मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसर्याच्या खरेदीसाठी सर्वच बाजारपेठा गजबजलेल्या दिसून येत आहे. किरकोळ वस्तुंच्या बाजारेपेठेपासून, वाहने, सोने-चांदी आणि घरांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेली लगबग दसर्याचा मुहुर्त साधताना दिसत आहे.
दसर्याला संपत्ती, ज्ञान आणि शक्तीची पूजा केली जाते. त्यासाठी आंब्याच्या पानांचे तोरण, लाल पिवळ्या झेंडूची फुले, आपट्याची पाने, भाताची लोंबी, शेवंतीची फुले यांनी दादरसह ठिकठिकाणच्या बाजारपेठा दरवळून निघाल्या आहेत. दादरच्या फुल बाजारात विविध प्रकारची फुले आणि आपट्याची पाने किरकोळ आणि घाऊक दराने मिळतात. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ग्राहकांची झुंबड दिसून येत आहे. उत्पादन क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने फुलांची आवक प्रचंड झाली त्यामुळे यंदा बाजारपेठेतील दर स्थिर दिसून आले.
सोने चांदी स्वस्त
सणासुदीच्या काळात सोने चांदी खरेदीसाठी झुंबड उडते. दसरा हा अत्यंत महत्वाचा सण हिंदू समाजासाठी मानला जातो. याच्यातच गेले काही दिवस इस्त्रायल हमास युद्धाचे सावट असल्याने मार्केट मध्ये मंदीचे सत्र सुरू होते. त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरात दिसून येत असून गेल्या काही दिवसात सुरु असलेली घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडत आहे.
दसर्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा दर प्रती तोळा (१० ग्रॅम) ६०५४६ आहे. एकाच दिवसात २०० रुपयांची घट झाली आहे. चांदीच्या भावात देखील ७,२०,७०६ रूपयांवरून ७१,८९५ रू. प्रति किलो इतकी घट झाली. मुंबई येथे (२२ कॅरेट ) सोन्याच्या प्रति १० ग्रामची किंमत ५६,६०० इतकी होती. येत्या काळात यात आणखी काहीशी घट होणार असल्याचा अंदाज आहे. सोने लुटण्याचा हा दिवस असल्यामुळे आपट्याची पानांसोबत खरे सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. यासाठी सोन्याच्या दुकानात आणि पेढ्यांमध्ये खरेदीदारांची रेलचेल सुरु झाली आहे.
विविध वस्तुंच्या खरेदीने बाजारात उत्साह
दसर्याला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. यात प्रामुख्याने फ्रिज, वॉशिंग मशिन, मोबाईल या इलेक्ट्रॉनिक वस्तु तर नवीन वाहन खरेदीकडेही अनेकांचा कल असतो. त्यामुळे या दुकानातदेखील ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
शेअर बाजारात घसरणीची रास
मुंबई : जागतिक अस्थिरता आणि मध्य-पूर्वेत असलेल्या तणावामुळे जगभरातील बाजारपेठेत निरुत्साह दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजारातही त्याचा परिणाम जाणवत असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. त्याचा परिणाम मुंबई शेअर निर्देशांक ६४,००० च्या खाली आला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्ल १२ लाख कोटींचे नुकसान झाले. आजच्या व्यवहारात मुंबई शेअर निर्देशांक ८२५ अंकांनी कमी होऊन ६४,५७१ वर बंद झाला. तर निफ्टी १९,२८१ वर बंद झाला. त्यात २६० अंकांची घसरण नोंदली गेली.
झेंडु प्रति किलो : ८० रुपये
शेवंती प्रति किलो : १६० रुपये
आंब्याचे टाळ : २० रुपये
आपट्याची पाने (जुडी) : २० रुपये
भाताची लोंबी (जुडी) : २० रुपये