वरवरा राव यांना शस्त्रक्रियेसाठी हैद्राबादला जाण्यास परवानगी!
25 Oct 2023 14:26:41
मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी हैद्राबादला जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना उच्च न्यायालयाने एक आठवड्याची परवानगी दिली आहे.
वरवरा राव यांनी एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुंबईला परत यावे. त्यानंतर दुसऱ्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पुन्हा विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले आहे.
दरम्यान, शस्त्रक्रिया करण्यासाठी हैद्राबादला जाण्यासाठी वरवरा राव यांनी जून महिन्यातच याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांना आता सोमवारी न्यायालयाने एक आठवड्याची परवानगी दिली आहे. वरवरा राव यांना २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती.
त्यानंतर मार्च २०२१ मध्ये न्यायलयाने त्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांना सशर्त वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला. परंतू, न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाला सोडून जाता येणार नाही, अशी अट घालण्यात आली होती.