वाडा : हळवार भात पीक कापणीस तयार झाले असून, वाडा तालुक्यातील शेतकर्यांनी हळवार भात पीक कापणीला सुरुवात केली आहे. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील पाऊस पडण्याची शक्यता विचारात घेऊन शेतकर्यांनी कापणीसोबतच झोडणीही सुरू केली आहे.
वाडा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळवार भात पिकाची लागवड करीत असतात. हे भात पीक ९० ते ११५ दिवसांच्या कालावधीत कापणीस तयार होते. हळवार भात पीक कापणीची (लाणी) लगबग सुरू असून, येथील शेतकर्यांना पावसाची भीती कायम सतावत असल्याने भात कापणीच्या (लाणी) काही नैसर्गिक नियमांना बगल देत कापणी सोबत एका बाजूला घाईघाईने झोडणीच्या कामेही उरकली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
भात पिकाची कापणी करून त्याला किमान दोन दिवस सूर्यप्रकाश (ऊन) देणे आवश्यक असते. त्यानंतर भारे बांधील करून उडवे रचून उब दिली जाते. अशी प्रक्रिया केल्यास भाताचा दाणा खडण्यास मदत होते. मात्र, आता पावसाच्या भीतीने लाणीच्या काही नैसर्गिक नियमांना बगल देत, शेतकरी कापणीसोबत झोडणीची कामे उरकून घेताना दिसत आहेत. यंदा पावसाचा मुक्काम अधिकच वाढल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी मिळेल, त्या वेळेत भात कापणीसोबत झोडणीचे ही कामे करत आहेत.