विश्वचषक सामना बघायला येताय! तर पोलिसांचे हे नियम वाचाच
21 Oct 2023 15:35:34
मुंबई : संपूर्ण देशात सध्या एकदिवसीय आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या वर्ल्ड कपचा आज (२१ ऑक्टोबर) साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड हा विसावा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आहे. यावेळी कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २४ ऑक्टोबर तसेच २, ७ व १५ नोव्हेंबर या दिवशी सामने होणार आहेत. यावेळी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून नियमावली जाहीर केली आहे.
सामना बघायला येणाऱ्या प्रेक्षकांनी प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. कारण वानखेडे स्टेडियम बाहेर पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होऊ शकते. प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश करताना कोणत्याही प्रकारच्या बॅग, पाण्याची बाटली, ज्वलनशील पदार्थ अशा कुठल्याही वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे.
प्रेक्षकांनी क्रिकेट मॅच बघण्यासाठी तिकिटे ही अधिकृत स्थळांवरून अथवा ऑनलाईन वेबसाईटवरूनच खरेदी करावीत. शक्यतो स्टेडियमच्या परिसरामध्ये बारकोड नसलेले आणि साधारण प्रिंट असलेले तिकीट खरेदी करू नये. यामुळे फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई पोलीसांनी क्रिकेट रसिकांना सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणाने पालन करावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.