गोंडा जिल्ह्यात देशातील सर्वांत मोठा कन्या पूजन कार्यक्रम

24 Oct 2023 21:11:10
up-creates-record-hosts-biggest-kanya-pujan

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडा येथे जिल्हा प्रशासनातर्फे ‘शक्ती वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना ‘आत्मनिर्भर’ करणार्‍या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विविध भागांमधून निमंत्रित केलेल्या ११ हजार, ८८० कन्यांचे या कार्यक्रमात पूजन करण्यात आले.

"शक्ती वंदन’ कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा, यासाठी किमान ११ हजार कन्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. पण, जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे ते लक्ष्य पार करण्यात यश आले आणि प्रत्यक्षात या कार्यक्रमास ११ हजार, ८८० कन्या उपस्थित होत्या. अशा प्रकारचा देशातील हा सर्वांत भव्य कार्यक्रम असल्याचे मानण्यात येत आहे. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नऊ महिलांना ‘नवदेवी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच, जिल्ह्यातील नऊ महिलांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल ‘मातृशक्ती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात ‘मिशन शक्ती कॅफे’ आणि ‘मिशन शक्ती वॉल’ या महिलांना स्वावलंबी आणि ‘आत्मनिर्भर’ करणार्‍या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, एवढा मोठा कार्यक्रम योजला असला तरी त्यामुळे त्या ठिकाणी अजिबात कचरा राहणार नाही, असे शून्य कचरा व्यवस्थापन करण्यात आले होते. या कन्या पूजा कार्यक्रमाच्यावेळी १३८ किलो ओला कचरा आणि ७० किलो सुका कचरा निर्माण झाला होता. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खत करण्यासाठीचे खड्डे निर्माण करण्यात आले होते. या कचर्‍यापासून खतनिर्मिती होईल, याकडे लक्ष देण्यात आले होते. सुका कचराही काच, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद आणि पॉलिथीन अशा चार प्रकारात विभागण्यात आला आणि तो कचरा ओला कचर्‍याचे व्यवस्थापन करणार्‍या विभागाकडे पाठविण्यात आला. कन्या पूजनाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात कन्यांचा सन्मान करण्याचा गोंडा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम कौतुकास्पद मानायला हवा!

आमदार टी. राजा सिंह यांचे निलंबन भाजपकडून रद्द

तेलंगणमधील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी प्रेषित महम्मद यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने त्यांचे सदस्यत्व निलंबित केले होते. पक्षाने त्यांच्यावर जी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली होती, त्यास त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर भाजपने त्यांचे निलंबन मागे घेतले. टी. राजा सिंह यांना गेल्या ऑगस्ट महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यांना जी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली होती, त्यास समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून प्राप्त झाल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे पक्षाच्या केंद्रीय शिस्तभंग समितीचे सदस्य ओम पाठक यांनी जाहीर केले. पक्षाकडून आपले निलंबन मागे घेतले जाईल आणि आपणास भाजपकडून गोशामहल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असा विश्वास टी. राजा सिंह यांनी खूप आधी व्यक्त केला होता. निलंबन मागे घेतल्याबद्दल टी. राजसिंह यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बी. एल. संतोष आदी भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. टी. राजा सिंह यांचे निलंबन मागे घेतल्याने भाजपला प्रचारासाठी एक आक्रमक नेता उपलब्ध झाला आहे.

तेलंगणमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समिती, भाजप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीला ११९ पैकी ८८ जागा मिळाल्या होत्या. त्या पक्षास ४७.४ टक्के मते मिळाली होती. तेलंगणमध्ये दि. ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सर्वांसमवेत दि. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

काश्मीर : शारदा मंदिरात नवरात्र पूजा हे शांतता परतल्याचे द्योतक : गृहमंत्री

“स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच यंदाच्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील ऐतिहासिक शारदा मंदिरात नवरात्रीनिमित्त पूजा आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी या मंदिरात चैत्र नवरात्र पूजा करण्यात आली होती आणि आता शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने या मंदिराचा परिसर मंत्रघोषांनी दुमदुमला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच गेल्या १५ ऑक्टोबर रोजी कुपवाडा जिल्ह्यातील तीतवाल येथे असलेल्या शारदा मंदिरात नवरात्र पूजा करण्यात आली. हे शारदा मंदिर भारत-पाकिस्तान सीमेलगत आहे. या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास देशाच्या विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९४७ नंतर प्रथमच आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असा क्षण या मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांनी अनुभवला. ही घटना लक्षात घेता, काश्मीर खोर्‍यात पुन्हा शांतता परतली असल्याचेच दिसून येते,” असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली आहे, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर दि. २३ मार्च या दिवशी गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हे मंदिर खुले करण्यात आले होते.

शिवमोगा येथील हैदोस प्रकरणी ६० समाजकंटकांना अटक

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर टिपू सुलतानाचे गुणगान गाणार्‍यांना भलताच चेव आल्याचे ईदनिमित शिवामोगा येथे जी मिरवणूक काढण्यात आली होती त्यावरून दिसून आले. यानिमित्ताने टिपू सुलतान, औरंगजेब यांची भव्य पोस्टर्स लावण्यात आली होती. तसेच, भव्य तलवारीही झळकविण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे, तर या मिरवणुकीसाठी उभ्या करण्यात आलेल्या एका स्वागत कमानीवर अखंड भारताचा हिरव्या रंगातील नकाशा दाखविण्यात आला होता आणि त्याद्वारे मुस्लीम साम्राज्य किती विस्तारलेले होते ते दर्शविण्यात आले होते. या ईदच्या मिरवणुकीत ‘जब चली हैदर की तलवार...’ अशी गाणी वाजविली जात होती. मिरवणुकीत सहभागी झालेले अत्यंत आक्रमकपणे घोषणा देत होते. त्यातून तणाव वाढता गेला. मिरवणूक रागीगुड्डा भागात पोहोचल्यावर दगडफेकीस प्रारंभ झाला. अनेक वाहनांची, घरांची नासधूस करण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी असलेला जमाव आक्रमक असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, ईदच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक म्हणजे हा अल्पसंख्य समाजावर हल्ला होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईदच्या दिवशी शिवमोगा येथे झालेल्या चकमकीसंदर्भात पोलिसांनी २४ गुन्हे नोंदविले आहेत आणि ६० समाजकंटकांना अटक केली आहे, तर ईदच्या मिरवणुकीच्या दिवशीच मंगळुरु येथील राणी अब्बक्का सर्कल इथे असलेल्या स्वातंत्र्य वीरांगिनी राणी अब्ब्क्का यांच्या पुतळ्यावर मिरवणुकीत सहभागी झालेले चढले आणि तेथे उभे राहून त्यांनी हिरवे झेंडे फडकविले. ही घटना दि. २८ सप्टेंबर रोजी घडली होती. राणे अब्बक्का यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यापर्यंत ईदच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांची मजल गेली.

ईदच्या मिरवणुकीत सहभागी झालेले लोक टिपूच्या समर्थनाच्या घोषणा देत असताना आणि टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे त्या मिरवणुकीच्या निमित्ताने उदात्तीकरण केले जात असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुस्लीम समाजाचाच कैवार घेतात म्हणजे अति झाले! अल्पसंख्य समाजाचे असे तुष्टीकरण आणखी किती काळ चालणार? या मिरवणुकीच्या निमित्ताने शिवमोगामध्ये जे ‘हिरवे’ प्रदर्शन झाले, ते पाहता देशातील राष्ट्रप्रेमी समाजास आगामी काळामध्ये कोणत्या प्रसंगांना समोरे जावे लागणार, याची कल्पना येते.

९८६९०२०७३२
Powered By Sangraha 9.0