असतो, तसा हरीजींचा प्रवास तेव्हा होता. समीर कोप्पीकर आणि मी त्यांना घेऊन कोप्पीकरांच्या घरी पोहोचलो. जेवण व्हायला काही अवकाश होता. घरी जेवायला वाढण्यापूर्वी एखादा पदार्थ ठरवूनही तो झालेला नाही, असे सुरेश कोप्पीकरांच्या लक्षात आले. मूळचे कारवारकडचे असल्याने कोप्पीकर पितापुत्रांचे यावर कोकणीत बोलणे सुरू झाले. हरीजींचे लक्ष हातातल्या ‘हिंदू व्हॉईस’च्या अंकाकडे होते; ते बिलकुल विचलित होऊ न देता म्हणाले की, “तुम्ही बिलकुल काळजी करू नका. जे आहे ते वाढा, आपण सुरू करू.”
हरीजींच्या या सहज स्वभावामागे एक कसलेला चिंतक होता. हरीजींचा संवाद कधीही एकांगी नव्हता; अट्टाहासी तरी कधीच नाही! चिंतनाच्या आधीची त्यांची वाचनाची प्रक्रिया कसदार होती, त्यांची वाचनाची भूक अफाट होती, ते भरपूर वाचत आणि लिहीतही. देशी-विदेशी तत्त्वचिंतनात काय सुरू आहे, त्याचा कानोसाही घेतला पाहिजे, असे त्यांना वाटत राही. बाहेरचे प्रवाहही आपल्यात सामावून घेता आले पाहिजे, असे त्यांचे मत होते. आपल्या अखेरच्या दिवसांपर्यंत देशभरातून जमेल, त्या मार्गाने साहित्य मिळविणे आणि ते वाचत राहणे, हा त्यांचा अखंड कार्यकम होता.
दरम्यानच्या काळात जयंतराव सहस्रबुद्धेंचे अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मृती जागविणार्या एका अंकाची निर्मिती दै. ’मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून करण्यात आली होती. संजीव परबांच्या माध्यमातून हरीजींना ती कळली. हरीजींना छापील अंकच हवा होता. तो त्यांना पाठवला. पहिला अंक मिळाला नाही, मग आग्रहाने दुसरा अंक त्यांनी मागवून घेतला. हरीजींच्या व्यक्तिमत्त्वाला वाचनाची अशी एक शिस्त होती. या शिस्ताचा अर्क त्यांच्याशी संवाद करताना किंवा बौद्धिक वर्ग ऐकताना रसरसताना लक्षात येई.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, हरीजी केरळचे. तिथे आजही स्वयंसेवक पडेल, तो संघर्ष करून स्वतःचे अस्तित्व टिकवतात. असा संघर्ष केल्यानंतर येणारा नैसर्गिक कडवटपणा हरीजींच्या ठायी नव्हता. गांधी-नेहरूंना शिव्या देऊन काम भागविणार्यांपैकी, ते कधीच नव्हते. ठिकठिकाणच्या स्वयंसेवकांचे चांगले काम अन्य ठिकाणी जाऊन सांगून प्रेरणेचे स्रोत कायम ठेवणार्यांपैकी हरीजी होते. ते मातृहृदयी होते. एखाद्या स्निग्ध, स्नेहल, दीपमान समईच्या प्रकाशात बसल्यावर जसे वाटावे, ते हरीजींच्या सोबत बसल्यावर वाटे.
अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या मुख्याध्यापकांना एक सुरेख पत्र लिहिले आहे. ’गूगल’वर ते आजही मराठीत उपलब्ध आहे. मराठीतले ज्येष्ठ कवी वसंत बापट यांनी ते भाषांतरीत केले आहे. चांगल्या वाईटाची तुलना सांगताना त्यांनी साधू चरित्राच्या पुरुषोत्तमाचे वर्णन केले आहे. रंगा हरीजी तसे होते. लिंकनच्या पत्रातला साधुचरित पुरुषोत्तम!
किरण शेलार