चित्रतरूण बळेल सर

27 Oct 2023 22:18:56
Article on Painter Vilas Yashwant Balel

वयाच्या ८० वर्षांच्या उंबरठ्यावर असतानाही चित्रकलेसोबतच विविध कलाकृतींचा संग्रह करण्याचा छंद जोपासणारे चित्रतरूण विलास बळेल यांच्याविषयी...

ठाण्याचे रहिवाशी असलेल्या विलास यशवंत बळेल यांचा जन्म १९४४ रोजी नाशिक, ता. पेठ येथे झाला. वडील सरकारी नोकरीत, तर आई गृहिणी. घरात तिघे भाऊ व दोन बहिणी असा सुखवस्तू परिवार. कुटुंबात विलास हे शेंडेफळ असल्याने घरात सर्वांचेच लाडके. विलास यांचे प्राथमिक शिक्षण ते अकरावीपर्यंतचे शिक्षण (त्यावेळची मॅट्रिक) नाशिकलाच झाले. साधारण १९६० पर्यंत बळेल कुटुंबीय नाशिकमध्ये होते. वडील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर संपूर्ण कुंटुंब डोंबिवलीला स्थायिक झाले. कालांतराने ते ठाण्यात राहावयास आले.

कुटुंबात कलाक्षेत्राशी कुणाचाही सुतराम संबंध नसला, तरी विलास यांचा कल चित्रकलेकडे होता. लहानपणी नाशिकच्या गंगा घाटावर प्रख्यात निसर्ग चित्रकार शिवाजी तुपे यांच्या लॅण्डस्केप तसेच निसर्गचित्रांची त्यांना भुरळ पडली. १९५६ साली प्रदर्शित झालेले ’मुगले आझम’, ’झनक झनक पायल बाजे’ आदी चित्रपटांचे पोस्टर्स चित्रपटगृहामध्ये रंगवणार्‍यांना पाहून विलास यांना प्रेरणा मिळाली. इथेच त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की, चित्रकलेतच करिअर करायचे ठरवून अकरावीनंतर त्यांनी मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. डोंबिवलीतून दररोज ये-जा करीत कर्मशिअल आर्ट आणि पेंटिंग पदविका पूर्ण केली. याच्या जोडीने टेक्सटाईल आर्ट्सचा कोर्स केला. त्याचदरम्यान फोटोग्राफीचा प्रमाणपत्र कोर्सदेखील पूर्ण केला.
 
कलाविषयक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विलास यांनी कला दिग्दर्शक पांडुरंग कोठारे यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. हे करीत असताना १९६४ मध्ये दादर, माहीम येथील सिरॅमिक स्टुडिओमध्ये व्यवस्थापक तथा कला संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. इथे तब्बल २५ वर्षे सेवा बजावली. कालांतराने ही कंपनी बंद पडल्याने पूर्ण वेळ चित्रकलेसह १८ कला विषय शिकवण्यासाठी ठाण्यात घरच्या घरी शिकवणी वर्ग सुरू केले आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे ‘बळेल सर’ हे नाव रूढ झाले. तेव्हापासून आजतागायत बळेल सर चित्रकलेचे वर्ग घेत आहेत.

वयाच्या ८० वर्षांच्या उंबरठ्यावर असतानाही, बळेल सर दररोज १८ तास काम करतात. आजपर्यंत त्यांनी दहा ते १५ हजार विद्यार्थ्यांना चित्रकलेचे शिक्षण दिले आहे. यातील काही विद्यार्थी परदेशात उच्चशिक्षणासाठी गेलेत. बळेल सरांनी विविध प्रकारची चित्रे काढली, आणि विक्रीही केली. ऑर्डरप्रमाणे चित्रे काढूनही दिली. स्वतः छायाचित्रकार असल्याने चित्र कसे असावे, याविषयीचे निरीक्षण आणि रंगसंगतीचे नेमकेपण त्यांच्याकडे उपजतच आहे.

शिल्पकलेत तर त्यांचा हातखंडा आहे. मातीच्या शिल्पांसह मार्बलमध्ये मायलेकीचे स्मृतिचिन्ह, प्लास्टर ऑफ पॅरिस, सिरॅमिक, सिपोरेक्स तसेच लाकडामध्येही त्यांनी कोरीव काम केले. संकल्पचित्रे, थ्री-डी टाईप ऑप्टिकल व्हिजन, लॅण्डस्केप चित्रांसह वन्यजीव चित्रकला आणि नानाविध कमर्शिअल पेंटींग रेखाटली. व्यक्तिचित्रामध्ये ‘लाईनवर्क विथ शेडिंग’ अशा कृष्णधवल रंगांमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आदींसह अनेक मान्यवर प्रभुतींच्या व्यक्तिरेखा बळेल सरांनी हुबेहूब चितारल्या. त्यातील काही चित्रे आजही त्यांच्या संग्रही जतन करून ठेवल्या आहेत.
 
चित्रकलेसोबतच वेगवेगळी शुभेच्छा पत्रे, जुन्या कलाकारांनी काढलेली चित्रे व पुस्तके, कात्रणे, पोस्टाची तिकिटे, नाणी व नोटा, लहान मुलांची खेळणी, काडेपेटीच्या आकाराच्या १ हजार, २००च्या आसपास गाड्यांचा संग्रह तसेच कलाविषयक पुस्तके आदी जतन करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.

बळेल सरांच्या सौभाग्यवती बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये, तर त्यांच्या दोन मुली उच्चशिक्षण घेऊन विवाहानंतर परदेशात स्थिरावल्या आहेत. मोठी मुलगी डॉक्टर तर धाकटी मंजिरी, ही पित्याचा वारसा पुढे नेत आहे. आयुष्यात सर्व काही केले. मनमौजी कलाकाराप्रमाणे स्वछंदी जीवन व्यतीत करीत आहे. भविष्यात उर्वरित आयुष्यात आपल्या जवळ असलेल्या कलेची जोपासना करून कलेचा प्रसार कसा जलद होईल, यासाठी झटत असल्याचे ते सांगतात. आम्ही आहोतच; पण समाजातील सुहृदांनी कलेसाठी साह्य करणे गरजेचे असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.

‘फांदी तुटो वा पारंबी’ असे जिद्दी स्वभावाचे बळेल सर आजही आपल्या कामाप्रती प्रामाणिक व निःस्पृह आहेत. कुणाला कधीच फसवायचे नाही. फुकट कुणाचे घ्यायचे नाही, फुकट कुणाला द्यायचे नाही, असा त्यांचा करारी बाणा आहे.

कलासक्त असले तरी समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून त्यांनी आजवर ३५ वेळा रक्तदान केले आहे. विविध चित्रकला स्पर्धा तसेच कार्यशाळांमध्ये मार्गदर्शक व परीक्षक म्हणून विनामानधन जात असतात. कलेच्या प्रसारासाठी मानधनाची अपेक्षा ठेवली नसल्याचे ते सांगतात. गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच शिकवणी शुल्कदेखील माफ करतात.

नवीन पिढीला संदेश देताना बळेल सर रोखठोक भाष्य करतात. ”कठोर मेहनत करा, यश मिळेलच. कुठलेही काम करताना फळाची अपेक्षा धरू नका. सतत कार्यरत राहा,” असे ते सांगतात. अशा या चित्रतरुण छंदिष्ट अवलियाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
९३२००८९१००
Powered By Sangraha 9.0