तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, असं म्हणतात. ज्याची प्रचिती सध्या कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादावरून दिसून येते. ‘कावेरी जलव्यवस्थापन मंडळा’ने कर्नाटक सरकारला दि. १५ ऑक्टोबरपर्यंत दररोज तीन हजार क्यूसेक पाणी तामिळनाडूला सोडण्याचे निर्देश दिले होते. कर्नाटक सरकारने, या निर्देशाविरुद्ध पाणी बोर्ड आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही, त्यामुळे आम्ही इतर राज्यांना पाणी देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे म्हणणे. याआधीदेखील दि. १३ सप्टेंबर रोजी ‘कावेरी जलव्यवस्थापन मंडळा’ने कर्नाटकला तामिळनाडूला दररोज पाच हजार क्यूसेक पाणी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तेव्हाही कर्नाटकने या निर्देशांना केराची टोपली दाखवली. जल बोर्डाच्या या निर्णयाविरोधात कन्नड आणि शेतकरी संघटनांनी दि. २९ सप्टेंबरला कर्नाटक बंद पुकारला होता. दरम्यान, २०१२ नंतर २०१८ मध्येही सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकला तामिळनाडूसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयानुसार तामिळनाडूला ४०४.२५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर कर्नाटकला २८४.७५ टीएमसी पाणी मिळणार होते. पण, कर्नाटक पुरेसे पाणी देत नसल्याचा आरोप तामिळनाडूने केला. तसेच, आता तर कर्नाटक सरकारने पाणी देण्यास नकार देत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, हा वाद मिटवण्याचे आवाहन आता तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने मोदी सरकारला केले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे, तर तामिळनाडूत द्रमुकचे सरकार. हे दोन्ही पक्ष ‘इंडिया’ आघाडीत गळ्यात गळे घालून एकतेच्या आणिक ‘मोदी हटाव’च्या घोषणा देत असताना, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच. राहुल गांधी कधी सुटकेस उचलतात, कधी गॅरेजमध्ये जातात. पण, त्यांना या वादावर समाधान शोधावेसे वाटत नाही. कारण, मुख्यमंत्रीही काँग्रेसचे आणि तामिळनाडूतही द्रमुकसोबत आघाडी. त्यामुळे आघाडी असूनही पाण्यावरून वाद थेट सर्वोच्च न्यायालयात जात असेल, तर ‘इंडिया’ आघाडीला किती उज्ज्वल यश आहे, हे समजते. असे वाद आघाडी असूनही मिटत नसतील, तर मग ‘इंडिया’ आघाडी पाण्यात जायला तरी कितीसा वेळ लागेल म्हणा?
काँग्रेसची मारहाण डिप्लोमसी
इंदिरा गांधींसारख्या दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न करुनही राजकारणात फारसं यश न मिळालेल्या कॉँग्रेस नेत्या प्रियांका गांधी. उत्तर प्रदेशातही योगी बाबांना टक्कर काय, साधा सामनाही त्यांना करता आला नाही. त्यासाठी ‘लडकी हूँ लड सकती हूँ,’अशी नवी टूम त्यांनी काढली. अर्चना गौतम या अभिनेत्रीने तेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिला विधानसभेचं तिकीटही दिलं. एवढ्यावरच न थांबता पक्षाने तिला प्रियंका गांधी यांच्या ’लडकी हूं, लड सकती हूँ’ या मोहिमेचा चेहरासुद्धा बनवले. निकाल तर समोरच होता. या अभिनेत्रीला ना स्वतःची जागा वाचवता आली, ना ही मोहीम यशस्वी करता आली. काँग्रेसची नाचक्की तेवढी भरभरून झाली. पुढे राजकारणात यश न मिळाल्यामुळे तिने ’बिग बॉस-१६’ मध्येही सहभाग झाला. तिथेही मराठी स्पर्धक शिव ठाकरेचा गळा आवळून या बाईने कहर केला. त्यानंतरही थेट प्रियांका गांधी यांचा वरदहस्त या अर्चना गौतमवर आहे, असे म्हटले जाते. आता तर नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर अर्चना गौतम हिला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला. धक्कादायक म्हणजे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच महिला नेत्याला मारहाण केली. अर्चना गौतमबरोबर तिच्या वृद्ध वडिलांनाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तिचे वडील जमिनीवर कोसळल्यानंतर साधं त्यांना पाणी द्यायलाही कोणी पुढे आले नाही. संसदेत ’नारीशक्ती वंदन कायदा, २०२३’ मंजूर झाल्याबद्दल अर्चना गौतम काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी आली होती. मात्र, अभिनंदन राहिले बाजूला आणि काँग्रेसजनांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर महिला सन्मानाचा आदर्श नमुनाच प्रस्तुत केला. नंतर तिला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबनही करण्यात आले. याआधीही दारू पिऊन काँग्रेस नेत्या अल्पना वर्मा यांच्याशी काँग्रेस नेत्यांनी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला होता. काँग्रेसशासित राजस्थानमध्येही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी महिला सुरक्षेवरून नेहमीच भाजप गंभीर नसल्याची टीका केली. मात्र, आता पक्ष कार्यालयाबाहेरच एका महिला काँग्रेस नेत्याला मारहाण करण्यात आली, हे सर्वस्वी अशोभनीयच!