कोची : केरळमधील पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सरकार लवकरच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘इस्लाम इन केरळ’ या विषयावर एक मायक्रोसाइट तयार करणार आहे. या मायक्रोसाइटचा उद्देश हा केरळमध्ये मुस्लीम धर्माचा उदय कसा झाला हे शोधण्याचा असेल, असा दावा केरळच्या कम्युनिस्ट सरकारने केला आहे.
केरळमधील इस्लामची सामाजिक-सांस्कृतिक उत्क्रांती प्रदर्शित करण्यासाठी, केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, पी. ए. मोहम्मद रियास यांनी या मायक्रोसाइटसाठी ९३.८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यातून सरकारचा उद्देश हा केरळमधील इस्लामचा इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास करणे हा आहे. केरळ सरकारच्या दाव्यानुसार केरळमध्ये इस्लाम धर्म हा ७ व्या शतकात आला आहे. पण केरळ सरकारचा हा दावा इतिहासकारांनी आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी फेटाळला आहे.
कम्युनिस्ट सरकार काही मिथकांच्या आधारे केरळमध्ये इस्लाम रुजवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप इतिहासकारांनी केला आहे. मायक्रोसाइटवरील अहवालानंतर प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी एक्सवर पोस्ट करत केरळ सरकारचे दावे खोडून काढले आहेत. ते म्हणाले की, "केरळ सरकार दावा करतात की केरळचा इस्लामिक इतिहास ७ व्या शतकाचा आहे, हा एक मिथक मशिदीभोवती रचला जात आहे, पण ही मशिद प्रत्यक्षात १४ व्या शतकात बांधण्यात आली होती."
प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केरळ सरकारच्या हेतूवर सुद्धा शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले की, "प्रस्तावित सरकारी प्रकल्पाचा उद्देश इतिहास म्हणून ३ मिथक प्रस्थापित करण्याचा आहे असे दिसते, पहिले चेरामन पेरुमलचे धर्मांतर. दुसरे चेरामन मशीद ७ व्या शतकातील आहे, हे सिद्ध करणे. त्यासोबतच केरळमधील इस्लाम हा अरबी इस्लामइतकाच जुना आहे"