दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात युवा महोत्सवाचे आयोजन

    20-Oct-2023
Total Views |

yuva mohotsav

मुंबई :
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे कै. मधुकर आठल्ये, कै. मनमोहन आठल्ये आणि कै. एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा महोत्सव’आयोजित केला आहे. यात प्राजक्ता काकतकर आणि शिवानी मिरजकर यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात सादर करण्यात येणार आहे.

प्राजक्ता काकतकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रतिमा टिळक यांच्या शिष्या आहेत. त्यांनी संगीत या विषयात एम्. ए. केले असून संगीत विशारद ही पदवीही प्राप्त केली आहे. तसेच काही संगीत संमेलनांमध्ये कार्यक्रम सादर केले आहेत. युवा महोत्सवात त्यांना तबल्याची साथ प्रसाद काकतकर आणि संवादिनीची साथ अभिजीत काकतकर करणार आहेत.

शिवानी मिरजकर या पं. चंद्रशेखर पुराणिकमठ (ग्वाल्हेर / किराणा घराणे), पं. कैवल्यकुमार गुरव (किराणा घराणे) आणि पद्मश्री पं. उल्हास कशाळकर (ग्वाल्हेर / जयपूर / आग्रा घराणे) यांच्या शिष्या आहेत . त्यांनी संगीत विषयांत बी.ए., एम्.ए. या पदव्या प्राप्त केल्या असून सध्या म्युझिकॉलॉजी मध्ये पीएच्.डी. करीत आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून देशभरात विविध प्रतिष्ठित मैफलींमध्ये त्यांचे गायन झाले आहे. त्यांना तबल्याची साथ विनय मुंढे आणि संवादिनीची साथ अभिनय रवंदे करणार आहेत. तरी, अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.