१८९७ मध्ये सावरकर पुढील शिक्षण घेण्यासाठी भगूरहून नाशिकला आले. त्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याभोवती जे विद्यार्थी जमा झाले होते, त्यात प्रमुख होते-विष्णू महादेव भट. साहजिकच ते क्रांतिकार्यात सहभागी झाले. जॅक्सनच्या वधानंतर नाशिकमध्ये मोठी धरपकड झाली. त्यात वि. म. भट देखील गजाआड झाले.
कटाची माहिती काढण्यासाठी या सगळ्या तरुणांना इंग्रजांनी खूप छळले. भटांना पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातही त्यांना मोठ्या छळाला तोंड द्यावे लागले. निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे त्यांची प्रकृती बिघडली. वजन २१ पौंडाने घटले. पुढे त्यांना हैदराबाद (सिंध) येथील तुरुंगात हलवण्यात आले. तेथे त्यांना चक्की पिसण्याचे कष्टप्रद काम देण्यात आले. १९१५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. भट यांनी लिहिलेले ‘अभिनव भारत‘ हे पुस्तक हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
कृष्णाजी गोपाळ खरे हे एक बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांनी रसायनशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले होते आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून, त्यांनी चक्क बॉम्ब बनवण्याच्या उद्योग केला! हा तर अक्षरशः आगीशी खेळ होता. आपल्या अनेक सहकार्यांना त्यांनी ही दीक्षा दिली. त्यासाठी लागणारी रसायने बनवण्याचे कारखाने या सर्व देशभक्तांनी लंडन, पॅरिस, नाशिक, मुंबई, कोठुरे( नाशिक जिल्हा), पेण, खानापूर, वसई अशा विविध ठिकाणी सुरू केले. याचे ‘बक्षीस‘ खरे यांना लवकरच मिळाले-दहा वर्षांची सक्तमजुरी. शंकरराव सोमण यांना जॅक्सन वधाच्या खटल्यात २५ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अंदमानला नेण्यापूर्वी त्यांना ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांची तब्येत इतकी बिघडली की, त्या आजारातच त्यांचा मृत्यू ओढवला. जणू काही मृत्यू अधिक दयाळू होता-त्याने सोमण यांची अंदमानमध्ये होऊ घातलेल्या भीषण छळापासून सुटका केली!
वामन सखाराम तथा बाबासाहेब खरे यांची कथा मोठी करूण आहे. ते फौजदारी वकील होते. ‘एलएलबी’ची परीक्षा उत्तीर्ण झालेले, ते पहिले नाशिककर. त्यांचा व्यवसाय उत्तम चालत असे. त्या काळात त्यांचे उत्पन्न हजारो रुपयांचे होते. ते बाबाराव सावरकरांच्या सहवासात आले आणि क्रांतिकार्याकडे ओढले गेले. देशभक्त तरुणांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यात, ते नेहमीच अग्रभागी असत. त्यामुळे इंग्रज त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून होते. याच सुमारास नाशिकमध्ये एक मोठी घटना घडली.
एकदा एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन रस्त्याने जात होता आणि त्याच्या मागून विल्यम नावाचा एक इंग्रज इंजिनिअर आपली घोडागाडी घेऊन चालला होता. त्या शेतकर्याने विल्यमला पुढे जाण्याचा रस्ता लगेच दिला नाही, या किरकोळ कारणावरून त्याने शेतकर्याला इतके मारले की, त्यात तो मरण पावला. यामुळे गावात प्रचंड असंतोष निर्माण झाला. बाबासाहेब खरे यांनी इंग्रजांना या अधिकार्यावर खटला भरणे भाग पाडले. १९०८ मध्ये टिळकांना सहा वर्षांची शिक्षा जाहीर झाली. दुसर्याच दिवशी म्हणजे दि. २३ जुलै रोजी नाशिकमध्ये प्रचंड मोठी सभा झाली आणि या शिक्षेचा निषेध करण्यात आला. या सभेचे अध्यक्ष होते-बाबासाहेब खरे. जॅक्सन प्रकरणात त्यांना अडकवण्यात आले आणि धारवाडच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांचे तेथे अतोनात हाल करण्यात आले. वकिलीची सनद रद्द करण्यात आली.
या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. पुढे त्यांची सुटका झाली; पण ते जणू असाहाय्य बनले होते. एकेकाळी वकिलीमध्ये हजारो रुपये कमावणारा हा नामवंत वकील. पण, आता त्याच्या उपजीविकेचा यक्षप्रश्न निर्माण झाला होता! त्यांची कन्या गोदूताई यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. ते इतके अस्थिर झाले होते की, एखाद्या छोट्या प्रसंगातही त्यांच्या भावना उचंबळून येत आणि ते रडू लागत. घरी आलेल्या प्रत्येकाला ‘आपल्या देशाला चांगले दिवस कधी येतील,’ असे सतत विचारत असत. अशाच करूण परिस्थितीत दि. १२ जानेवारी १९२८ या दिवशी ते मरण पावले. श्री. र. वर्तक यांनी या सगळ्या कहाण्या आपल्या पुस्तकात प्रभावीपणे सांगितल्या आहेत.
डॉ. गिरीश पिंपळे
९४२३९६५६८६