पीएफ खात्यासाठी फोन आला असेल तर सावधान! वृद्ध दाम्पत्याला ४ कोटींनी गंडवले
26 Oct 2023 13:00:58
मुंबई : राज्यात सायबर चोरट्यांची संख्या वाढली असून आता मुंबईतून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील एका वृद्ध जोडप्याला ११ कोटी रुपयांचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल चार कोटी रुपयांनी गंडवले आहे. दक्षिण मुंबईतील ही घटना आहे.
एका मोठ्या कंपनीत नोकरी करणाऱ्या दक्षिण मुंबईतील एका वृद्ध जोडप्याचा एका कंपनीशी संपर्क आला. या कंपनीतील महिलेने त्यांना पीएफ विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी तिचे पती काम करत असलेल्या कंपनीचे नावही आरोपी महिलेने तिला सांगितले.
त्यानंतर आरोपी महिलेने वृद्ध महिलेला सांगितले की, तिच्या पतीने भविष्य निर्वाह निधीमध्ये ४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. ते आता २० वर्षानंतर परिपक्व झाले असून तुम्हाला ११ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच तिने यासाठी टीडीएस, जीएसटी आणि आयकर भरण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.
महिलेने आरोपीला बँकेचे तपशील देताच आरोपीने तब्बल चार कोटी रुपये लुबाडले. त्यानंतर या वृद्ध जोडप्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.