मुलांच्या नावावर गुंतवणूक करताना.....

26 Oct 2023 19:59:25
investing in children's name

मुलाच्या किंवा मुलीच्या भविष्यासाठी/भवितव्यासाठी आई-वडील त्यांच्या नावे गुंतवणूक करतात. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी ही गुंतवणूक केली जाते. काहीजण तर मुल जन्मलेल्या दिवशीच मुलगा किंवा मुलीसाठी पहिली गुंतवणूक करतात. तेव्हा, नेमके यासंबंधीचे नियम-कायदे काय सांगतात? किती रुपयांपर्यंतचे उत्पन्न करपात्र ठरते? यांसारख्या विविध प्रश्नांची उत्तरे देणारा हा माहितीपूर्ण लेख....

गुंतवणुकीसाठी लागणार्‍या कागदपत्रांपैकी जन्मदाखला आठ दिवसांत मिळू शकतो, तर जन्मलेल्या अर्भकाचे पॅन व आधार 45 दिवसांत तयार होते. 18 वर्षांनंतर व्यक्ती सज्ञान समजली जाते. त्यामुळे त्याहून कमी वयाच्या मुलाचे/मुलीचे बँकेत खाते उघडताना ते आईबरोबर किंवा वडिलांबरोबर संयुक्त खाते उघडावे. आई, वडील व पाल्य असे तिघांच्या नावेही खाते उघडता येते. पाल्याच्या नावे ‘पीपीएफ’ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) खाते उघडले जाते. या खात्याची मुदत किमान 15 वर्षे असते. मुलींसाठी शासनाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ आहे. या खात्यात जमलेले पैसे खातेधारक मुलीला तीचे वय 21हून अधिक झाल्यावर मिळू शकतात. ‘पीपीएफ’ व ‘सुकन्या समृद्धी योजना’ या सरकारी योजना असल्यामुळे यात जोखीम नाही. यातील गुंतवणूक सुरक्षित असते.

आई-वडिलांना जर गुंतवणूक करावयाची असेल, अधूनमधून यात पैसे भरायचे असतील, तरच लहान मुलांच्या नावे बचत खाते उघडावे. बहुतेक आई-वडिलांची अशी मनोधारणाअसते की, मुलांचे पैसे काढायचे नाहीत. स्वतःचे पैसेच काढायचे. भारतीयांची अशी मनोधारणा असते की, शक्यतो सोने विकायचे नाही. तीच मनोधारणा त्यांची मुलाच्या गुंतवणुकीबाबत असते. लहान मुलांच्या नावावर केलेली गुंतवणूक ते मुल 18 वर्षांचे झाल्यानंतर काढून घेतल्यास त्यावर कॅपिटल गेन्स कर भरावा लागतो. लहान मुलांच्या नावावर म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक किंवा बँकांच्या मुदत ठेवीत केलेली गुंतवणूक ते मुल 18 वर्षांचे होण्यापूर्वी काढून घेतली, तर हा व्यवहार प्राप्तिकर पात्र असतो.प्राप्तिकर आई किंवा वडील यांना भरावा लागतो. जर लहान मुल स्वत: पैसे कमवित असेल. उदाहरण द्यायचे तर टीव्हीवरील बर्‍याच मालिकांत लहान मुलं काम करतात. अशांना मिळालेले मानधन हे त्या लहान मुलाचे असल्यामुळे त्या बालकाला त्याच्या नावाने प्राप्तिकर भरावा लागतो, असे उत्पन्न कमविणार्‍या मुलाचा स्वतंत्र प्राप्तिकर रिटर्न भरावा लागतो.

लहान मुलांना वाढदिवसाला व अन्य काही कारणांसाठी नातलगांकडून रोख पैशाच्या स्वरुपात भेटी मिळतात. हे लहान मुलांना मिळालेले पैसे आपण खर्च करावेत, असे आई-वडिलांना वाटत नाही. म्हणून ते असे जमा होणारे पैसे गुंतवितात.बँकेच्या मुदत ठेवींत केलेली गुंतवणूक करपात्र असते. लहान मुलांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करावी किंवा ‘एसआयपी’ (सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) त गुंतवणूक करावी. अन्य नातलगांपासून मिळालेली रोखरकमेतून 50 हजार रुपयांपर्यंतची भेट ही करमुक्त असते.काही पालक मुलगी जन्मात आली, तर ‘सुकन्या समुद्धी योजने’त गुंतवणूक करतात. योजनेतून मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत पैसे काढतायेत नाहीत. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 50 टक्के रक्कम काढता येते व मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेची मुदतपूर्ती होते. तसेच विमा म्युच्युअलफंड कंपन्यांच्या लहान मुलांसाठी खाास योजना आहेत व त्या फार लोकप्रिय ही आहेत. ‘युलिप’ (युनिट लिन्क्ड इन्शुरन्स प्लान) यातही लहान मुलांसाठी बरेच पालक गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीत दीर्घ मुदतील ‘मार्केट लिन्क्ड’ परतावा मिळतो. विम्याचा टर्म इन्शुरन्स प्लानही बरेच आई-वडील आपल्या पाल्यासाठी निवडतात.

शेअर बाजारात व्यवहार करावयाचे असतील, तर लहान मुलाच्या मुलीच्या नावे ‘डिमॅट’ खाते उघडावे लागते. पण, आई-वडिलांना शेअर बाजारात व्यवहार करून शेअर विकत घेता येत नाहीत. लहान मुलांसाठी त्यांच्या नावे ‘आयपीओ’त गुंतवणूक करता येते. यात शेअर्स इतर बॉण्ड्स किंवा कर्जरोख्यात गुंतवणूक करता येते. तसेच, गिफ्ट सिक्युरिटीझमध्ये गुंतवणूक करता येते. लहान मुलांचे ट्रेडिंग खाते असू शकते. पण, या खात्यांतून लहान मुलं स्टॉक ब्रोकरकडून शेअर खरेदी किंवा व्रिकी करू शकत नाही. आई-वडिलांनी केलेल्या गुंतवणुकीची पूर्ण मालकी पाल्याने 19व्या वर्षांत पदार्पण केल्यावर त्यांच्याकडे येते. सर्व पालकांना स्वतःच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आर्थिक तरतूद तसेच मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक, या दोन्ही गोष्टी करणे शक्य नसते. अशांसाठी त्यांचे पाल्य जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी योग्य होईल, तेव्हा शैक्षणिक कर्ज मिळू शकते.

लहान मुलांच्या नावे गुंतवणूक कशी करावी?

यासाठी सर्वप्रथम जन्म दाखला हवा. त्यानंतर लहान मुलाच्या नावे बँक खाते उघडावे. या खात्यात अधूनमधून पैसे भरत राहावे. या बचत खात्यात बर्‍यापैकी रक्कम जमा झाल्यावर यातील रक्कम म्युच्युअल फंड किंवा अन्य उत्पादनांत गुंतवावी. लहान मुलांच्या डिमॅट खात्यात पालक शेअर ट्रान्सफर करू शकतात. लहान मुल सज्ञान झाल्यावर पुन्हा ‘केवायसी’ची प्रक्रिया करावी लागते. लहान मुलांना आई-वडील भाऊ-बहीण, आजोबा-आजी, काका-काकी, आते-आतेचे यजमान, मामा-मामी, मावशी व मावशीचे यजमान या नातलगांकडून मिळणारी भेट करमुक्त असतात. तसेच भेट देण्यामुळे भेटवस्तू देणार्‍यांची करदायित्व काही प्रमाणात कमी होते. जर नातलगाने आयकर कायद्याच्या 56(2) अन्वये भेटवस्तू दिली असेल, तर ती करपात्र नाही. तसेच नातलगांनी दिलेली रु. 50 हजार इतक्या रकमेपर्यंतची भेट एका आर्थिक वर्षात करपात्र नाही, करमुक्त आहे. नातलगांनी भेट म्हणून बँकाची मुदतठेव प्रमाणपत्रे देऊ नयेत. यातील गुंतवणूक करपात्र असते. नातलगांनी शक्यतो लहान मुलाच्या खात्यात पैसे जमा करावेत किंवा लहान मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. मुलाच्या किंवा मुलीच्या नावे गुंतवणूक केल्यास पालकांना कमी कर भरावा लागतो. उदाहरण द्यायचे, तर सर्व गुंतवणूक पालकांच्या नावे आहे.

पालकांचे निव्वळ करपात्र उत्पन्न रुपये 30 लाख आहे असे समजू, तर कर दायित्व रुपये 7 लाख, 41 हजार इतके असेल. जर लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केली, तर उदाहरणार्थ - पालकांचे निव्वळ करपात्र उत्पन्न 20 लाख रुपये समजूया, लहान बालकाचे निव्वळ करपात्र उत्पन्न दहा लाख रुपये समजूया, तर करदायित्व 5 लाख, 46 हजार रुपये असेल यातून 1 लाख, 95 हजार रुपये कर वाचू शकतो. त्यामुळे पालकांनी जर लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केली, तर पालकांचे फार मोठ्या प्रमाणावर कर दायित्व कमी होऊ शकते. मुलाने/मुलीने 19व्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर कर दायित्वाशी पालकांचा संबंध उरत नाही. सर्व करदायित्व सज्ञान झालेल्या मुलामुलींचे होते. 18 वर्षांहून कमी म्हणजे ‘मायनर’ मुला/मुलींचे उत्पन्न (व्याजापोटी मिळालेले किंवा गुंतवणुकीतून बाहेर पडल्यामुळे मिळालेले) पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट होऊन त्याचा कर पालकाला भरावा लागतो. पूर्वी मुलीच्या लग्नासाठी ही तरतूद केली जायची. पण, पालक आता मुलीच्या लग्नापेक्षा तिच्या शिक्षणाचा जास्त विचार करून त्यासाठी गुंतवणूक करतात, ही बाब निश्चितच स्वागतार्ह!


 
Powered By Sangraha 9.0