नवी दिल्ली : पंजाबमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष (पराली) जाळल्यामुळे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (दिल्ली एनसीआर) वायुप्रदूषण झाले आहे, असा आरोप हरियाणा सरकारतर्फे करण्यात आला आहे.
हिवाळ्याच्या प्रारंभापासूनच पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी पिकांचे उरलेले अवशेष जाळण्यास प्रारंभ करतात. त्यापासून निर्माण होणार धूर हा दिल्लीच्या हवेत मिसळत असल्याने देशाच्या राजधानीमध्ये वायुप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत असते. मात्र, यावर्षी दिल्लीत झालेले वायुप्रदूषण हे पंजाबमधील शेतकऱ्यांनी पराली जाळल्यामुळे झाले असल्याचा आरोप हरियाणातर्फे करण्यात आला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) जवाहर यादव य़ांनी त्यासाठी नासाच्या उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांचा हवाला दिला आहे. ते म्हणाले, नासातर्फे जारी करण्यात आलेल्या २५ आणि २६ ऑक्टोबर रोजीच्या उपग्रह छायाचित्रांमध्ये हरियाणा नव्हे तर पंजाबमध्ये सर्वाधिक पराली जाळली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पराली जाळण्याच्या प्रकारांमध्ये हरियाणा सरकारने मोठ्या प्रमाणात घट साध्य केली आहे. मात्र, पंजाब सरकारले तसे करण्यास अपयश आले आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही दुटप्पी चेहरा जनतेसमोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हरियाणामध्ये पराली जाळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्याने यावर्षी शेतांना लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये सुमारे 36 टक्क्यांनी घट नोंदवली आहे.