पालघर : भाजपाच्या प्रवासात ओबीसींसह इतर जाती व आदिवासी समाजाने मोठी साथ दिली. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकली आहे. काही लोक आदिवासी व ओबीसींना आपसात भिडविण्याचा व संभ्रम निर्माण प्रयत्न करीत आहेत. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पालघर लोकसभा प्रवासात बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, पेसा कायद्यामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही तसेच दोन्ही समाजाला संविधानाने दिलेले हक्क अबाधित असावे.यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आदिवासींच्या समस्या सोडविण्याची विनंती केली आहे. देशातली जनता पंतप्रधान मोदी यांना मत देण्यासाठी तयार आहे. जेव्हा मते मिळविण्यात अडचण निर्माण होते तेव्हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो.
पालघर लोकसभा प्रवासात प्रदेशाध्यक्षांसोबत प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, पालघर लोकसभा समन्वयक राणी द्विवेदी, पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, प्रदेश सचिव सुरेखा थेटले, पालघर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील, पालघर विधानसभा निवडणूक प्रमुख संतोष जनाटे, डहाणू विधानसभा निवडणूक प्रमुख अमित घोडा, विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. हेमंत घोडा, पंकज कोरे, सुशील अवसारकर, हरीश्चंद्र भोये, कुणाल उदावत, अशोक वडे, विनाताई देशमुख, हेमंत सावरा, सुशील औसरकर, राजन नाईक, मनोज पाटील, विनित तिवारी, महेश सरवणकर, राजीव मिश्रा, राजेश म्हात्रे, जे.पी. सिंग उपस्थित होते.
• नेत्यांना गावबंदी करणे योग्य नव्हे!
भाजपासह महायुतीचे घटक पक्ष व राज्यातील इतर पक्षांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. सरकारमधील सर्वच नेते मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर नेत्यांना गावबंदी करून काहीही फायदा होणार नाही. कुणाचाही आरक्षणाला विरोध नसताना जाळपोळ, गावबंदी सारखे उग्र आंदोलन न करता सरकारला वेळ द्यावा. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण घालविण्याचे काम केले असेही ते म्हणाले.
• जनतेचा उर्स्फूत प्रतिसाद
पालघर लोकसभा प्रवासात बावनकुळे यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील गांधी चौक ते अंबिका चौकपर्यंत तसेच वसई येथे ‘घर चलो' अभियानात जनतेशी संवाद साधला. प्रधानमंत्री म्हणून कुणाला निवडून द्याल असा प्रश्न विचारून त्यांनी जनतेच्या भावना जाणून घेतल्या. किरकोळ विक्रेत्यांपासून ते सर्वसामान्य जनतेने एकमुखाने नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला. आम्ही विकासासाठी केवळ मोदी यांनाच मते देणार असल्याचे काही लोकांनी प्रदेशाध्यक्षांना सांगितले.
• पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
जव्हार येथील हॉटेल साई मॉल येथे पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू, विक्रमगड आणि पालघर तसेच वसई येथील वायएमसीए सभागृहात बोईसर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे संवाद साधला. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा सुपर वॉरियर्सने प्रयत्न करावेत. सोबतच लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख घरापर्यंत पोहचावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रवासत त्यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींची भेट घेत समर्थण मागितले.