मुंबई :१६ सप्टेंबर रोजी राम मंदीर, अलिबाग येथे 'शेवटचं पान' ही स्वरचित कवितांची मैफिल संपन्न झाली. शिवानी, प्रतिक व अनिकेत या अलिबागमधीलच काही स्थानिक तरुणांनी ही मैफिल आयोजित केली होती. 'कलेला वाव देणारं, मनाचा ठाव घेणारं - तुमच्या आमच्या वहीचं, सर्वात खास, शेवटचं पान' हे शीर्षक असलेलं आकर्षक पोस्टर रसिकजनांचं लक्ष वेधून घेत होतं. तरुणांनी या मैफिलीचं आयोजन केल्यामुळे प्रेम, पाऊस, रात्र, समुद्र अशा सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या कविता सादर करण्यात आला. शिवानी दामले यांच्या एका कवितेला तर वन्स-मोर देखील मिळाला.
हलक्याफुलक्या, कॉलेजच्या दिवसांमध्ये घेऊन जाणार्या, प्रस्थापित समाजव्यवस्थेचं शल्य मांडणार्या, कधी खळखळून हसवणार्या तर कधी माहेरच्या आठवणी जागवून अलगद डोळ्यांच्या कडा पाणावणार्या कवितांच्या श्रावणसरींमध्ये रसिक चिंब झाले होते. कधी टाळ्यांचा गजर तर कधी हास्याचा कहर, कधी 'वाह,वाह' अशी उत्स्फूर्त दाद, तर कधी अंतर्मुख होऊन स्वतःशी साधलेला संवाद - खरंच या मैफिलीने नव्या व जुन्या पिढीतलं वैचारिक अंतर मिटवण्याचं व शब्दांचा अर्थपूर्ण साकव बांधण्याचं काम केलं.
या मैफिलीसाठी साधारणतः सव्वाशे रसिकजनांची उपस्थिती होती. चैताली गानू यांच्या खुसखुशीत व ओघवत्या सूत्रसंचालनाने मैफिलीला विशेष रंगत आणली. 'शेवटचं पान' या थीमला अनुसरून एका नोटीसबोर्डवर वहीची पानं चिकटवून त्यावर अभिप्राय देण्याची शक्कलही रसिकांना आवडली. साधारणतः दीड तास रंगलेल्या या मैफिलीची कॉफीपानाने सांगता झाली.