मुंबई (विशेष प्रतनिधी) : गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ३७ वाघांचा (tigers) मृत्यू झाला आहे. यामध्ये नैसर्गिक कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या वाघांच्या संख्येनंतर सर्वाधिक संख्या ही विजेच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या वाघांची आहे. याविषयी वनमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
२०२२ सालच्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेनुसार भारतात ३ हजार ६८२ वाघांचे अस्तित्व आहे. जगातील ७५ टक्के वाघांची संख्या ही केवळ भारतात आढळते. वाघांच्या संख्येत देशामध्ये महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर असून राज्यात ४४४ वाघ आहेत. त्यामधील सर्वाधिक वाघ विदर्भात आढळतात. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडेवारीनुसार गेल्या दहा महिन्यांमध्ये राज्यात ३७ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३ मृत्यू नैसर्गिक कारणांनी, चार मृत्यू रस्ते अपघातांमध्ये, एक मृत्यू विषबाधेमुळे तर तब्बल ८ वाघांचे मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे समोर आले आहे. याच आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात विजेचा धक्का लागून नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. महत्त्वाचे म्हणजे या वाघाचे शिर आणि तीन पिंजे कापले गेले होते. याप्रकरणी सहा आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.
गुरुवारी देखील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर धारणी प्रादेशिक वनक्षेत्रात वाघाचा हा मृतदेह आढळुन आला. सुसर्दा रेंजमधील हिरांबबाई राऊंडच्या कंपार्टमेंटमध्ये असलेल्या नाल्यात हा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वी हा वाघ वनकर्मचारी व वनमजूर यांनी पाहिला होता. त्याचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्येही कैद झाले होते. यामुळेच, नैसर्गिक कारण किंवा वृद्धापकाळाने या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वनमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
गडचिरोलीतील वाघाच्या मृत्यूची गंभीर दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत मुनगंटीवार यांनी गुरुवारी प्रधान सचिव, वने व राज्यातील वरिष्ठ वनाधिका-यांना नागपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत निर्देश दिले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शिकारीचे प्रमाण शुन्यावर आले असले तरी विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात जनजागृती, कायदेशीर तरतूदी, प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे व असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी नियोजनपुर्वक प्रयत्न करावे असेही निर्देश यावेळी मुनगंटीवार यांनी दिले.