नाशिक : कांदा निर्यात शुल्क रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संपावर गेले आहेत. मात्र, दुसरीकडे विंचूर बाजार समितीत कांदा लिलावांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा बंद फसला असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील व्यापारी संपावर गेल्याने शेतकरी कोंडीत सापडला होता. परंतू, आता लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या विंचूर बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाला आहे. या लिलावाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
संपावर गेलेल्या व्यापाऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. परंतू, यात कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी आपला संप कायम ठेवला आहे.
दरम्यान, विंचूर येथील व्यापाऱ्यांनी गणेश विसर्जनाचा मुहूर्त साधत कांदा लिलाव पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.