ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस अर्थात विजयादशमीला (दसरा) मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी ठाणे शहरात पथ संचलन काढण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने ठाण्यातील रस्त्यांवर हाती लाठी घेऊन काढण्यात आलेल्या या पथ संचलनात आ. संजय केळकर तसेच समाजसेवक डॉ. राजेश मढवी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज स्थापना दिवस. दि. २७ सप्टेंबर, १९२५ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ.केशव हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार यांनी शारीरिक, बौद्धिक आणि सर्व दृष्टींनी आपल्या ध्येयाला साध्य करण्यासाठी स्वत:ला प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने संघाची स्थापना केली.गेल्या ९८ वर्षांनंतर संघामध्ये बरीच उलथापालथ झाली असून संघाची ध्येय धोरणेही बदलली. मात्र, संघ स्वयंसेवकातील राष्ट्राभिमान आणि कडवटपणा कायम आहे.संघाच्या स्थापनेनिमित्त ठाण्यातील विविध भागात संघ स्वयंसेवकांनी मंगळवारी दसर्यानिमित्त केलेले संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
बँडच्या तालावर सायंकाळी महाराष्ट्र विद्यालयातून काढण्यात आलेल्या या संचलनात ठिकठिकाणी संघ स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टीही केली जात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने या संचलनात आमदार संजय केळकर तसेच डॉ. राजेश मढवी आदींसह रा.स्व. संघाचे पदाधिकारी तथा स्वयंसेवक सहभागी झाले होते.
कल्याण-डोंबिवली, टिटवाळ्यात उत्स्फूर्त सहभाग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कल्याण जिल्ह्याच्यावतीने विजयादशमीनिमित्त कल्याण-डोंबिवली व टिटवाळा या भागात गणवेशातील स्वयंसेवकांची १३ संचलने काढली. शहरातील विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या या संचलनात हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. संचलनानंतर झालेल्या उत्सवात मान्यवरांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कल्याण पश्चिम भागातील प्रमुख उत्सवात बोलताना क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, “संघाच्या ९९ वर्षांच्या परिश्रमातून हजारो संस्था निर्माण झाल्या आहेत. सर्व समाजाला शाखेवर आणण्यासाठी अधिक परिश्रमांची आवश्यकता आहे. समाजातील अनेक घटक संघाजवळ येत आहेत. परंतु, अजून ते स्वतःला जाती बंधनात बांधून घेत आहेत. जातीभेद विसरून हिंदू म्हणून उभे राहावे,” असा आपला प्रयत्न असला पाहिजे.